फुलाला दोन बक्षिसे 1
तो पाहुणा फुलाची कुंडी घेऊन प्रदर्शनाच्या गावी गेला. तेथे नाना देशांतून फुले आली होती, शास्त्रज्ञ आले होते, परंतु संपूर्णपणे कोणाचाच प्रयोग यशस्वी झाला नव्हता. कोणाच्या एकाच पाकळीवर सोनेरी छटा उठली होती. कोणाची पुसट होती, परंतु या पाहुण्याने जे फूल आणले ते संपूर्णपणे कसोटीला उतरत होते. सारे शास्त्रज्ञ पाहात राहिले.
‘आपले नाव काय?’ त्या पाहुण्यास विचारण्यास आले.
‘गब्रू’ पाहुणा म्हणाला.
‘आपले नाव आजपर्यत ऐकले नव्हते. आपले संशोधनात्मक लेख कधी प्रसिध्द नाही वाटते झाले? कोठे राहाता आपण? कोठे आहे प्रयोगशाळा? अनेक प्रश्न गब्रूला विचारण्यात आले.
‘गाजावाजा मला आवडत नाही. मी लहानसा माळी. माझी प्रयोगशाळा वगैरे नाही. मी नाना गोष्टी करीत असतो. मला प्रयोगांची हौस आहे. वाटले की आपणही करावा प्रयोग. करीत होतो, यश आले, तसे शास्त्रीय ज्ञान मजजवळ नाही. उपपत्ती सांगता येणार नाही. कसे कसे फूल वाढले ते टिपलेले नाही. आम्ही साधी माणसे. गब्रू म्हणाला.
प्रदर्शनासाठी राजा आला होता. उद्या बक्षीससमारंभ होता. भव्य मंडप घालण्यात आला होता. ध्वजा-पताकांनी, लता-पल्लवांनी, फुलांच्या रंगी-बेरंगी सुगंधी अशा हारांनी, तोरणांनी तो मंडप सुशोभित करण्यात आला होता. अनेक शास्त्रज्ञ राजाच्या भेटी-गाठी घेत होते. गब्रूची राजाशी भेट करण्यात आली.
‘आपण कोठे असता? राजाने विचारले.
‘एका खेडेगावात.’
‘तुम्ही प्रयोगात यश मिळविलेत, आश्चर्य आहे.’
‘देवाची कृपा.’
‘तुम्ही नीट शास्त्रीय ज्ञान मिळविलेत तर आणखी चमत्कार कराल. आपल्या देशाचे नाव वाढवाल. तुम्ही शास्त्रज्ञ म्हणजे देशाची भूषणे. आपले अभिनंदन करतो. आपल्या हया देशाला तुम्ही मान मिळवून दिलात. धन्य आहात तुम्ही!’
गब्रू निघून गेला; परंतू आता कळीची गाडी आली. ती शास्त्रज्ञांना भेटली.’ हे फूल मी फुलविले आहे. हया लफंग्याने ते पळवून आणले आहे.’ असे तिने सांगितले; परंतु तिच्या म्हणण्याकडे कोणी लक्ष देईना. ‘मला राजाची भेट घ्यायची आहे, राजाची माझी गाठ घाला.’ असे ज्याला त्याला ती विनवू लागली.
शेवटी राजाच्या कानावर वार्ता गेली. एक मुलगी आपणास भेटू इच्छिते, असे त्याला कळले. त्याने त्या मुलीला बोलाविले. ती मुलगी आली. नम्रपणे ती उभी राहिली. नंतर राजाला तिने प्रणाम केला.
‘मुली, काय आहे तुझे म्हणणे?’ राजाने प्रश्न केला.
‘महाराज, ते फूल मी फूलविले आहे,’ ती म्हणाली.
‘मोठ-मोठे शास्त्रज्ञ थकले, तू कसे फुलवणार ते फूल?’’
‘ही पाहा माझी रोजनिशी. हिच्यात झाड कधी लावले, कोणते खत घातले, कोणत्या रंगाचे किरण दिले ते सारे मी लिहून ठेविले आहे.’