जर्मन महाकवी गटे 9
महान जीवन
८३ वर्षांचे ते महान जीवन. त्या जीवनातील किती प्रसंग सांगणार? त्याच्या ग्रंथातले उतारे तरी किती देणार? कै. प्रा. गुणे यांनी ‘तरुण वर्टरची दु:खे’ ही कादंबरी मराठीत आणली. बाकी गटे तसाच आहे. त्याची भावगीते अपूर्व आहेत. नादमधुरता विलक्षण आहे. अर्थ आणि शब्द यांची अशी मिळणी दुर्मिळ. जे लिही ते घआसून पुसून हि-याप्रमाणे करून जगाला देई. ‘लाट्झ’ नाटक त्याने तीनदा लिहून काढले. घाईने नीट होत नाही म्हणायचा. वर्षांनुवर्षे त्याच्या मनात कल्पना वाढत असत. ‘एरमाँट’ या नाटकातील काही भाग लिहून झाल्यावर उरलेला भाग त्याने बारा वर्षांनी पुढे लिहिला.
आदर नि कृतज्ञता
तो महान असूनही विनम्र होता. बायरनला त्याने डोक्यावर घेतले. हर्डरला लिहिले : “माझ्यावर जहरी टीका केलीत तरी चालेल. परंतु माझ्या पुस्तकावरचे मत कळवा. मला त्यातून शिकायला मिळेल.” शेक्सपिअरवर तरुणपणात लेख लिहिला. त्यात म्हणतो: “मित्रांनो, आपल्या आत्म्याच्या उड्या महान असतात. त्यांना हे आयुष्य अपुरे पडते. कितीही जगलो तरी शेवटी सारे शून्य व्हायचे. मला मीच सर्वस्व आहे. माझ्याद्वारेच मला सारे समजायचे. ज्यांना अनुभव आहे ते असेच म्हणतील. मला मोठमोठी पावले टाकीत जायला हवे. शेक्सपिअर! मित्रा, अजून तू आमच्याबरोबर आहेस. तुझ्याशिवाय कोणाजवळही मी राहू इच्छित नाही. तुझा पाईक म्हणून तरी तुजजवळ राहू दे.” लहानसहान चिठ्ठीही मित्रांची, मोठ्यांची जपून ठेवी. हर्डरची चिठ्ठीही त्याने जपून ठेवली होती. या जगात प्रत्येकापासून आपणास शिकता येईल, असे म्हणे.
निसर्गाचा प्रेमी
निसर्गावर त्याचे अपार प्रेम. वादळात, पावसातही हिंडायला जायचा. रात्र असो, गारा पडत असोत. एकदा प्रचंड पादळात जाऊन आल्यावर केलेल्या कवितेत तो म्हणतो, “हे देवी शक्ती, ज्याच्याबरोबर तू आहेस, तो पावसाला, वा-याला भिणार नाही, हे देवी शक्ती, गारा पडोत, मेघ गडगडोत, हा त्यांना आदराने तोंड देईल, तो वर चंडोल उडत आहे त्याप्रमाणे!” त्याची निसर्गगीते मनोहर आहेत.
“किती सुंदर, दिव्य भव्य जग
हा तेजस्वी सूर्य
आणि ही पृथ्वी किती आनंदी
उंच फांद्यांतून कळ्या तोंडे
खुपसत आहेत.
झाडाझुडपांतून पाखरांचे
आनंद आवाज येत आहेत
अनंत! परमानंद!!
सर्वांच्या हृदयांत आनंद
हे पृथ्वी, हे सूर्यप्रकाशा,
किती हा आनंद, केवढी उत्कटता!”