Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण १४

अभिजीत जेन आणि स्टिफनला घेऊन जॉर्डन सरांकडे जातो. वाटेतच तो सर्व राष्ट्रांच्या प्रतिनिधींची तातडीने बैठक घ्यायला सांगतो. अभिजीत तिथे पोहोचेपर्यंत सगळे आपापल्या जागी बसलेले असतात. सैन्यदलातील जवान देखील तिथे उपस्थित असतात. संपूर्ण कडेकोट सुरक्षिततेमध्ये अभिजीत तिथे स्टेजवर जातो. जवळपास पन्नास-पंचावन्न मान्यवर तिथे उपस्थित असल्याने गोंधळ सुरु असतो. हातात माईक घेऊन अभिजीत बोलू लागतो,

 

‘‘आपण सर्वजण इथे आलात हे बरं केलं... (सभागृहात शांतता पसरते) कोणतीही औपचारिक गोष्ट न करता मी मूळ विषयाकडे वळतो... आपल्याकडे जितकी जहाजं, होड्या, पाणबुड्या असतील. सगळ्या बाहेर काढा...

 

शक्य होईल तितक्या नागरिकांना त्यामध्ये स्थलांतरित कराजास्त दिवस पुरेल अशा प्रकारचं अन्न त्यामध्ये जमा करुन ठेवा... झाडंदेखील मोठ्या जहाजांमध्ये जाऊ द्या... जास्तीत जास्त प्रमाणात तुळशीची व्यवस्था प्रत्येक जहाजामध्ये करुन ठेवा, कारण त्यामध्ये ऑक्सिजन उत्सर्जित करण्याचं प्रमाण जास्त आहे... इंधन आणि गरजेच्या सगळ्या गोष्टी जहाजांमध्ये साठवून ठेवा... खास करुन सोलर पॅलन प्रत्येक जहाजामध्ये असायला पाहिजे...’’

 

मध्येच चीनमधून आलेले एक सैन्य अधिकारी, ‘‘तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे? काय बोलत आहात, कशाच्या आधारावर बोलत आहात, जे आहे ते अगदी स्पष्टपणे सांगा...’’

 

अभिजीत, ‘‘संपूर्ण जग मृत्यूच्या जबड्यात जात असतांना मला या सर्व गोष्टी सविस्तरपणे सांगायची गरज आहे, असं मला तरी वाटत नाही. तुम्ही सर्वजण आपापल्या देशांचे प्रतिनिधी आहात. तुम्हा सर्वांना माहित असेलच आपण इथे नक्की कशासाठी जमलो आहोत... या सर्व गोष्टी घडत असताना त्या का घडत आहेत, कशा घडत आहेत, त्या घडवून आणण्यासाठी नक्की कोण जबाबदार आहे आणि ही वेळ आपल्यावर का आली, या मुद्द्याांवर चर्चा करण्यासाठी माझ्याकडे तरी वेळ नाही आहे.’’

 

भारताचे प्रतिनिधी, ‘‘ठिक आहे. इतर विषयांवर चर्चा नको, पण अंटार्क्टिका खंडावर गेलेल्या वैज्ञानिक, संशोधक आणि सैनिकांबद्दल आपल्याला काही माहिती मिळाली आहे का?’’

 

अभिजीत, ‘‘सध्या तिथे खूप भयाणक परिस्थिती आहे. बर्फ वेगाने वितळत असल्याने समुद्राच्या लाटांचा....’’

 

पुन्हा अभिजीतला मध्येच थांबवत जर्मनीचे प्रतिनिधी, ‘‘बर्फ वेगाने कसा काय वितळू शकतो? मागच्या सर्वेक्षणामध्येच आपल्याला सांगण्यात आलं होतं की, अंटार्क्टिका खंडावर बर्फ वितळत असला तरी 2050 पर्यंत फक्त 3 मीटर एवढीच पाण्याची पातळी वाढेल.’’

 

अभिजीत, ‘‘मग ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, जपान, जॉर्जिया आणि दक्षिणी बेटे काय 2 मीटर पाण्यात बुडाली आहेत का? महाशय, तेव्हा प्रदूषणाचं प्रमाण कमी होतं. आपल्याकडील माणसं अंटार्क्टिका खंडावर जाऊन आक्रमण करत नव्हते. तिथल्या प्राण्यांच्या दैनंदिन कार्यात ढवळाढवळ करत नव्हते. गेल्या काही वर्षांमध्ये प्रदुषणाचं प्रमाण इतकं वाढलं होतं ज्यामुळे कित्येक जीव आता अस्तित्वात नाही आहेत. आम्ही संशोधक आपणा सर्वांना सुचित करत होतो, प्रदूषणावर नियंत्रण आणा, नाहीतर आपल्या पुढच्या पिढीला मोठ्या संकटाचा सामना करण्याची वेळ येईल. पण आपलं प्रदूषण करण्याचं प्रमाण इतकं वाढलं की पुढच्या पिढीच्या समस्या आताच आपल्या पुढ्यात आल्या आहेत.’’

 

ब्राझिलचे सैन्य अधिकारी, ‘‘कृपया, बर्फ वेगाने वितळत आहेत याचं आपण स्पष्टीकरण देऊ शकाल का?’’

 

अभिजीत, ‘‘गेल्या अनेक वर्षांपासून अंटार्क्टिका खंडावरील बर्फ वितळत असल्याच्या घटना आपल्यापैकी अनेकांनी प्रत्यक्ष डोळ्यानी पाहिल्या आहे. मात्र हे आपल्या सर्वांसमोर असलेलं एक वरवरचं चित्र होतं. जो बर्फ वितळत होता तो विशालकाय बर्फाच्या कडांना आधार देणारा बर्फ होता. तो वितळत असल्याने बर्फाच्या मोठ्या कडांना आधारासाठी काही शिल्लक राहिलं नाही आणि ते पाण्यात पडू लागले. एक बर्फ पडल्यानंतर त्यापाठोपाठ दुसरा, तिसरा करत बर्फाचे कडे पाण्यामध्ये पडत गेले. यामध्येच आपल्याकडील संशोधक, वैज्ञानिक आणि सॅटेलाईटसाठी लावण्यात आलेली यंत्रणा पाण्यामध्ये बुडून वाहून गेली.’’

 

जॉर्जियाचे सैन्यदलप्रमुख, ‘‘या गोष्टी नक्की कशाचं संकेत देत आहेत?’’

 

अभिजीत, ‘‘संपूर्ण जग पाण्याखाली येणार आहे...’’

 

रशियाचा दुतावास, ‘‘हे कसं शक्य आहे? पाण्याचा जोर आता ओसरला आहे. आमच्या लष्करी खात्याने दिलेल्या माहितीनुसार आता कसलाही धोका नाही. फक्त ही आपत्ती कशी आली, हे विचारायला आम्ही इथे आलो आहोत.’’

 

अभिजीत, ‘‘माफ करा महाशय, अंटार्क्टिका खंडामध्ये जलदगतीने बदलणा-या हवामानाची नोंद माझ्याकडे आहे... डॉ. वेन जिन्तो यांनी लिहून ठेवलं होतं, ‘इतक्या वर्षांत पहिल्यांदा मी अंटार्क्टिकाच्या वातावरणामध्ये कमरेपर्यंतच्या बर्फात अडकलो आहे... नेहमीप्रमाणे असलेली थंडी जाणवत नाही... बर्फाचे मोठमोठाले तुकडे 1,000 ते 5,000 मीटर उंचीवरुन पाण्यात पडत आहेत... इथले सर्व प्राणी, पक्षी आणि मासे भयभीत झाले आहेत म्हणून ते इथून भयभीत होऊन निघून जात आहेत...त्यांच्याजवळ असलेल्या हवामानाचा अंदाज घेणा-या यंत्रामधून आणि जे. सी. पी. स्कॅनर मधून मिळालेला डेटा आपल्याला भविष्यातील मोठ्या विनाशाची सुचना देत आहे...’’

 

हॉलमध्ये पुन्हा गोंधळ सुरु होतो.

 

इंग्लंडचा दुतावास, ‘‘आपल्या पृथ्वीवर आता जवळपास 3 अब्जच्या आसपास लोक जिवंत आहेत आणि त्या सर्वांना जहाजांमध्ये घेणं शक्य नाही...’’

 

अभिजीत, ‘‘शक्य असेल तितक्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करा...’’

 

चीनचा दुतावास, ‘‘ही आपत्ती कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे?’’

 

अभिजीत, ‘‘ते मी सांगू शकत नाही, सॅटेलाईटवरुन देखील आपल्याला तिथला डेटा मिळणं कठीण झालं आहे... आपत्ती जितक्या उशीरा येईल तितकं आपल्यासाठी चांगलं आहे...’’

 

सगळ्या देशांमधील दुतावास आणि सैन्यदल अधिकारी आपापल्या देशांमध्ये लगेचच ही माहिती देतात आणि त्या सर्वांना जहाजांमध्ये जाण्यासाठी  आवाहन करतात. संपूर्ण जगावर जगबूडी येणार असल्याने एकच खळबळ उडालेली असते. जगावर येऊन गेलेल्या मोठ्या प्रलयानंतर आधीच अर्ध जग मृत्यूमूखी पडलं असतं आणि त्यातून बचावलेल्या लोकांना आता शोक व्यक्त करण्यासाठी वेळ नसतो. प्रत्येकाने आता स्वतःचं संरक्षण करायचं असतं. संपूर्ण जग जोमाने कामाला लागतं, काही मच्छिमार आपापल्या होडीमध्ये आपलं गरजेचं सामान हलवतात. काही उदार माणसं गरीबांसाठी मोफत होड्या बनवून देतात. लष्करी जहाजामधील लढाऊ विमाने उंच पर्वतावर हलवण्यात येतात. मोठमोठी माणसं आपल्याजवळचा पैसा दाखवून जहाजं विकत घेण्याचा प्रयत्न करतात, मात्र परिस्थिती इतकी बिकट होते की, फाईव्ह स्टार जहाजांमध्ये देखील माणसांना कच-यासारखं भरलं जातं. दिवसेंदिवस पाण्याची पातळी वाढत जाते. कुणी येशूकडे प्रार्थना करतं तर कुणी अल्लाकडे, कुणाला राम आठवतो तर कुणाला कृष्ण, त्यांना आठवलेला येशु, अल्ला, राम, कृष्ण बहुतेक त्यांच्यावर उदार होतो कारण चीन आणि भारतातील वैज्ञानिकांना एक अजब शोध लागतो.

 

चीन आणि भारत देशांमधील संशोधकांनी एका वेगळ्या प्रकारच्या संयुगांची निर्मीती केलेली असते. ही संयुगे लढाऊ विमानांच्या सहाय्याने अंटार्क्टिकापर्यंत नेण्यात यावी आणि तिथेच ती संयुगे मिसळून अंटार्क्टिका खंडाच्या जवळ अणुविस्फोट करायचे. ज्यामुळे तिथलं हवामान इतकं बदलेल की 48 तासांच्या आत त्या भागात पाण्याचा बर्फ व्हायला सुरुवात होईल. पाण्याचा बर्फ होत असल्याने समुद्राची पातळी हळूहळू कमी होऊ लागेल आणि जास्तीत जास्त नागरिकांचे प्राण वाचू शकतील.

 

बातमीमध्ये तथ्य होतं, पण ते संयुग नक्की किती परिणामकारक आहे हे सांगायला दोन्ही देशांमधील संशोधक तयार नव्हते. जॉर्डन सरांनी संयुगांचा तपशिल मागितल्यानंतर देखील त्यांना समोरुन काही प्रतिक्रिया आली नाही. परिणामी त्यांना आक्रमक भुमिका घ्यावी लागली, ‘जोपर्यंत आशिया खंडातील शास्त्रज्ञ नव्या संयुगांबाबत माहिती देत नाहीत, तोपर्यंत त्यांना मोहीमेवर जाता येणार नाही.यावर आशिया खंडातील चीन आणि भारत देश देखील आक्रमक होतात.परवानगी नसताना देखील अंटार्क्टिका खंडामध्ये अनधिकृत मोहीम चालवणा-यांनी आम्हाला शिकवू नये.असा टोला ते जॉर्डन सरांना लगावतात. चीन आणि भारत या देशांनी आपली संयुगे स्पष्ट केली नसली तरी जगाला त्यातून एक आशेचं किरण दिसत होतं, म्हणून सर्व देश चीन आणि भारत देशांना पाठिंबा देतात. पाठिंब्याला अपवाद असतात ते ब्राझिल, अर्जेंटिना, यु. एस. ए., कॅलिफोर्निया, जमैका, कोलंबिया, मेक्सिको आणि कॅनडासह संपूर्ण अमेरिका. म्हणजे एकटा अमेरिका खंड सोडला तर संपूर्ण जग चीन आणि भारतीय संशोधकांच्या पाठीशी होतं.