जर्मन महाकवी गटे 3
शिलारशी मैत्री
त्या वेळेस जर्मनीत लहानमोठे अनेक लेखक होते. महान तत्त्वज्ञ होते. परंतु गटेची कोणाजवळ विशेष मैत्री नव्हती. शिलर या थोर नाटककाराची व गटेची गट्टी जमली. ११ वर्षे ही मैत्री टिकली. शिलरच्या मरणाने तुटली. या काळातच शिलरने एकाहून एक सरस नाटके लिहिली.
परिपूर्णता हे ध्येय
गटे घाईघाईने काही करीत नसे. त्याची नाटके, कादंब-या कित्येक वर्षे चालत. तो पुन:पुन्हा लिही. ‘फौस्ट’ नाटकाचा आरंभ तारुण्याच्या ऐनभरात तर शेवट मरणाच्या थोडे दिवस आधी. ५० वर्षे ते नाटक तो लिहीत होता. त्याने जवळजवळ ६० पुस्तके लिहिली. भावगीते, शोकगीते, उपहासगीते, महाकाव्ये, निबंध, कादंब-या, नाटके, भुताखेतांच्या, प-यांच्या अदभुत गोष्टी, शास्त्रीय ग्रंथ- सारे प्रकार त्याच्या वाङमयात आहेत. त्याचा सर्वांत महान ग्रंथ म्हणजे ‘फौस्ट’. त्याचे पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग आहेत.
फौस्ट
फौस्ट हा फार जुना विषय. फौस्टवर यात्रांतून नाटके होत. इंग्लंडमधील नाटककार मार्लो याने फौस्टवर शोकांत नाटक विहिले आहे. मूळ गोष्ट अशी की, फोस्ट सैतानाजवळ करार करतो. सैतानाने १२ वर्षे त्याला सुखे पुरवावीत. १२ वर्षानंतर फौस्टने त्याचे गुलाम व्हावयाचे. जुन्या दंतकथेप्रमाणे फौस्ट कायमचा नरकात पडतो. मार्लोच्या नाटकातील त्याचे ते त्या वेळचे आत्मगत भाषण हृदयाला भिडते. गटेने या कथानकात महत्त्वाचा भरक केला. फौस्ट सैतानाला म्हणतो, “तू सुखे दे. जर ‘हे क्षणा, तू किती सुंदर!’ असे मी म्हटले तर मी तुझा गुलाम.” असा करार करून गटेने फौस्टला मुक्त केले आहे. मानवी आत्म्याला वैषयिक सुखे गोड वाटली तरी ती चिरशांती देऊ शकणार नाहीत. सैतानाजवळ करार पुरा होणे शक्य नाही. मानव कायमचा नरकाग्नीत पडणे ही कल्पनाच गटेच्या उदार बुद्धीला सहन होत नाही. मनुष्याचा उद्धार होईल आज ना उद्या, अशी अमर आशा गटेचा फौस्ट देतो. जगातील सर्व सुखांची चव घेणारा, सर्व ज्ञानविज्ञान पालथे घालणारा, शेवटी आंधळा झालेला फौस्ट, “दलदल हटवावी, लोकांची सेवा करावी, आरोग्य होईल, मुलांचे गाल गुबगुबीत होतील” यात कृतार्थता मानतो. गटेच्या जीवनाचे हे सार आहे.