फुला 2
असे ते शिकण्याचे दिवस गेले. फुला आपले शिक्षण संपवून स्वत:च्या गावी राहू लागला. त्याला एक आत्या होती. आणखी कोणी नव्हते, ती आत्या फुलावर जीव की प्राण प्रेम करी. ती आता म्हातारी झाली होती.
‘फुला आता लग्न कर. माझ्या डोळयांनी तुझी बायको बघू दे.’ एके दिवशी आत्या म्हणाली.
‘मला नाही लग्न करायचे. माझे लग्न फुलांशी-’ तो म्हणाला.
‘बगीच्यात फुले हवीत. घरात मुले हवीत.’ आत्या हसून म्हणाली.
‘काहीतरीच तुझे. दुसरे काही बोलत जा. लग्नाचे नको बोलू. नाही तर मी तुझ्याशी बोलणार नही बघ-’ फुला फुरंगटून म्हणाला.
‘बरे हो. नाही काढणार पुन्हा लग्नाची गोष्ट. तुला ज्यात सुख त्यातच मला, तुझ्यासाठी तर मी जगल्ये आहे,’ आत्या म्हणाली.
फुलांचे घर तीन मजली होते. त्याने घराच्या गच्चीवर एक काचेची खोली बांधली होती. त्या काचेच्या घरात तो फुलांचे प्रयोग करी. त्या काचांवर निरनिराळया रंगांचे पडदे सोडी. निरनिराळया रंगांच्या प्रकाशात फुलझाडे वाढवी, नवीन रोपे तयार करी. तेथे किती तरी कुंडया होत्या. काही कुंडयातून फुले फुलली होती. काहींतून नुसती रोपे होती. काहींतून बी पेरलेले होते.
घराभोवती केवढी थोरली फुलबाग होती. शोकडो प्रकारची फुले तेथे फुललेली असत. अमुक एक प्रकार त्या बागेत नाही असे होत नसे. फुलाच्या हाताखाली एक-दोन माळी होते. ते त्या बागेत नेहमी काम करीत. फुला सूचना द्यावयाचा, नवीन गोष्टी सांगावयाचा. फुलांच्या संगतीत केव्हाच निघून जाई. सकाळी सूर्य वर येई. सूर्याचे किरण फुलांवर नाचू लागत, परंतु सूर्याचे ऊबदार किरण येण्यापूर्वीच फुलाची प्रेमळ अशी ती लांब सुंदर बोटे फुलांना कुरवाळीत असत. सूर्याच्या किरणांनी ती फुले फुलत का फुलाच्या प्रेमामुळे फुलत?
सायंकाळी सूर्यनारायणाचे सोनेरी किरण फुलांशी शेवटची खेळीमेळी करून मोठया कष्टाने जात; परंतु फुला अंधार पडला तरी तेथेच असे चांदण्यात तर फुला बागेत बसे. कधी-कधी रात्री सर्पही त्याला भेटत. फुलांच्या वासाने नागोबा येई; परंतु फुला म्हणावयाचा,’ सर्पसुध्दा फुलांसाठी वेडे होऊन रात्री हळूच येतात मनुष्याने का सर्पापेक्षा कमी रसिक व्हावे? सर्पाने सौंदर्यपूजक, सुगंधपूजक व्हावे आणि माणसाने का घाणीची पूजा करावी?’
फुला सध्या एका नवीन प्रयोगात मग्न होता. एका श्रीमंत रसिकाने कृष्णकमळीच्या फुलांवर सोनेरी छटा उठवून दाखवणार्याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. एका ठरलेल्या तारखेला सर्वांनी आपापले प्रयोग आणावे; ज्याचा प्रयोग जास्तीत जास्त यशस्वी झाला असे ठरेल त्याला बक्षीस देण्यात येईल; बक्षीससमारंभ राजाच्या हाताने होईल; अशा तर्हेची ही वार्ता सर्वत्र गेली होती.