जर्मन महाकवी गटे 2
तरुण वर्टरची दु:खे
लॉटचेन नावाचया तरुणीवर त्याचे प्रेम बसले. परंतु तिचे दुस-याशी लग्न ठरले होते. एक दिवस गटे दोघांचा निरोप घेऊन जातो. परंतु तो अती दु:खी झाला. आत्महत्या करावी असे त्याला वाटते. परंतु गटेचा फौस्ट ज्याप्रमाणे विषाची कुपी फेकून पुन्हा झगडायला उभा राहतो, त्याप्रमाणे गटे ‘तरुण वर्टरची दु:खे’ ही कादंबरी लिहून तो दु:खभार दूर करतो. पुढे जीवनयात्रेला निघतो. वर्टर हा प्रेमभंगामुळे आत्महत्या करतो. हे पुस्तक म्हणजे भावनांचा कल्लोळ आहे. जर्मनीत त्याच्या १६ आवृत्त्या निघाल्या. नेपोलियनने इजिप्तवर स्वारी केली, तेव्हा ही कादंबरी त्याच्या खिशात होती. त्याने ती सात वेळा वाचली होती. जर्मनीतील तरुण-तरुणींना तर वेड लागले. कादंबरीतील वर्टरप्रमाणे तरुण पोषाख करू लागले. मुली कादंबरीतील नायिकेप्रमाणे नटू लागल्या. प्रेमभंग झालेले तरुण आत्महत्या करू लागले. गटेचा हा का संदेश होता? तो तर पुढे जात होता. स्वत:वरचे मरण वर्टरवर सोपवून तो विजयी वीराप्रमाणे पुढे चालला.
वायमार येथे वास्तव्य
वायमार येथील छोट्या राज्याच्या दरबारात तो राहिला. वायमार त्याने साहित्याचे केंद्र बनविले. हळूहळू त्याची उन्मादक वृत्ती शांत होत होती. तो सुखी व विलासी दिसला तरी गरिबांविषयी त्याला प्रेम वाटे. तो राजाला नमस्कार करी आणि गरीब माणसांनाही करी. खाणीतील लोकांना भेटून आल्यावर तो म्हणाला : “ज्यांना आपण खालच्या वर्गाचे समजतो, तेच देवाच्या दृष्टीने परमोच्च असतात. त्यांची साधी राहणी, सरलता, निष्ठा, सहनशीलता, थोडे काही मिळाले तरी आनंदी होणे! किती दैवी गुण त्यांच्या ठायी असतात. माझे प्रेम त्यांच्याकडे धावते.” एकदा त्याने घरी एका बुकबाइंडरला बोलाविले होते. तो काम करीत होता. गटे त्याच्याजवळ बोलत बसला होता. तो गेल्यावर गटे म्हणाला, “त्याचा प्रत्येक शब्द सोन्याच्या मोलाचा होता. त्याच्याबद्दल मला किती आदर वाटला!”
तो अनेकांना मदत करी. कोणाला नोकरी लावून देई, कोणाला शिकण्यासाठी मदत करी. दुस-याचे दु:ख पाहून तो दु:खी होई. त्याचा आत्मा विशाल होता. व्यापक होता.
गटेला सारे ज्ञान हवे असे वाटे. अनेक शास्त्रांचा तो अभ्यास करू लागला. शरीर-शास्त्र, रंग-प्रक्रिया, नाना अभ्यास. ‘वनस्पतींची स्थित्यंतरे’ या ग्रंथात तो म्हणतो : “पानांचा परिपूर्ण विकास म्हणजेच फूल. फुले म्हणजे पानांचे काव्य!”
मनोविकासासाठी शास्त्राभ्यास
गटे सर्व शास्त्रांचा अभ्यास करी. परंतु तो शास्त्रज्ञ नव्हता, तो कवी होता. मग इतर शास्त्रांत ही लुडबूड का? गटे एके ठिकाणी म्हणतो, “कोणतेही एक काम नीट करायला हवे असेल तर अनेकांचे ज्ञान हवे. मग ते परिपूर्ण व निर्दोष असे काम संपूर्णतेचे प्रतीक होऊ शकते.” मनाला सुसंस्कृत, विशाल करण्यासाठी गटे विज्ञानाचा अभ्यास करी.