Get it on Google Play
Download on the App Store

मे १० - साधन

भगवंताची उपासना । दूर करी सर्व यातना ॥ चित्ताची स्थिरता । भगवंताच्या उपासनेत निश्चितता ॥ देह जरी जीर्ण फार । तरी वासनेचा जोर अनिवार । हे जाणून चित्ती । एक भजावा रघुपति ॥ ह्रदयी करता भगवंताचे ध्यान । नामाविण उच्चार दुजा न जाण । त्यात व्यवहाराचे जतन । न दुखवावे कोणाचे अंत : करण । असा नेम ज्याच्यापाशी । राम तेथील रहिवाशी ॥ मी रामाचा , रामा तू माझा । हाच अखंड असावा हव्यास ॥ ऐसे ध्यावे रामाला । की जे जीव प्यार झाले मला ॥ आता याहून दुजे न सांगणे काही । रामाविण जगू नाही ॥ जे जे होणार ते होतच जाते । ते भगवंताच्या इच्छेने घडते । ऐसे आणणे मना । याचे नाव उपासना ॥ अखंड रामसेवा ज्याला लाभली । धन्य धन्य त्याची माउली ॥ स्वार्थरहित रामसेवा । याहून लाभ दुजा न जीवा ॥ राम ठेवा मनी । तो ध्यात जावा मानसपूजनी ॥ वाचेने भगवंताचे नाव । कायेने भगवंताची सेवा । चित्ती भगवंताचे ध्यान । आपण राहावे रामर्पण । याहून अन्य सेवा कोणतीहि न जाण ॥

उपासना असावी बळकट । तेथे नसावी कशाची अट ॥ उपासनेचा असावा जोर । ज्याने होईल मन स्थिर ॥ आपले जीवन ज्याचे हाती । त्याची नेहमी ठेवावी संगति ॥ जे जे काही मी करावे । त्याला परमात्मा साक्षी हे जाणावे ॥ मनी न सोडावा धीर । आहे म्हणावे माझा रघुवीर ॥ करावे भगवंताचे चिंतन । होईल स्वत : चे विस्मरण ॥ सर्व आहे रामाधीन । आपण निमित्ताला कारण ॥ रामावर ठेवावे चित्त । जैसे प्रपंची असावे वाटते वित्त ॥ उपासनेचे नर । त्यांनी राहावे खबरदार ॥ आजवर केली भगवंताची उपासना । पुढे त्यात न येऊ द्यावा उणेपणा ॥ सर्वांचे ऐकावे । परी उपासनेपासून दूर न व्हावे ॥ राम माझा देता घेता । राम माझ्या भोवता ॥ रामाविण जगी दुजे । न ठेवावे आणिक परते ॥ एक सदगुरुआज्ञा प्रमाण । हीच रामसेवा जाण ॥ थोर थोर ऋषिमुनि । यति संत साधु यांनी । एकच केले खास । रामावाचून न राहू दिले जीवास ॥ ठेवावा रामावर पूर्ण विश्वास । न करावे उपासतापास ॥ उपासनेत राहावे आपण । हेच रामाचे सान्निध्य जाण ॥ स्वार्थरहित सेवा । तीच पावे देवाधिदेवा ॥ जे जे होते काही । ते ते राम करतो पाही । हा एकच विश्वास । समाधानाचा मार्ग सत्य खास ॥ जेथे परमात्म्याची सत्ता । तेथे न चाले कोणाचे सर्वथा । म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये । समाधान राखीत जावे ॥