मधुरीची भेट 5
‘मला नाही खरे वाटत. तुम्ही श्रीमंत, मी गरीब. हे पाहा माझे हात. ओबडधोबड हात, धुणी धुवून, भांडी घासून, दळणकांडण करून हे हात ताठरले आहेत. हे हात मऊ नाहीत. घट्टे पडले आहेत माझ्या हातांना. असे हे हात तुम्ही आपल्या हातात घ्याल?’
‘हे बघ घेतो. तुझ्या हातांसारखे सुंदर हात जगात नाहीत. तू माझी राणी, तू माझी प्रेमदेवता.’
‘हे काय तुमच्या हातात आहे?’
‘गुलाबाचे फूल.’
‘मला द्या ते.’
‘हे घे.’
तिने त्या फुलाच्या पाकळया केल्या. नंतर त्या सार्या पाकळया आपल्या मुठीत धरुन तिने विचारले, ‘एकी का बेकी?’
‘एकी,’ तो म्हणाला.
‘या, आपण हया पाकळया मोजू.’ ती म्हणाली.
दोघांनी पाकळया मोजल्या. त्या सम नाही निघाल्या.
‘कोठे आहे एकी? बेकी तर निघाली!’ ती खिन्न होऊन म्हणाली.
‘मग त्यात काय?’
‘तुमचे प्रेम नाही म्हणून बेकी निघाली.’
‘काही तरीच. तुम्ही बायका वेडया आहात. अशाने का प्रेम सिध्द होते?’
‘मग कशाने?’
‘प्रेमासाठी केलेल्या त्यागाने.’
‘मी आता जाते. उशीर होईल. आई रागे भरेल.’
‘थांब जरा. आली नाहीस तो निघालीस.’
‘पुढे तुमचीच होणार आहे. जरा धीर धरा. जाऊ दे. सोडा हात. माझा ओबडधोबड हात.’
‘तुझा फुलासारखा हात.’
‘इश्श. काही तरीच. रात्र झाली. आता जाऊ दे मला.’ ती निघून गेली. माधव तेथेच होता. सैतान हळूच हसत तेथे आला.
‘माझी आठवण तरी झाली का? प्रेमात अगदी दंगच!’ सैतानाने विचारले.
‘तू दूर उभा राहात जा. लोकांना तुझी भीती वाटते.’
‘आणि तुला?’
‘मी जगात कोणाला भीत नाही.’