जर्मन महाकवी गटे 5
फ्रेंच क्रांती : नेपोलियनशी भेट
फ्रेंच क्रांती झाली होती. फ्रेंचांच्याविरुद्ध युरोपातील राजे-महाराजे एकवटले. परंतु १७९४ मध्ये फ्रेंचांनी त्यांचा पराजय केला. गटेला युद्ध बघायला जर्मन सेनापतीने नेले होते. पराजय झाल्यावर गटे म्हणाला : “एक नवे युग आता सुरू होत आहे. जुना जमाना संपला.” त्याची ती भविष्यवाणी होती. नेपोलियन सर्वसत्ताधीश होण्यापूर्वी जर्मनांनी फ्रेंचांना पुन्हा एकदा पिटाळले होते. फ्रेंचांनी शांतपणे मागे जायचे ठरवले, परंतु एक फ्रेंच शिपाई चुकून मागे राहिला. लोक त्याला पकडून ठार करणार होते. गटे एकदम पुढे होऊन म्हणाला : “व्यक्तीवर सूड उगविणे चांगले नाही!” त्यांनी त्या फ्रेंच सैनिकास जाऊ दिले. पुढे नेपोलियन सर्वसत्ताधीश झाला. सम्राट झाला.१८०६ ऑक्टोबर १४ ला जेनाच्या लढाईत जर्मनांचा बिमोड झाला. वायमारमधील लोक पळू लागले. विजयी फ्रेंच शिपाई लुटालूट करीत येणारच. परंतु गटे निर्भयपणे तेथेच राहिला. आणि फ्रेंच शिपाई शहरात घुसले. गटेच्या घरातही घुसले. गटेच्या नोकरांनी त्यांना दारू, जेवण, जे पाहिजे ते दिले. चाळीस जणांना जेवण देऊन झोपायची व्यवस्था केली. गटे वर आपल्या खेलीत गेला. रात्री पुन्हा दारू पिऊन दोन-चार सैनिक आले. दार ठोठावू लागले. हातात मेणबत्ती घेऊन गटे खाली आला. त्याने त्यांचीही व्यवस्था केली. “सारे मिळाले ना?” विचारून वर गेला. परंतु ते दारुडे त्याच्या खोलीकडे आले. गटेजवळ भांडू लागले. इतक्यात गटेची प्रेयसी आली. तिने नोकरांच्या मदतीने दारुड्यांना जिन्याखाली लोटले. दार लावून घेतले. गटे वाचला. गटेने आपल्या प्रेयसीजवळ धार्मिक पद्धतीने विवाह लावला नव्हता. त्याचा असल्या विधींवर विशावस नव्हता. परंतु या प्रसंगानंतर दोनच दिवसांनी त्याने तिच्याशी विधिपुरस्सर विवाह केला! “जर्मनीचा पराजय होत आहे, आणि याला लग्नाचे सुचत आहे.” लोक म्हणाले, गटे म्हणाला, “लोकांना गंभीर भावना कळत नाहीत!” १८०८ मध्ये जर्मनीतील एका गावी नेपोलियनची युरोपातील राजेमहाराजे यांच्याशी भेट होती. रशियाचा सम्राट लांबून मुद्दाम आला होता. चार मोठे राजे, चौतीस मांडलिक राजे जमलेले. गटे गेला नाही. परंतु त्याच्या राजाने त्याला बोलाविले. नेपोलियनने गटेला भेटायला बोलविले. एक सत्तासम्राट तर एक विचारसम्राट. नेपोलियनने अगदी जवळ बोलाविले. तासभर मुलाखत झाली.
“तुम्ही जर्मनीचे सर्वश्रेष्ठ नाटककार, कवी!”
“शिलर, लेसिंग हेही मोठे आहेत.”
“तुम्ही रशियन सम्राटाला एखादी कृती अर्पण करा ना.”
“मी असे करीत नसतो.”