जर्मन महाकवी गटे 6
“आमच्या देशात, चौदाव्या लुईच्या काळात तर अनेक लेखक असे करीत.”
“त्या लेखकांना मागून पश्चात्तापच झाला असेल!”
“तुम्ही ज्यूलियस् सीझरवर एक नाटक लिहा. व्हॉल्टेअरने लिहिले आहे. पण तुम्ही सरस लिहा. दु:खान्त नाटक म्हणजे राजेमहाराजे व जनता यांना शिकवणारी शाळा. सीझर जगता तर मानवजातीला सुख देता. मनातील विचार, कल्पना प्रत्यक्षात आणता. तुम्ही लिहाच त्याच्यावर आणि पॅरिसला या ना.” असे बोलणे चालले. इतक्यात पोलंडहून लष्करी अधिकारी आल्याचा निरोप आला. नेपोलियन एकदम उठला. गटेजवळ जाऊन म्हणाला :
“तुमचे वय किती?”
“साठ.”
“प्रकृती छान आहे तुमची! मुलेबाळे आहेत?”
गटे आता जायला अधीर होता. नेपोलियनने जायला परवानगी दिली. तो गेल्यावर नेपोलियन म्हणाला : “खरा मनुष्य आहे!”
गटेला थोडा अभिमान वाटला. फ्रेडरिक दि ग्रेट हा जर्मन राजा पूर्वी व्हॉल्टेअरला जर्मनीत बोलवी. आज जर्मनीच्या कवीला नेपोलियनसारखा सम्राट पॅरिसला आग्रहाने बोलावीत होता. तिकडे रणांगणातील पराजयाने जर्मनीची मान खाली झाली होती, परंतु साहित्यिक विजयाने गटेने ती उंच ठेवली होती.
नेपोलियन व बायरनबद्दल आदर
गटेला जेथे जेथे प्रभावी व्यक्तिमत्त्व, साहस, अपूर्वता दिसे, तेथे तो मान लववी. नेपोलियन त्याला प्रखर झंझावाताप्रमाणे वाटला. आणि इंग्लंडमधला बायरन्! त्याची उच्छृंखल वृत्ती, त्याचे भावनोत्कट काव्य, इंग्लंडमधील त्याचा छळ, त्याचे युरोपात येणे, ग्रीकांच्या स्वातंत्र्यसुद्धात सामील होणे, आणि अकाली मरणा-या सर्व घटनांचा गटेवर परिणाम झाला. अकस्मात उदयाला आलेला हा तेजोगोल पाहून गटे दिपला. इंग्रज लेखक कार्लाईल म्हणायचा :“ बायरन् मिटा, गटे उघडा.” परंतु हा गटे म्हणायचा: “बायरन् युरोपातील सर्वांत मोठी व्यक्ती आहे.” एकाने विचारले: बायरन् मानवजातीला काय शिकवणार? काय आहे त्याच्या जीवनात?” गटेने उत्तर दिले: “तो जोर, ते साहस, याचा का मानवावर परिणाम नाही होणार? सत्य शिव सुंदराच्या ठोकळेबाज कल्पना नका घेऊन बसू. जे जे भव्य, दिव्य आहे, अपूर्व आहे, महान आहे, त्याचा परिणाम होत असतो. आपण ते समजून घेतले पाहिजे.” बायरन् मरण पावल्यावर गटे दु:खी झाला.