जर्मन महाकवी गटे 11
नियतिवादी
गटे काहीसा नियतिवादी होता. आपण कितीही धडपडलो तरी काही गोष्टी जणू अपरिहार्यच होतात. तेथे आपला विवेक, आपले सदगुण, आपली कर्तव्यबुद्धी यांचा टिकाव लागत नाही. नियतीला जे योग्य वाटते ते ती करायला लावते. आपल्याला तो मार्ग चूक वाटतो; परंतु नियती तिच्या मार्गाने खेचून नेते. तिची इच्छाच बलवती ठरते! याचा अर्थ प्रयत्नच करू नये असा नाही. परंतु जेथे चालणारच नाही तेथे आदळआपट करून काय होणार! या दृष्टीने गटेच्या जीवनात अखेरची शांती आली. त्याचे सारे जीवन म्हणजे दैवी आणि आसुरी वृत्तींचा लढा आहे. गटे म्हणजेच फौस्ट. फौस्टला सैतान खेचू पाहतो, परंतु शेवची तो सुटतो. गटेच्या हृदयात वासना, विकार, विचार, ध्येये सर्वांचे द्वंद्व! तो लिहितो : “लोकांना वाटते, मी सुखात आहे. परंतु गेल्या ७५ वर्षांत २४ तासही खरी मानसिक शांती मला मिळाली नाही!”
तुकारामाप्रमाणे तोही म्हणाला असेल, “याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा!”
फौस्ट शेवटच्या क्षणी मुक्त होतो. दैवी वृत्तीचा विजय होतो. गटेही मनात झुंजत शेवटच्या क्षणी ‘प्रकाश, अधिक प्रकाश’ करीत त्या तेजोमय अनंतात विलीन होतो.
जर्मनीच्या, नव्हे मानवजातीच्या महान कवींद्रा, तुला नवभाराताचा प्रणाम! जे जे क्षुद्र आहे त्याला दूर सारून पुढे जाण्याची तुझी जिज्ञासा, सा-या विरोधांतून आम्हाला सुसंवाद निर्मायचा आहे. अंधारातून प्रकाशाकडे जायचे आहे. तुझे महान जीवन ती प्रेरणा देवो.