फुला 1
फुला
त्याचे नाव होते फुला. फुलांचे त्याला वेड. त्याचे वय फार नव्हते. पंचवीस-तीस वर्षांचे असेल. फुलाने लग्न केले नव्हते. त्याने आपले लग्न फुलझाडांशी लावले होते. तो शिकला होता. शास्त्रांचा त्याने अभ्यास केला होता. विशेषत: वनस्पतीशास्त्राचा त्याने अभ्यास केला होता. त्यातल्या त्यात पुन्हा फुलांच्या सृष्टीचा अभ्यास म्हणजे त्याचा आनंद.
तो शिकत असताना त्याचे अनेक मित्र होते. फुलाला फुलांचे वेड असे व मुलांना फुलाचे वेड असे. फुलाचा चेहरा फुलाप्रमाणेच टवटवीत व सुंदर होता. फुलांची सारी कोमलता व मधुरता जणू त्याच्या तोंडावर फुलली होती. त्याचे डोळे कमळाप्रमाणे होते. कपाळ रूंद होते. नाक सरळ पण जरा वाकलेले असे होते. तो उंच होता, परंतु स्थूल नव्हता. त्याची उंची त्याला खुलून दिसे.
‘फुला, तू क्रांतीत भाग घेणार की नाही?’ त्याचे मित्र त्याला विचारीत.
‘हो, घेणार आहे!’ तो हसत म्हणे.
‘क्रांतीत भाग घेणारा हसत नाही!’ कोणी म्हणे.
‘क्रांतिकारक का रडतो?’ फुला पुन्हा हसून विचारी.
‘क्रांतिकारक रडत नाही. तो रडवणार्यांना रडवतो. तो निश्चयी असतो, गंभीर असतो. त्याच्या जीवनात एक प्रकारची प्रखरता असते. गुलगुलीत व लुसलुशीत असे त्याच्या जीवनात नसते. तुझ्या ठिकाणी तर हे काहीच दिसत नाही. तू हसतोस, आनंदात असतोस-’ एका विद्यार्थ्यांने सांगितले.
‘परंतु मी हसणार्या सृष्टीतच क्रांती करणार आहे. समाजातील गरिबांच्या मुलांची तोंडे टवटवीत करण्याची क्रांती तुम्ही करा. तुम्ही गरिबांचे संसार सुखाचे करा. धुळीत पडलेल्यांचा उध्दार करा. शेतकर्याकामकर्यांची मान उंच करा. श्रमणार्याची प्रतिष्ठा वाढवा.’ ‘ते काम माझे नाही. मी फुलांच्या सृष्टीत क्रांती करणार आहे. एकेका फुलावर दहा दहा रंग फुलवणार आहे. हया झाडाचे त्यावर कलम, त्याचे ह्यावर कलम. रानातील फुले आणून त्यांचा मी विकास करीन. निरनिराळे शोध लावीन. गंधांची व रंगाची जी ही पुष्टसृष्टी, तिच्यात मी वावरेन. तुम्ही मानवजात सुखी करा. त्या सुखी मानव जातीच्या भोवती मी फुलबाग वाढवीन. घाणेरीची फुले मोगर्याची करीन. टाकाऊ फुलांत गंध आणीन. सुंदर नसणार्या फुलांना सुंदर करीन, हे माझे काम. हयासाठी माझे हात, हयासाठी माझे डोळे, हयासाठी माझा अभ्यास, हयासाठी माझे ज्ञान, हयासाठी माझे घरदार, माझी सारी संपत्ती. माझ्या डोळयांसमोर जागेपणी व झोपेतही फुलेच फुले हसत असतात. मग मी हसू नको तर काय करू?’ फुला आपले हदय उघडे करून सांगे.