सर्वज्ञ माधव 2
माधव मोठा विचित्र मनुष्य होता. त्याचे वय पंचवीस - तीस असेल. लोक त्याला सर्वज्ञ माधव असे म्हणत. लोक त्याला भीत. त्याला आदरीत. कधी साठीसहामासी जर तो बाहेर पडला, तर त्याच्या पाया पडण्यासाठी झुंडीच्या झुंडी जमत. तो मग वैतागाने पळत सुटे. लोकांना शिव्या देई. माधवाने लग्न वगैरे केले नाही. विद्येशी त्याने लग्न लावले होते. सर्व प्रकारचे ज्ञान आपल्याला हवे असे त्याला वाटे. सर्व शास्त्रांचा त्याने अभ्यास केला होता. त्याच्या दिवाणखान्यात सर्व ज्ञान-विज्ञानाची पुस्तके आहेत. तेथे पृथ्वीचा नकाशा आहे. तार्यांचेही नकाशे आहेत. तेथे प्रयोगालयातील उपकरणे आहेत. तेथे सारे आहे.
माधवाने तत्तवज्ञानाचा अभ्यास केला होता, कायद्यांचा अभ्यास केला होता, त्याने सृष्टिशास्त्र व रसायनशास्त्र हयांचा अभ्यास केला होता. भूगर्भशास्त्र, वनस्पतिशास्त्र, ज्योतिषशास्त्र सर्वाच अभ्यास केला होता. भूगोल व खगोल दोन्हींचा त्याने अभ्यास केला होता. एवढेच नव्हे, तर भूतविद्या, प्रेतविद्या, पिशाच्चविद्या हयांचाही त्याचा गाढ व्यासंग होता. मंत्रतंत्रात तो प्रवीण होता. आयुर्वेद व आधुनिक औषधिविज्ञान हयातही तो पारंगत होता. त्याला अमुक एक माहीत नाही, अमुक एक येत नाही असे नव्हते. वाङमय, कला, शास्त्रे सर्वात त्याची बुध्दी चाले.
माधव रात्रंदिवस वाचीत बसे. रात्रंदिवस अनंत ज्ञानाची उपासना. बाहेर लक्ष जाईल म्हणून तो खिडक्या, दारे उघडीत नसे. त्याच्या अंगाला वारा कधी लागला नाही, सूर्यकिरणांनी स्पर्श केला नाही. किती तरी दिवसांत त्याने फुले पाहिली नाहीत, पाखरे पाहिली नाहीत; तारे पाहिले नाहीत, नद्या पाहिल्या नाहीत. पुस्तकातील फुले, फुलपाखरे तो पाही. नकाशात तो तारे पाही, नकाशात नद्या पाही. सारे ब्रह्मांड त्या दिवाणखान्यातील पुस्तकात व नकाशात होते.