Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण २२

सर्वात अगोदर कोलंबियाचं जहाज त्यांच्याजवळ पोहोचलं. त्या जहाजाचे कप्तान फिलिप आणि इथे कप्तान थॉमस एकमेकांसोबत वायरलेसद्वारे संवाद साधतात. कप्तान फिलिप यांना अभिजीतची कल्पना आवडते, ते कप्तान थॉमस यांचा प्रस्ताव स्विकारतात. त्यानुसार दोन्ही जहाज एकमेकांना समांतर उभी केली जातात. कोलंबियाच्या जहाजामधील ठराविक वैज्ञानिक, संशोधक आणि सैनिकांना ब्राझिलच्या जहाजामध्ये पाठविण्यात येतं आणि ब्राझिलच्या जहाजामधून स्त्रिया, लहान मुलं आणि वयस्करांना कोलंबियाच्या जहाजामध्ये पाठविण्यात येतं.

 

कोलंबियाच्या जहाजामध्ये गेलेली ब्राझिलची माणसं लवकरच आपण जमिनीवर पाय ठेवू या आशेने अभिजीतच्या कल्पकतेविषयी बोलत असतात. त्यांचं बोलणं तिथे असलेल्या दोन स्त्रिया ऐकतात. पैकी एक स्त्री त्यांना अभिजीतबद्दल विचारते. खात्री पटताच धावत जाऊन त्या दोघी कप्तान फिलिप यांना भेटतात. कप्तान फिलिप लगेचच ब्राझिलच्या जहाजावर अभिजीतला वायरलेसमध्ये येऊन बोलायला सांगतात. कोलंबियाच्या जहाजाच्या कप्तानाचं भले माझ्याशी काय काम असावं? असा विचार करत अभिजीत वायरलेस रुममध्ये जातो.अभिजीत आल्याचं कळताच त्याला समोरुन आवाज येतो, ‘‘अभडू, आय लव्ह यू...’’

 

अभिजीत लगेच ओळखतो. हा आवाज श्रेयाचा असतो. तो त्या दोघींना तिथेच थांबायला सांगतो. धावतच तो स्टिफनच्या रुममध्ये जातो, त्याला काही न सांगता त्याचा हात पकडून त्याच्यासोबत दुस-या जहाजावर जातो. अभिजीतला पुर्ण खात्री होती की, जिथे श्रेया आहे तिथे रोडा असणारच. त्या दोघींना समोर पाहून ते दोघेही खूप खूश होतात. अभिजीतला सुखरुप पाहून श्रेया धावत त्याच्याजवळ जाते आणि त्याला घट्ट मिठी मारते. रोडाला सुखरुप पाहून स्टिफन खुश होतो आणि तिला मिठीत घेतो. अभिजीत आणि स्टिफन त्या दोघींना घेऊन ब्राझिलच्या जहाजावर येतात. तोपर्यंत त्या चौघांच्या भेटीची गोष्ट दोन्ही जहाजांमध्ये वा-यासारखी पसरली होती. जेव्हा ते ब्राझिलच्या जहाजावर येतात, तिथे उपस्थित प्रत्येकजन टाळ्यांच्या कडकडाटात चौघांचं स्वागत करतात.

 

‘‘श्रेया, तु खूप नशीबवान आहेस. तुला माहित नसेल, पण तुझ्या अभडूने (तेव्हा कप्तान थॉमस देखील वायरलेस रुममध्ये होते) फक्त आणि फक्त तुझा शोध घेण्यासाठी ही सर्व मोहिम राबवली होती. त्याला विश्वास होता की तुला काही झालं नसेल आणि तुला कल्पना नाही की किती मोठमोठ्या संकटांचा सामना करत त्याने तुला पुन्हा मिळवलं आहे. माझ्या जहाजावर तुम्हा दोघींचं स्वागत आहे.’’ कप्तान थॉमस स्वतः पुढे येऊन म्हणतात. कोलंबियाच्या जहाजावर त्या दोघींची जरा दगदग झाली होती हे कप्तान थॉमस यांनी ओळखले होते. ते दोघींच्या आरामाची व्यवस्था करतात. रोडा गर्भवती होती म्हणून तिची जास्त काळजी घेतली जाते. सहका-यांना कामे सांगून आणि कामाची प्रगती तपासून अभिजीत श्रेयाच्या रूममध्ये जातो.

 

आत येऊ का?” अभिजीत दरवाजा उघडत म्हणतो.

 

ये ना!श्रेया म्हणते.

 

आराम करत असशील म्हणून मगाशी आलो नव्हतो. आधीपेक्षा बरं वाटतंय ना!अभिजीत दरवाजा बंद करत म्हणतो.

 

हो, ये बस ना बाजूला.बेडवरून उठत श्रेया त्याला बसायला जागा देते. अभिजीत तिच्या जवळ जाऊन तिच्या डोक्यावर चुंबन घेतो. श्रेया लगेचच त्याच्या कुशीत शिरते.

 

तू माझ्या मिठीत आहेस यावर विश्वासच बसत नाही. असो, तुमच्या जहाजाचं नक्की काय झालं होतं. म्हणजे कप्तान फिलीपला सुद्धा तुम्ही दोघी नाही दिसलात.अभिजीत विचारतो.

 

आम्ही दोघी जॉर्डन सरांमुळे जिवंत आहोत.श्रेया म्हणते.

 

नक्की काय झालं होतं?” अभिजीत विचारतो.

 

तू मोहिमेवर गेलास आणि दोन दिवसांनी खूप मोठी लाट आली ज्यात सगळं जग बुडालं. तुमच्या सरांनी आम्हाला आधीच जहाजावर नेलं होतं म्हणून आम्ही वाचलो. पण, आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी जग बुडताना पाहिलं. जॉर्डन सरांसोबत आम्ही जहाजावर सुखरूप होतो. मला रोडासोबत सतत राहावे लागत होते, ती एकटी बिचारी करणार तरी काय? तुमचे सर तुम्हाला सतत संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. पण तुमच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यांना वाटलं तुम्हा सगळ्यांचा अपघात झाला असावा.श्रेय म्हणते.

 

हो, आमचा सगळ्यांशी संपर्क तुटला होता.अभिजीत म्हणतो.

 

हो, आणि म्हणूनच त्यांना आम्हा दोघींची खूप काळजी वाटू लागली. जेव्हा आमच्या जहाजाचा अपघात झाला तेव्हा त्यांनी एका विशेष बोटमध्ये मला, रोडाला, अल्बर्टच्या आई बाबांना बसवलं आणि त्यांनी स्वतः ती बोट चालवत आम्हाला जमिनीवर नेण्याचा प्रयत्न केला. प्रवासात आमच्या बोटीला पुन्हा अपघात झाला. अपघात काय म्हणावं? कुठल्यातरी माशांचा हल्ला झाला होता. हल्ल्यामध्ये अल्बर्टचे आई बाबा मरण पावले. नंतर माशांनी मला आणि रोडाला लक्ष्य केलं. जॉर्डन सर बेशुद्ध होते. आम्ही दोघीही जीवाच्या आकांताने ओरडत होतो. ऐकायला कुणीही नव्हतं आणि त्यातच माझा तोल गेला आणि मी पाण्यात पडले. मृत्यू माझ्यासमोर होता आणि माझ्या समोर एकदम जॉर्डन सर आले. त्यांनी पोहतच मला पाण्याच्या वर बोटीत नेलं. ते सुद्धा येणार इतक्यात एका माशाने त्यांच्या पायाचा लचका तोडला.श्रेया सांगत होती.

 

बाप रे! इतकं भयाणक घडलं होतं?” अभिजित म्हणतो.

 

हो, आणि आपण आता जिवंत राहू शकत नाही हे त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी आम्हाला दक्षिण दिशेला जायला सांगितलं आणि पाण्याच्या आत उडी मारली. आम्ही त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला. पण तोपर्यंत ते उशीर झाला होता. माशांची भीती होतीच आणि आमची बोट होती त्या ठिकाणी पाण्यामध्ये स्फोट झाल्यासारखा आवाज आला आणि सगळे मासे मारून पाण्यावर तरंगू लागले. तेव्हा रोडा म्हणाली, मला वाचवत असताना जॉर्डन सरांनी विशिष्ट बॉम्ब सोबत घेऊन पाण्यात उडी मारली होती.श्रेया म्हणते.

 

मला माहिती नव्हतं जॉर्डन सर इतके महान असतील. खरंच माझ्या मनात त्यांच्याविषयी काही गैरसमज होते, पण आता माझ्या मनात त्यांच्याविषयी आदर वाढला आहे.अभिजीत म्हणतो.

 

मी आत येऊ शकतो का?” बाहेरून आवाज येतो आणि श्रेया अभिजीत स्वतःला सावरून घेतात.  हो.अभिजीत म्हणतो. एक सैनिक आत येतो.

 

तसदीसाठी माफी असावी. कप्तान साहेबांनी तुम्हाला बोलावले आहे. इतर जहाजांसोबत संपर्क झाला आहे.सैनिक दरवाजात उभा राहत म्हणतो.जा अभी. आणि लवकरात लवकर सगळ्यांना सुखरूप जमिनीवर ने. सगळ्यांना तुझ्याकडून खूप आशा आहेत.श्रेया म्हणते आणि अभिजीत कप्तान थॉमस यांना भेटायला जातो. श्रेयाच्या येण्याने अभिजीतचा अत्मविश्वास वाढलेला असतो. कप्तान थॉमस यांना इतर जहाजांसोबत संपर्क साधण्यात यश आलं होतं. जहाजाच्या एका टोकावर कप्तान थॉमस आणि अभिजीत भविष्याबद्दल चर्चा करत असतात. इथून पुढचं आयुष्य कसं असेल हे अभिजीत त्यांना सांगतो. मानवाने निसर्गाचा जो नाश केला आहे त्याचा गंभीर परिणाम आता चांगलेच अनुभवता येत आहेत. आता पुन्हा नव्याने सुरुवात करत असताना मानवाने केलेल्या विनाशातुन निर्माण झालेल्या समस्यांवर मात करत अभिजीत आणि त्याच्या साथीदारांना पुढे जायचं आहे. विचार करत अभिजीत आपली नजर बाहेर फिरवतो, आफ्रिका आणि मेक्सिकोची जहाजं त्यांच्या जहाजाच्या दिशेने येत असतात. दुरवरुन येणा-या जहाजांना पाहून अभिजीत एका नव्या पृथ्वीवरील नव्या जीवनाच्या नव्या संकल्पनांची आखणी सुरु करतो.