Android app on Google Play

 

मे ७ - साधन

 

मानाला कारण अभिमान होय . मी मोठा , असे मनाने घेतले म्हणजे मानाची गरज लागते . हा अभिमानच भगवंताच्या आणि आपल्यामध्ये आड येतो . हा अभिमान घालवायला , गुरुआज्ञेत राहणे , त्यांना शरण जाणे , आणि त्यांनी सांगितलेली साधने करणे , हे उपाय आहेत . पण ही साधने निरभिमानाने झाली पाहिजेत . हा अभिमान फार सूक्ष्म असतो . मी गुरुआज्ञेत राहतो , त्यांनी सांगितलेली साधने करतो , आता माझा अभिमान गेला , हे म्हणणेसुध्दा अभिमानाचेच बोलणे होय . खरे पाहता , अभिमान बाळगण्यासारखे आपल्याजवळ आहे तरी काय ? शक्ती , की पैसा , की कीर्ती ? जगात आपल्यापेक्षा कितीतरी लोक मोठे आहेत . पण मौज अशी की , भिक्षा मागणार्‍यालासुध्दा मोठा अभिमान असतो . " मी अमक्याच्या इथे भिक्षेला गेलो होतो , त्याने मला हट म्हटले तेव्हापासून त्याचा उंबरठा नाही चढलो मी . " असे तो म्हणतो , तेव्हा हा अभिमान आणि अपमान , ही काय चीज आहे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे . याला अगदी मूळ कारण देहबुध्दी . ही देहबुध्दी नाहीशी झाली पाहिजे . एखाद्या झाडाला खत घालीत गेले तर ते मरेल कसे ? मला लोकांनी बरे म्हणावे , मान द्यावा , शिव्या दिल्या तर वाईट वाटते , हे देहबुध्दीला खत घालण्यासारखे आहे . चांगले -वाईट , मान -अपमान , सर्व देवाला अर्पण करावे . वस्तुत : कर्तेपणच त्याच्याकडे सोपवावे . म्हणजे , त्या कृत्याचे परिणाम मनावर होऊ देऊ नयेत . व्यवहारात थोडा अभिमान लागतोच , पण तो केवळ कारणापुरता असावा . वरिष्ठाने नोकरांशी वागताना अभिमान पाहिजे , पण तो तितक्याचपुरताच ; त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये . ही देहबुध्दी , हा अभिमान , जायला सद्‍गुरुचे होऊन राहावे . निदान बळजबरीने तरी ‘ मी त्याचा आहे ’ असे म्हणावे . सदगुरु तुम्हाला नकळत तुमचा अभिमान दूर करतील .

परमार्थांत संतांचेच ऐकण्यात महत्त्व आहे . तेथे आईबापांचे का ऐकू नये ? तर ज्याचे मन त्याच्या ताब्यात आहे , ज्याचे मन स्थिर आहे , किंवा ज्याचे मन नेहमी भगवंतापाशी आहे , अशाचेच ऐकण्यात विशेष आहे . आपल्या देहबुध्दीची तर्‍हा मोठी विलक्षण असते . सगुणोपासना आपल्या सवयीच्या आड येते म्हणून मनुष्य ती करीत नाही ; फारच सोपे म्हणून तो भगवंताचे नाम घेत नाही ; आणि फुकट काय जेवायला घालायचे , म्हणून तो अन्नदान करीत नाही . असा मनुष्य फुकटच जायचा ! देहबुध्दीला ताळ्यावर आणण्यासाठी संतांच्या ग्रंथांच्या वाचनाची गरज आहे . पहाट झाली की थोडा उजेड , थोडा अंधार असतो , त्याप्रमाणे सध्या आपली स्थिती आहे ; देहबुध्दीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित उजेड आहे . हा देहबुध्दीचा अंधकार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला , भगवंताच्या अनुसंधानासारखा दुसरा कोणता उपाय असणार ?