Get it on Google Play
Download on the App Store

जर्मन महाकवी गटे 8

अनेक भेटायला येत, गटे चर्चा करी. राष्ट्रीय कवितांची टिंगल करी. मागे १७९४ च्या सुमारास त्याला ‘फ्रेंचांच्या द्वेषासंबंधी कविता करा’ म्हणून सांगण्यात आले. त्याने केल्या नाहीत. तो म्हणाला, “मला द्वेष वाटत नाही. मी कशा करू? जे मी अनुभवले नाही ते मी कधी लिहिले नाही.” मरणाआधी थोडे दिवस तो म्हणाला, “आकाशात उंच उडणारा गरुड खाली सशाकडे बघतो. तो ससा कोणत्या देशातला आहे, हे नाही पाहत.” आणि एका प्रेयसीची प्रेमपत्रे त्याच्याजवळ होती. ती तिच्याकडे तो परत करतो आणि लिहितो, “ही पत्रे वाचायला पूर्वी हृदय किती अधीर असे! कितीदा वाचली तरी तृप्ती होत नसे. पत्रांनो माहेरी जा. त्या हृदयाकडे जा. ते हृदयही भरलेले असेल. त्या डोळ्यांतील प्रकाश तुमच्यावर पडून तुम्ही प्रकाशमय व्हाल. ज्या हाताने लिहिले तो हात तुम्हांला पुन्हा स्पर्श करील. आणि तुम्ही पूर्वीची सुवर्णकथा सांगाल.” १७ मार्च १८३२ रोजी प्रसिद्ध शस्त्रज्ञ हंबोल्ट याला त्याने मोठे पत्र लिहिले. हेच त्याचे शेवटचे महत्त्वाचे पत्र. बाल्झाक, प्लुटार्क वाचीत होता. एका तरुणाने अल्बम पुढे केले. त्यावर कवितात्मक संदेश लिहिला. मरणाआधी ४८ तास एका तरुण जर्मन स्त्री-कलावंताला मदत करण्यासाठी काढलेल्या पत्रकावर त्याने सही केली. २० मार्च रोजी त्याच्या छातीत कळा येऊ लागल्या. तो अस्वस्थ झाला. क्षणात बिछान्यावर पडे, क्षणात आरामखुर्चीत. विव्हळत होता. पहाटे जरा झोप लागली. २१ मार्च हा दिवस उजाडला. फ्रेंच क्रांतीवरचे एक पुस्तक त्याने मागितले. जरा पाने चाळली. नंतर थोडे खाणे घेतले. २१ तारीख गेली.

“आजची तारीख?” त्याने विचारले.

“बावीस.”

“वसंत आला तर! आता बरे वाटेल.”

नऊ वाजले सकाळचे. जरा झोप लागली. झोपेत स्वप्ने. म्हणायचा, “ते पाहा त्या स्त्रीचे सुंदर डोळे! कुरळे, काळे केस! काळ्या पार्श्वभूमीवर... असे स्वप्नात बोले. एकदम डोळे उघडून म्हणाला, “त्या खिडक्या साफ उघडा. प्रकाश भरपूर येऊ दे आत. अधिक प्रकाश. अधिक प्रकाश.” खिडक्या उघडण्यात आल्या.

“फ्रेडरिक, तो चित्रसंग्रह दे रे. अरे तो नव्हे, काय नाही? मला का स्वप्नात दिसते आहे सारे?”

दहा वाजले. लहान ऑनिनीला म्हणाला, “ये बाळ जवळ. तुझा लहान हात माझ्या हातात दे.” पुन्हा शांत पडला. हात हवेत वर करून मधल्या बोटाने काही लिहीत होता. ‘डब्लू’ अक्षर लिहिले, जवळचे म्हणाले. तो हात हळूच खाली आला. बाराची वेळ आली. आणि हा महान सूर्य मध्यान्हीला मावळला. जन्मला त्याच वेळेस मरण पावला.