Android app on Google Play

 

प्रकरण ५

 

जवळजवळ दोन तासांनंतर अभिजीत तिथून बाहेर येतो आणि त्या दोघांकडे बघतो.

 

स्टिफन, ‘‘काय झालं?’’

 

अभिजीत, ‘‘आपल्याला लगेचच कामाला लागलं पाहिजे. अल्बर्ट, अंटार्क्टिका खंड आणि महासागराबाबत आपल्या कामी येईल अशी सर्व प्रकारची माहिती, नकाशे, छायाचित्रे मला हवी आहेत.’’

 

अभिजीतच्या बोलण्यात उत्स्फूर्तता होती. जणू काही त्याला सर्व कळलं आहे. संपूर्ण मोहिमेची लगाम त्याच्याच हातात आहे. अंटार्क्टिकावर जायचं नक्की आहे आणि फक्त झालेलं नियोजन इतर साथीदारांना सांगायचं आहे. थोडक्यात सांगायचं तर अभिजीत नेहमीसारख्या चपळाईने कामाला सुरुवात करत होता.

 

अल्बर्ट, ‘‘ओकेसर, लगेच कामाला लागतो.’’

 

अभिजीत, ‘‘स्टिफन, आपली टीम डेन्मार्कमधून निघाली आहे... उद्यापर्यंत ते सगळे इथे पोहोचतील... अमेरिकी नौसेनेतील अधिका-यांसोबत लगेचच चर्चा कर आणि परिस्थिती नक्की काय आहे याची आहे तितकी माहिती मला मिळवून दे...’’

 

स्टिफन, ‘‘बरं, आणि हे लॅबमधलं काम?’’

 

अभिजीत, ‘‘ते आपल्यासाठी काही महत्त्वाचं नाही... इथल्या कर्मचा-यांना लेक्चर रुमची स्वच्छता करायला सांग... उद्या आपल्याला तिथेच बसायचं आहे... तू आत्ताच निघू शकतोस... जाताना श्रेयाला सांग, आज मला घरी यायला उशीर होईल आणि कुणाला तरी सांगून इथे कॉफीचं यंत्र बसव...’’

 

स्टिफन लगेच कामाला लागतो. अभिजीत एकटाच प्रयोगशाळेमध्ये काम करत असतो. सॅटेलाईटद्वारे तो महासागरातील लहरींचा अंदाज घेतो. कागदावर पृथ्वीवरील आकृत्या काढू लागतो. प्रयोगशाळेमध्ये असलेली पुस्तके उघडून त्यातील शास्त्रीय अंदाज लिहून घेतो. गणिताची आकडेमोड करत कितीतरी पानं तो नुसती फाडून फेकून देतो. स्टिफनने लगेचच कॉफीची व्यवस्था केली असल्याने अभिजीत दिवसभर बारा-चौदा कप कॉफी संपवतो. दुसरीकडे अल्बर्टस्क्रिप्स इन्स्टिट्यूटच्या ग्रंथालयामध्ये महासागरावरील आवश्यक असणारी माहिती एकत्र करण्याचं काम करतो. मोठमोठ्या संशोधकांनी महासागरावर केलेलं संशोधन तो त्याच्या नोंदीमध्ये लिहून घेतो. इथे स्टिफन अमेरिकी नौसेनेच्या अधिका-यांना आपण लवकरच अंटार्क्टिका खंडावर जात असल्याचे सांगतो. सध्या तिथे नक्की कोणत्या हालचाली होत आहेत याबाबत अमेरिकी नौसेनेचे अधिकारी त्याला माहिती देतात, तसेच ही मोहिम धोक्याची आहे, म्हणून अमेरिकी नौसेनेतील पाणबुडीचा विशेष अनुभव असलेले मेजर रॉजर्ड यांना आपण आपल्यासोबत पाठवत आहोत असे सांगतात.

 

सगळं अगदी जोमाने चालत असताना परिस्थिती आणखीच गंभीर होते जेव्हा अभिजीतची टीम अर्जेटिनाच्या दिशेने जात असते. आफ्रिकेजवळील काही नौसेनेचे जहाज त्यांना पाणबुडी पुढे नेण्यास मज्जाव आणतात. महासागरामध्ये ध्रुवीय मासे मोकाट फिरत असल्याने पाणबुड्या दुरपर्यंत नेण्यास मनाई आहे, असं सांगतात. शेवटी अभिजीतच्या टीमला मागे परतावं लागतं. जॉर्डन सर तत्काळ अभिजीतच्या टीमला विमानाने अर्जेटिनाला पाठवतात, अमेरिकी नौसेना अभिजीतच्या टीमसाठी पाणबुडीची व्यवस्था करते. अभिजीत जरी बंद प्रयोगशाळेत बसून काम करत असला तरी, संपूर्ण जगभर त्याच्या मोहिमेसाठी धावपळ सुरु असते. जॉर्डन सरांच्या अंदाजानुसार परिस्थिती हाताबाहेर गेलेली असल्याने आता क्षणाचाही विलंब धोकादायक ठरु शकतो. अभिजीत रात्री उशीरापर्यंत प्रयोगशाळेमध्ये काम करतो. त्याने मोहिमेची आखणी केलेली असते, आता त्याला फक्त आपल्या टीमला ती मोहिम कशा प्रकारची आहे हे सांगावयाचं असतं, त्याची टीम दुस-या दिवशी पहाटे अर्जेंटिनाला पोहोचणार असल्याने अभिजीत घरी जातो. घरी गेल्यावर बघतो तर घराला कुलूप लावलेलं असतं. त्याला प्रश्न पडतो, ‘आता श्रेया कुठे गेली?’ तो बाजूला असलेल्या स्टिफनच्या घरी जातो तर तिथे श्रेया आणि रोडा गप्पा मारत असतात. अभिजीत आलेला पाहून ती रोडाचा निरोप घेते आणि तिथून निघते.

 

श्रेया, ‘‘जास्तच उशीर केलास... आईचा फोन आला होता, विचारत होत्या...’’

 

अभिजीत, ‘‘हं... खूप काम होतं म्हणून जास्त उशीर झाला...’’

 

बोलता बोलता दोघे घरात शिरतात. अभिजीत आंघोळ करतो आणि दुसरीकडे श्रेया जेवण गरम करते. नंतर दोघेही जेवण करायला बसतात. श्रेयाने तिथे प्रसिध्द असलेले पॉम्फर्ट आणि लॉबस्टार मासे बनविलेले असतात. दुपारी रोडाने तिला हे मासे कसे बनवायचे हे शिकवलं असतं. अभिजीतला ते मासे खूप आवडतात. जेवता जेवता श्रेया मध्येच बोलते.

 

‘‘अभड्या, ऐक ना!’’ अभिजीत तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघतो.

 

‘‘मला ना, आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस समुद्राच्या मधोमध साजरा करायचा आहे.’’

 

‘‘एवढंच ना! करु मग, त्यात काय? क्रुझवर जायचं म्हणतेस ना!’’

 

‘‘हो, मला एकदा तरी क्रुझवर जायचंय मस्तपैकी, आजूबाजूला कसलाच त्रास नाही, गाड्या नाही, माणसं नाही, रस्ते, बिल्डिंग, टॉवर वगैरे काही नाही. फक्त आणि फक्त शांत समुद्र आणि त्याच्या लाटांचा आवाज...’’

 

अभिजीतचं विचारचक्र पुन्हा सुरु होतं. समुद्राच्या लाटांचं नाव काढताच अभिजीतच्या डोक्यात पुन्हा तेच विचार सुरु होतात. मग तो गप्पच राहतो, श्रेया पुन्हा थोड्या वेळाने बोलू लागते.

 

‘‘तू बुडायला जात आहेस का?’’

 

‘‘म्हणजे?’’

 

‘‘स्टिफन रोडाला आणि मला सांगत होता, तुम्ही सगळे अंटार्क्टिकावर चाललात...’’

 

‘‘अच्छा... म्हणजे बातमी तुझ्यापर्यंत पोहोचली?’’

 

‘‘का? नाही पोहोचली पाहिजे का?’’

 

‘‘तसं नाही गं, स्टिफनने बरं केलं तुम्हा दोघींना सांगून, फक्त हे बाहेर कुणाला कळू देऊ नकोस.’’

 

‘‘न्युज वाचतोस की नाही तू? सगळ्या देशांच्या सैनिकांना आणि वैज्ञानिकांना तिथे जायला बंदी घातली आहे. जेवढी माणसं तिथे गेली होती, त्या सर्वांचं नक्की काय झालं काही सांगता येत नाहीये आणि आता तुला तिथे जायचं आहे?’’

 

‘‘तु माझ्यासोबत भांडत आहेस का?’’

 

‘‘नाही रे, मी तुला विचारतेय... परिस्थिती इतकी गंभीर असताना तुला थोडं थांबायला हवं. नंतर सगळं व्यवस्थित झालं की जा ना मग... तुझं काम कशा प्रकारचं आहे हे मला चांगलं माहित आहे... त्या टिपीकल मुलींसारखं रडणं, अडवणं मला नाही आवडत... फक्त एवढंच म्हणायचंय की, वातावरण जरा शांत होऊ दे, नंतर जा...’’

 

‘‘तू म्हणतेस ते बरोबर आहे... आता तिथे गेलो तर धोका आहेच... पण जर का मी आता तिथे गेलो नाही तर कदाचित उद्या संपूर्ण जगाला धोका असू शकेल... थोडं डिटेलमध्ये बोलू?’’

 

‘‘विचारतोस काय?’’

 

‘‘नाही म्हणजे, बायका नव-यांच तेवढं ऐकत नाहीत ना!’’

 

‘‘डियर, इथे जगाचा प्रश्न आहे म्हणतोस ना...!!’’

 

‘‘हं... अगं तिथले काही मासे आहेत जे गेल्या 1000 वर्षांमध्ये इथल्या समुद्रामध्ये आल्याचे कोणतेही पुरावे नाहीत आणि आज ते सर्व मासे जवळजवळ उत्तर अटलांटिक महासागरामध्ये सापडले आहेत... हे सर्व मासे जवळजवळ 20 मीटर लांब आणि आकाराने खूप मोठे आहेत, त्यातल्या काही जाती मांसाहारी आहेत, जर त्यांनी अंटार्क्टिकावर माणसाचं मांस खाल्ल असेल तर ते आपली भूक भागवण्यासाठी इथे स्थलांतरीत होतील... त्यांना मारण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या प्रजाती नष्ट होऊन पर्यावरणाचं मोठं नुकसान होईल आणि त्यांना असंच सोडलं तर जगभरातील सर्व प्रकारची जहाजं, नौका, होड्या उध्दवस्त होऊ शकतात...’’

 

‘‘मग त्यांना परत अंटार्क्टिकावर पाठवता येईल का?’’

 

‘‘तेच तर पहायचंय, त्यासाठीच मला तिथे जावं लागणार आहे...’’

 

‘‘जे करतोस ते व्यवस्थित कर. तुझ्यावर विश्वास आहे, पण काळजीसुध्दा खूप वाटते...’’

 

‘‘अगं तू इतकी समजूतदार आहेस की, मला माझं काम खरंच व्यवस्थितपणे करता येतंय... नाहीतर दिवसभर काम करा आणि घरी आल्यावर आपल्या पत्नीचा राग शांत करा...’’

 

दोघेही हसतात. जेवण आटोपून दोघेही झोपायला जातात. रात्री उशीरापर्यंत त्यांच्या गप्पा चालूच असतात, त्यात दोघांना झोप कधी लागते हे त्यांना देखील कळत नाही.