Android app on Google Play

 

मे १७ - साधन

 

आपल्याला काही हवे असे वाटले आणि ते तसे झाले नाही , म्हणजे तळमळ लागते . परंतु सर्व परमात्माच करतो आहे असे मानले , म्हणजे काळजीचे कारण उरत नाही . आपण ‘ देव आहे ’ असे म्हणतो , पण आपला विश्वास तो खरा विश्वास आहे का ? एखादा मनुष्य बुडायला लागला , म्हणजे दगड जरी त्याच्या हाताला लागला तरी हा आपल्याला तारील असा त्याला विश्वास वाटतो , आणि तो त्याला धरुन आपणही त्याच्या बरोबर बुडतो . म्हणून म्हणतो , ‘ देव आहे ’ असा आपला खरा विश्वास नसतो , आपण नुसते तोंडाने म्हणतो एवढेच ! नाही तर आपल्याला काळजी का वाटावी ? प्रत्यक्ष देव पुढे उभा राहिला तरी आपल्यामागची काळजी आणि सुखदु :खे संपणार नाहीत . याचे कारण म्हणजे , परमेश्वरावरचा आपला विश्वासच डळमळीत असतो . वास्तविक , परमेश्वराची इच्छा प्रमाण मानल्यावर सुखदु :ख मानण्याचे कारण नाही . परमेश्वर सर्वव्यापी आहे . तो जसा माझ्यात आहे , तसा दुसर्‍यातही आहे ; म्हणून , दुसर्‍याने काहीही केले तरी आपल्याला त्याबद्दल काही वाटण्याचे कारण नाही . तरी अशी भावना ठेवून वागावे की , मी देवाचा आहे , तो माझा पाठिराखा आहे , आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही . हे सर्व नामस्मरण केल्याने साधते . म्हणून , मी आजपासून सतत नामस्मरण करीत राहाणार असा निश्चय करावा , आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू ठेवावा . परमेश्वराला शरण जाऊन ‘ मला तसे वागण्याची बुध्दी द्यावी ’ म्हणून त्याची प्रार्थना करावी . मनाला पहिल्याने थोडी बळजबरी करावी लागेल . लहान मुलांना शाळेत जाण्याकरिता सुरुवातीला थोडी बळजबरी करावी लागते . मुलीला प्रथम सासरी पाठवितानाही तसेच करावे लागते . आपण थोडा तरी नियम करावा ; उदाहरणार्थ , जेवायच्या आधी , रात्री निजताना , सकाळी उठताना , नाम घ्यायचेच ; भगवंताची आठवण करायचीच . असे केले तर ते आयुष्यात फार उपयोगी पडेल . प्रपंचाचा प्रयत्न आज जो चालू आहे तसाच करीत जावा , पण ‘ मला भगवंत हवा ’ असे म्हणत जावे . मनामध्ये भगवंताची आस ठेवावी , म्हणजे ती हळू हळू वाढत जाईल , आणि तिचे पर्यवसान ध्यासामध्ये होईल . समजा , एखाद्या माणसाला घर बांधायचे आहे ; ‘ मला घर बांधायचे आहे ’ असे तो म्हणत जातो , आणि त्यासाठी पैसे शिल्लक टाकतो . दागिने करायची वेळ आली तर ते नको म्हणतो , कारण पुढे घर बांधायचे आहे . हे जसे खरे , त्याचप्रमाणे ‘ भगवंत मला हवा ’ असे नुसते म्हणत गेल्याने देखील मनुष्य निव्वळ प्रपंचातच गुरफटून न जाता , विषय बेताने भोगेल . खरा ध्यास लागल्यावर , ती वस्तू मिळाल्यावाचून चैन पडणारच नाही .