Android app on Google Play

 

मे २८ - साधन

 

अमुक एक हवे किंवा अमुक एक नको असे न वाटणे याचे नाव वैराग्य . संकटकाळी , हे संकट नसावे असे न वाटता , परमेश्वराचे स्मरण असावे , आणि त्याच्याजवळ हे मागावे की , ‘ देवा , मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा देऊ नको . ’ देहाला मुद्दाम कष्ट देऊ नयेत , पण जेव्हा ते आपोआप येतात , तेव्हा मात्र ते आनंदाने सोसावेत . पुरुरव्याने दुष्कृत्य केले आणि त्यामुळे त्याला वैराग्य प्राप्त झाले ; तेव्हा त्याला दुष्कृत्य म्हणावे की सत्कृत्य ? तरीही , वैराग्यप्राप्तीचा वास्तविक हा काही मार्ग नव्हे हे खरेच . आपण शास्त्राविरुध्द कर्म करु नये , आणि दुसर्‍याने केले तर नावे ठेवू नयेत . न जाणो , परमात्म्याची इच्छा असेल तर त्यातूनच चांगले होण्याचा संभव आहे . प्रपंच मिथ्या मानावा आणि जो मिथ्या तो बरा असे वाटण्यात काय अर्थ ? तो जसा असेल तसा असू द्यावा . नाटकात नट जसे काम करतो , त्याप्रमाणे प्रपंचात आपण आपले काम करावे . तुमचा परमार्थही तुमच्या स्वाधीन नाही ; सदगुरुच तो तुमच्याकरिता करीत असतात ; तेव्हा तुम्ही कशाचीही काळजी करु नये . जे होईल त्यात आनंद मानीत राहावे . सदगुरुदर्शनाने पूर्वकर्मे , पापे , जळून जातात . तुमची पुढची काळजी सदगुरु घेतात ; तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये आणि काळजी करु नये . समाधानात आणि आनंदात असावे .

प्रपंच देवाचा मानून अभिमानरहितपणे तो करणे हा परमार्थ . परमेश्वराचे स्मरण ठेवून तोच कर्ता आहे असे मानणे , आणि सर्व काही त्याच्याकरिता करणे , म्हणजे देवाला अर्पण केल्यासारखेच आहे . फक्त कर्माच्या शेवटीच कृष्णार्पण म्हणणे , म्हणजे इतर वेळ त्याला विसरला असे नाही का होत ? देवापाशी ‘ मला तू आपला म्हण . हे मन तुझ्या चरणी अर्पण केले . मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न होवो . ’ असे मागावे ; नाही तर , जो राज्य द्यायला समर्थ आहे त्याच्याजवळ केरसुणी मागितल्याप्रमाणे होईल . भगवंताची मनापासून प्रार्थना करावी . आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवितो . आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते , परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो . त्याचप्रमाणे , मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते . ‘ तू जे देशील ते मला आवडेल , ’ असे आपण भगवंताला सांगावे , आणि भगवंताचे अखंड स्मरण ठेवावे . यापेक्षा भगवंताच्याजवळ जायला दुसरा मार्ग कोणता असणार ?