चीनचे जनक सन्यत्सेन 3
त्यांनी सम्राटाला तार केली, “गादी सोडा. तुम्ही राजीनामा द्या.” अशा तारा जगातील राष्ट्रांनाही त्यांनी केल्या. युआन शिकाईने राज्याचा त्याग केला व लेकसत्तेचा प्रेमी बनला. राजाने १२ फेब्रुवारी १९१२ रोजी राज्यत्यागाची घोषणा केली. घोषणेत सम्राट म्हणतो, “कोट्यावधी लोकांच्या इच्छेला मी विरोध कसा करू? युआन शिकाईने लोकसत्ताक नेत्यांच्या सहकाराने नवीन शासनपद्धती निर्मावी. मांचू, चिनी, मोगल, मुसलमान व तिब्ती सारे नवीन प्रजासत्ताकात गुण्यागोविंदाने नांदोत.” नानकिंग येथे प्राचीन मिंग राजाची समाधी आहे. सन्यत्सेन तेथे गेले. त्यांनी प्रार्थना केली व हृदयस्पर्शी भाषण केले. चिनी स्वातंत्र्याचा इतिहास सांगून म्हणाले, “पूर्व आशियातील रिपब्लिकच्या अध्यक्षपदाची मी दीक्षा घेत आहे.” सर्व चीनभर हा दिवस पाळला गेला. आशियातील हे पहिले रिपब्लिक!
सन्यत्सेनचा महान त्याग
युआन शिकाई महत्त्वाकांक्षी होता. काही सरदार म्हणू लागले, “युआन शिकाईनस राष्ट्राध्यक्ष करा.” सन्यत्सेन मानाचे भुकेले नव्हते. ते म्हणाले, “युआन शिकाई प्रजासत्ताकाचे पालन करण्याचे वचन देईल तर मी राजीनामा देतो,” १४ जानेवारी १९१३ रोजी त्यांनी राजीनामा दिला. राष्ट्रपुरुषाने संताची वृत्ती दाखविली.
युआन शिकाई सम्राट बनतो
परंतु युआन शिकाईचे निराळे हेतू. त्याने पार्लमेंट बरखास्त केले व शेवटी स्वत:ला सम्राट म्हणून त्याने घोषविले. सन्यत्सेनला त्याने हाकलले. सन्यत्सेन जपानमध्ये गेले. या सुमारास पहिले महायुद्ध सुरू झाले. युआन शिकाई मेला. सन्यत्सेन परत येऊन त्यींनी पुन्हा दक्षिणेकडचे लोकसत्ताक सरकार स्थापिले. उत्तरेकडचे सरदार व हे दक्षिणेकडचे लोकसत्ताक सरकार यांचे पटेना. जपानने चीनजवळ २१ मागण्या मागितल्या, इंग्लंडने जपानजवळ गुप्त तह केला व चीनचा प्रदेश पुढे तहाच्या वेळेस द्यायचे कबूल केले. चीननेही दोस्तांच्या बाजूने युद्धात पडल्याचे घेषित केले. पुढे युद्ध संपले, तेव्हा इंग्रज व जपानी यांचा गुप्त करार प्रकट झाला. चीनमध्ये असंतोष भडकला. चिनी शिष्टमंडळ व्हर्सायच्या तहाच्या वेळेस चीनची बाजू मांडायला गेले. परंतु अपमान होऊन ते परतले. सन्यत्सेन रशियाकडे वळले. रशियन क्रांती झाली होती. रशियाच्या वतीने जाफे बोलणी करत होते. रशियाने चीनपासून घेतलेल्या सवलतींचा त्याग केला. सन्यत्सेन व जाफे दोघांच्या सह्यांचे पत्रक निघाले. सन्यत्सेनने चँग-शेकला रशियात लष्करी शिक्षणासाठी पाठविले आणि मॉस्कोहून बोरोडिन हा रशियन सल्लागार आला.
कोमिंटांगमध्ये नवीन प्राण
सर्व पक्षांचा समन्वय करून सन्यत्सेनने कोमिंटांग पक्ष स्थआपला होता, त्यात आता कम्युनिस्टही सभासद म्हणून गेले. सन्यत्सेनच्या पत्नीने विचारले, “त्यांना का घेता?” तो म्हणाला, “संस्थेत नवीन तेज यावे म्हणून!”