Get it on Google Play
Download on the App Store

मनोगत

मनोगत मांडण्याआधी एक गंमत सांगू इच्छितो. साधारण दोन वर्षांपूर्वी म्हणजे १ मे २०१४ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आपण वाचत असलेली कादंबरी प्रकाशित होणार होती. पुस्तक लिहून तयार होते, कव्हर देखील मी स्वतः डिझाईन केले होते, त्या वेळी देखील ट्रेलर रिलीज झाला होता मात्र दुर्दैवाने माझ्या कॉम्पुटरची  हार्ड डिस्क करप्ट झाली. माहितीसाठी असलेले नोट्स, व्हिडिओ आणि इतर सर्व गोष्टी इंटरनेटवर उपलब्ध होत्या, मात्र मी लिहिलेले संपूर्ण पुस्तक त्या करप्ट झालेल्या हार्ड डिस्कमध्ये नष्ट झाले. दोन वर्षांआधी बनवलेला ट्रेलर आज देखील YouTube वर उपलब्ध आहे. पुस्तक सर्वांसमोर यावे ही इच्छा मनात होतीच, या दोन वर्षात अनेक गोष्टी घडल्या, मला मुलगी झाली, चांगल्या कंपनीमध्ये आर्ट डायरेक्टर म्हणून रुजू झालो, ब-याच चांगल्या गोष्टी घडल्या. पाठीमागून लिहिलेले अग्निपुत्र नावाचे पुस्तक प्रकाशित देखील झाले, पण रोज ट्रेनमधून प्रवास करत, मुलीला वेळ देत, ऑफिसमधील काम सांभाळत, रस्त्याने चालत, मित्रांसोबत क्रिकेट खेळत टॅबवर पुस्तकाचे नव्याने लिखाण काम सुरु होते. असे करत अनेक गोष्टी जुळवून पुन्हा नव्याने सुरुवात करून ‘पुन्हा नव्याने सुरुवात’ कादंबरी पूर्ण झाली.


हे पुस्तक म्हणजे एक अशी कथा आहे, जिथे सर्व काही संपतं आणि सर्वांना पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. ही सुरुवात नव्या जगाची आहे, नव्या जगण्याची आहे, जगण्याची नाही तर नव्याने जगवण्याची आहे, नव्याने घर शोधण्याची आहे, गमावलेल्या सर्व गोष्टी पुन्हा नव्याने कमावण्याची आहे.


पुस्तकाबद्दल बोलण्याआधी माझ्याबद्दल थोडं सांगू इच्छितो. लहानपणापासून संशोधक होण्याची इच्छा म्हणून भरपूर पुस्तके वाचून काढली. अनेक संशोधकांचे चरित्र वाचले. सर्वकाही सुरळीत चालू होते आणि त्यातच मिलिटरी स्कूलमध्ये शेवटच्या वर्षी माझा अपघात झाला. नंतर रेल्वेमध्ये प्रवास करत असताना अपघात झाला आणि माझी बरीच स्वप्ने धुसर झाली. जास्त धावू नये, जास्त वजन उचलू नये अशी अनेक बंधने माझ्यावर आली. संशोधनात काही करता आले नाही याचा खूप त्रास होत होता. संशोधनातून काहीतरी वेगळे प्रयोग करायचे आणि जगाला काहीतरी नवीन दाखवायचं ही खंत काही केल्या मनातून जात नव्हती. तेव्हा आपण पुस्तकाच्या माध्यमातून जगाला नवीन काहीतरी देऊ शकतो असे माझ्या लक्षात आले आणि मी दोन पुस्तके लिहिली, मैत्र जीवांचे आणि अग्निपुत्र. पैकी ‘मैत्र जीवांचे’ पुस्तकामधून मी एकाच पुस्तकामध्ये ६ वेगवेगळ्या भाषांचा वापर केला, गुगल संस्थेमधील कामकाज कसे चालते हे दाखविले, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीमधील संस्कृती दाखवली. कादंबरीला चांगला प्रतिसाद मिळाला. नंतर ब्लॉगच्या माध्यमातून ‘अग्निपुत्र’ नावाची साय-फाय कादंबरी लिहिली, कादंबरीला एका वर्षातच ३,००,००० पेक्षा जास्त वाचकसंख्या लाभली आणि त्यानंतर आता ‘पुन्हा नव्याने सुरुवात’ कादंबरी आपल्यासमोर सादर करत आहे.


तिन्ही पुस्तकांमध्ये मुख्य नायक हा संशोधक, डॉक्टरेट किंवा शास्त्रज्ञ आहे. नायकाला ही भूमिका का दिली हे आपल्याला समजले असेलच. पण मुद्दा हा नाहीच आहे, मुद्दा हा आहे कि मी तुम्हाला काय देतो आहे. का देतो आहे ते तुम्हाला ब-यापैकी कळले असेलच. आज मी लिहिलेले पुस्तक वाचत असताना तुम्ही तुमच्या आयुष्याचे काही तास माझ्यासाठी, माझ्या पुस्तकासाठी देत आहात, तर ते तास तुमच्यासाठी अविस्मरणीय असावे, त्यातून तुम्हाला काही शिकता यावे, पुस्तक वाचत असताना नुसता विरंगुळा न होता तुम्हाला अशी काही माहिती मिळावी जी तुम्ही कधी ऐकली नसेल किंवा वाचली देखील नसेल आणि पुस्तक वाचल्यानंतर आपण काहीतरी नवीन, वेगळे वाचले आहे याचा आनंद तुमच्या चेह-यावर असावा हा महत्वाचा मुद्दा आहे आणि तो मुद्दा या पुस्तकामध्ये देखील तुम्हाला अनुभवायला

मिळेल. महासागरांचा इतिहास, जमिनीखाली आणि समुद्रामध्ये कशा प्रकारे संशोधन होते, संशोधकांचे जीवन कसे असते, सैनिक म्हणजे नक्की काय असतो, निसर्गाची उत्पत्ती कशी झाली आणि अशा प्रकारची बरीच माहिती तुम्हाला या कादंबरीमध्ये वाचता येईल.


कादंबरी वाचत असताना प्रकरण ७ आणि प्रकरण ८ ही दोन प्रकरणे महासागराची माहिती देण्यासाठी समाविष्ट केली आहे. या प्रकरणांचा अनेक जिज्ञासू वाचकांना नक्कीच फायदा होईल. सामान्य वाचक ही दोन प्रकरणे वगळून प्रकरण ९ वाचू शकतो, इथे त्याने वाचनातून केवळ महासागराचा इतिहास वगळला असेल, मूळ कथेचा गाभा आहे तसाच राहतो आणि कथा पुढे जाते. तेव्हा सामान्य वाचकांना ही दोन प्रकरणे रटाळ वाटली तर त्यांनी नि:संकोचपणे प्रकरण ९ वाचल्यास हरकत नाही.


कादंबरीचा नायक अभिजीत हा महासागरशास्त्रज्ञ आहे जो लग्न करण्यासाठी महाराष्ट्रात येतो. लग्नानंतर लगेचच पत्नी श्रेयासोबत तो अर्जेंटीना येथे त्याच्या कामाच्या ठिकाणी जातो. तिथे त्याचे सहकारी स्टीफन आणि अल्बर्ट त्याला महासागरामधील हालचालींबद्दल एक रोमांचक गोष्ट सांगतात. या गोष्टीचा शोध घेण्यासाठी अभिजीत, स्टिफन, अल्बर्ट, कप्तान ब्रूस, मेजर रॉजर्ड, बार्बरा, जेन, मोहम्मद आणि त्सेन्ग चू हे सगळे अंटार्क्टिकाच्या दिशेने निघतात. दरम्यान दक्षिण ध्रुवावर आढळणारे महाकाय आणि हिंस्त्र मासे संपूर्ण जगभर जहाजांवर हल्ला करतात. नक्की कोणती गोष्ट शोधण्यासाठी अभिजीत त्याच्या टीमसोबत अंटार्क्टिका खंडावर जातो? समुद्री मासे जहाजांवर हल्ले का करतात? पुढे जाऊन असे काय होते ज्याने संपूर्ण जग अमेरिका खंडाच्या विरुद्ध होतं? अभिजीत जगातील सर्वात मोठे गुगल आणि फेसबुक का हॅक करतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कादंबरी वाचताना मिळतीलच.

पुन्हा नव्याने सुरुवात या कादंबरीचे समीक्षक श्री. मंगेश विठ्ठल कोळी आणि कवितासागर प्रकाशनाचे प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांचे आभार...


- अभिषेक ज्ञानेश्वर ठमके

Author | Creative Art Director | Social Media Executive

+91 9768650098, abhishek.thamke@gmail.com