गुलामगिरी नष्ट करणारा लिंकन 2
प्रामाणिक वकील
खोटा खटला तो कधी घेत नसे. एकदा एक पक्षकार आला व म्हणाला, “माझा खटला कायदेशीर आहे. तुम्ही चालवा. हे पैसे मिळालेच पाहिजेत.” लिंकन म्हणाला, “तुमची बाजू कायदेशीर असली तरी नैतिक नाही आणि तुम्ही धट्टेकट्टे आहात. एवढे पैसे प्रामाणिक श्रमानेही तुम्ही मिळवू शकाल!”
महत्त्वाकांक्षी पत्नी
लिंकनची आई लहानपणी वारली. एकुलती एक बहीण वारली. ज्या मुलीवर त्याचे प्रेम होते, तिच्याशी तो लग्न करणार होता, ती मेली. एके दिवशी वादळी पाऊस वर्षत होता. तो दु:खाने वेडा होऊन म्हणाला, “ती त्या वादळात तिथे, मातीत एकटी आहे. ती एकटी कशी राहिल तिथे?” परंतु हेही दिवस गेले. आणि मेरी टॉड नावाच्या एका उथळ पण महत्त्वाकांक्षी स्त्रीचे त्याने पाणिग्रहण केले. लिंकन सर्वांना आवडे. फक्त ही नखरेबाज, प्रतिष्ठित पत्नी त्याच्यावर नाराज असे. त्याचा वेडा-वाकडा पोशाख, ओबडधोबड वागणे तिला रुचत नसे. तो वाटेल त्याच्याजवळ बसे, बोले. कोंबड्या, डुकरे, यांच्यावर चर्चा करी. ती म्हणायची, “हमाल आणि पाणक्ये यांच्यातच वागायची तुमची लायकी!” ते हसून म्हणे, “मला हे सारे आवडतात; त्याला मी काय करू?”
मुलांवर फार प्रेम
लिंकन कोमल मनाचा, प्रेमळ वृत्तीचा. त्याची मुले त्याच्या बैठकीत धुडगूस घालीत. कागद फाडीत, टाक बोथट करीत, पिकदाणी उपडी करीत. एकदा एक मित्र म्हणाला, “थोबाडीत द्या.” लिंकन म्हणाला, “खेळू द्या त्यांना. मोठेपणी त्यांनाही चिंता आहेतच.”
एकदा त्याची पत्नी चार वर्षाच्या मुलाला आंघोळ घालीत होती. तो बंबू तसाच निसटला आणि उघडानागडा रस्त्यात दूर जाऊन उभा राहिला. लिंकन पोट धरून हसू लागला. चिडलेली माता म्हणाली : “हसता काय? जा. त्याला आधी आणा.” लिंकनने तो ओलाचिंब बाळ उचलून आणला, त्याचे पटापट मुके घेतले.