Android app on Google Play

 

मे ४ - साधन

 

नेहमी संतांची संगत धरावी . परमार्थाला संतांचे अधिष्ठान आवश्यक आहे . संत आपल्याजवळच असतात , त्यांना पाहायला कुठे जावे लागत नाही . चित्त शुध्द नसेल तर संतांच्या जवळ जाऊन तरी काय उपयोग होणार ? त्यांना आपण देहात पाहू नये . संत हे काही देहात नसतात , ते जे काही सांगतात त्या साधनात ते असतात . आपली विषयलालसा सोडल्याशिवाय त्यांची भेट होणे शक्य नाही . संताकडे एखादा चोर गेला तर त्याला त्याची खरी भेट होईल का ? तो ज्या हेतूने जातो त्या हेतूने त्याला फार तर तिथे चोरी करता येईल , परंतु संतांपासून जे खरे मिळवायचे ते साधेल का ? आपण जर चित्त शुध्द करुन गेलो तर आपल्याला त्यांची भेट होते ; आणि भेट झाल्यावर , जे त्रिभुवनातही मिळणार नाही ते ते देतात .

एकजण एका संताकडे नेहमी दर्शनाला येत असे . तिथे इतर मंडळीही पुष्कळ असत , पण तो कुणाशीही बोलत नसे , कुणी काही विचारले तर उत्तर देत नसे , सदा मुद्रा खिन्न असे . कुणालाही त्याच्याशी बोलावे असे वाटत नसे . असे काही दिवस गेले . पुढे एके दिवशी ते सदगुरु म्हणाले , " माझा तो वेडा कुठे आहे ? तो आज का आला नाही ? " हे त्याने ऐकताच तो आनंदाने उड्या मारु लागला , आणि जो तिथून गेला तो पुन : आलाच नाही ! तो कशाला येईल ? गुरुने एकदा आपल्याला ‘ आपले ’ म्हणावे हेच शिष्याला मिळवायचे असते . ते त्या गृहस्थाने ओळखले , आणि म्हणून त्याचे काम झाले . गुरु तुम्हाला ‘ तुम्ही माझे झाला ’ असे म्हणत असतानासुध्दा तुम्ही ते ओळखत नाही , कारण तुम्ही विषय बरोबर घेऊन आलेले असता , आणि विषयाची प्राप्ती व्हावी ही आठवणच जाते ; जसे , तहान लागल्यावर पाणी हवेसे वाटते , पण तेच पाणी पोटभर प्याल्यावर नकोसे वाटते , म्हणजे त्याची निवृत्ती होते . आपला यावर आज विश्वास बसायचा नाही ; पण हा विश्वास बसायला भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे . नामाने ते कार्य होते , म्हणून नामस्मरण करीत जावे . नामाने काळजी वाटणे नाहीसे होते आणि मग तळमळही आपोआप जाते .

मन आपल्याला विषयाचा आहेर करीत असताना आपण त्याला नामाचा आहेर करावा . आपण आपल्या अंत :करणाला नामाची धग लावावी ; त्याने अंत :करण उकळले की दोष वर येतील ; ते काढून टाकले की अंत :करण शुध्द होईल . शुध्द अंत :करण ठेवून नाम घेतले , तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल . नामानेच अंतरंग शुध्द बनते . नामानेच मन अंतरात प्रवेश करुन स्थिर बनते .