प्रकरण १०
‘‘रडार चेक केलंस?’’
‘‘हो सर...’’
‘‘डिझेल चेक केलंस?’’
‘‘हो सर...’’
‘‘इंजिन ओके आहे का?’’
‘‘हो...’’
‘‘पाणबुडी व्यवस्थित चालू शकते का?’’
‘‘हो सर...’’
‘‘सुकाणू व्यवस्थित काम करताहेत ना!’’
‘‘हो सर...’’
‘‘समुद्राखाली फोटो काढता येतील ना!’’
‘‘हो सर, सगळं करता येईल... काही अडचण नाही... तुम्ही आतमध्ये येऊ शकता...’’ बार्बरा वैतागतच म्हणते.
‘‘माहित आहे गं मला सगळं... श्रेया विचारत होती... मला सोडायला आली आहे ती...’’ केविलवाणा चेहरा करत अभिजीत सांगतो. पाणबुडीच्या आतमधून सगळे हसू लागतात.
अभिजीतला सोडायला आलेल्या छोट्या बोटमधून श्रेया पुन्हा ओरडून विचारते,
‘‘जेवणाचं सगळं आठवणीने घेतलं आहे ना!’’ या वेळी श्रेयाचा आवाज सगळ्यांना ऐकू येतो म्हणून ते पुन्हा हसतात. अभिजीत डोक्यावर हात मारुन घेतो. हळू हळू एकेक करुन श्रेयाला बघण्यासाठी सगळे पाणबुडीच्या बाहेर येतात. बाहेर त्या बोटमध्ये श्रेयासोबत रोडा, अल्बर्ट आईवडील आणि ती बोट चालवणारा नावीक असतात. सगळ्यांना पाहून श्रेया ‘हाय...’ करते. सगळे श्रेयाला प्रतिसाद देतात.
श्रेया, ‘‘जास्त काम नका करु... भिती वाटली की पुन्हा मागे फिरा... सगळ्यांसाठी मी बेसनचे लाडू बनवलेत... आठवणीने खा... शक्यतो पाणबुडीचे दरवाजे उघडू नका... पाण्याच्या बाटल्या सोबत घेतल्या असतीलच ना... जास्त खोल जाऊ नका... मोठ्या माश्यांजवळ पाणबुडी नेऊ नका... तुमच्यापैकी कुणाला पाण्याखालचे फोटो काढता येत असतील तर माझ्यासाठी नक्की घेऊन या...’’
‘‘हो वहिनी...!’’ सगळे एकासुरात ओरडतात. अभिजीत पुन्हा स्वतःच्या डोक्यावर हात मारुन घेतो आणि श्रेयाकडे बघून म्हणतो,
‘‘हॅलो मॅडम, संशोधन करायला चाललोय, पिकनिकला नाही. फोटो काढा म्हणे... ते लहानपणी वाचलं होतं, कोलंबसने लग्न का नाही केलं, आज प्रत्यक्ष अनुभव आला...’’ सगळे पुन्हा हसू लागतात. अभिजीत सर्वांना आतमध्ये जायला सांगतो. श्रेया मुद्याम त्याची खोड काढत होती, अभिजीत जेव्हा पाणबुडीमध्ये जातो तेव्हा पुन्हा एकदा तिच्याकडे पाहतो, तिच्या त्या खोडकर नजरे मध्येदेखील त्याला काळजी दिसत होती. एक वेळ त्याच्या मनात विचार आला, नको ही मोहीम मी पुन्हा तुझ्याकडे येतो. लग्नाला एक महिना झाला नाही आणि मी तुझ्यापासून दूर चाललोय. पण मी मोहीम सोडून तुझ्याकडे आलेलं तुला आवडणार नाही. नाही, मी मोहीम पुर्ण करतो आणि लवकरात लवकर तुझ्याजवळ येतो. मग मी तुझ्या कुशीत डोकं ठेवून झोपेन, तू माझ्या केसांमधून हळूवार हात फिरव. मी तुझ्या डोळ्यांत बघेन आणि…
‘‘अभी, इंजिन सुरु झालं...’’ आतमधून स्टिफन बोलतो.
अभिजीत एकदम शुध्दीवर येतो. समोर पाहतो तर, श्रेया आणि सोडायला आलेले इतर सर्वजण त्याचा निरोप घेत असतात. सर्वांना निरोपाचा हात दाखवत लवकरच येईन असं अभिजीत सांगतो आणि पाणबुडीमध्ये जातो. अल्बर्ट पाणबुडीचं झाकन बंद करतो. पाणबुडी पाण्याखाली जाऊ लागते. श्रेयाची नजर त्या पाणबुडीवरुन हटतच नाही, हळूहळू पाणबुडी पाण्यामध्ये जाऊन नजरेआड होते, तरीही समुद्राच्या आतमधल्या प्रवाहाचा आवाज तिला ऐकू येतो, थोड्या वेळाने तो सुध्दा बंद होतो. होडी किना-याच्या दिशेने जाऊ लागते. नाही म्हटलं तरी श्रेयाला अभिजीतची चिंता होत असते. पण, तो पुन्हा येईल याबाबत तिला पूर्ण खात्री असते. दूरपर्यंत पसरलेल्या समुद्राच्या निळ्या पाण्याकडे एकटक बघत ती किना-यावर पोहोचते.
पाणबुडीच्या आतमध्ये आल्यानंतर अभिजीत संशोधनाचे सर्व आराखडे तपासू लागतो. मोहम्मद रडारच्या सहाय्याने बाहेरच्या हालचालींवर लक्ष ठेवतो. ब्रुस आणि मेजर रॉजर्ड पाणबुडी चालवतात. जेन आणि बार्बरा पाणबुडीतील सर्व कक्षांमधील व्यवस्था तपासतात, अल्बर्ट आणि स्टिफन पाण्याबाहेर असलेल्या कॅमे-याच्या सहाय्याने समुद्रातील हालचालींकडे लक्ष ठेवतात, त्सेन्ग पाणबुडीला सॅटेलाईटसोबत जोडतो. 20 किमी पुढे गेल्यानंतर अभिजीतची टीम पाणबुडीवर पुर्णपणे नियंत्रण मिळवते. संचारव्यवस्था सुरळीत असल्याने आणि कोणतीही विचीत्र हालचाल दिसत नसल्याने जेन सहजच विषय काढते,
‘‘अभिजीत, लग्न झाल्यावर कसं वाटतंय?’’
‘‘छान...’’
‘‘फक्त छान...! श्रेया वहिनीबद्दल तू मला काही सांगितलंच नाहीस...’’
‘‘मागच्या वेळेस सांगितलं होतं ना! आम्ही दोघे लहानपणापासून एकाच ठिकाणी होतो... शाळा, कॉलेज एकत्रच केलं... आम्ही लहान असतानाच एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो, मोठं झाल्यावर आम्ही लग्न करायचं ठरवलं...’’
‘‘अच्छा, हो... बस्स.. बस... मला वाटलं काही नवीन सांगशील...’’
‘‘नवीन काय सांगू? जे काही तुला माहीत आहे तेच... त्याव्यतिरिक्त काही नाही...’’
‘‘हम्म...’’
दोघे गप्प होतात. नंतर अभिजीत ब्रुसकडे जातो.
‘‘थोड्या वेळेपूर्वी मी विचारणार होतो... आपण इतक्या पुढे आलो आहोत, मला आपल्या पाणबुडीमध्ये कुठेही इंधनाचे कॅन दिसले नाहीत, एव्हाना लिस्टमध्ये कुठेही इंधनाचा उल्लेख नाहीये...’’
ब्रुस काही बोलत नाही, तो मेजर रॉजर्डकडे बघतो. मेजर रॉजर्ड अभिजीतला पाणबुडीचं वेगळेपण सांगतात. ब्रुस आणि अभिजीत दोघेही मेजर रॉजर्ड यांना इतक्या गंभीर संशोधनाबाबत जाब विचारतात, ब्रुसला दिलेलं स्पष्टीकरण ते अभिजीतला देखील देतात.
मोहम्मद, ‘‘सर, आपल्यापासून 500 कि.मी. अंतरावर देवमासा आहे...’’
अभिजीत, ‘‘काय? कसं शक्य आहे?’’
अभिजीत, स्टिफन आणि अल्बर्ट लगेचच मोहम्मदच्या दिशेने जातात. त्यांना रडारवर देवमासा दिसतो. अभिजीतला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही, कारण ते समुद्राच्या ज्या भागातून जात असतात त्या भागात 3,000 वर्षांमध्ये देवमासा असल्याचा कोणताही पुरावा नव्हता. थोड्या वेळात तो देवमासा त्यांच्यापासून दूर जातो आणि रडारमध्ये देखील तो दिसत नाही. त्सेन्ग लगेच ही माहिती त्याच्या संगणकामध्ये जतन करतो.
‘‘देवमासा ज्या दिशेने गेला त्या दिशेने पाणबुडी न्या... आपल्याला त्याच्या जास्त जवळ जायचं नाही, पण कमीत कमी 100 कि.मी. अंतरावरुन तरी आपल्याला त्याच्यावर नजर ठेवता येईल...’’
ब्रुस, मोहम्मद आणि मेजर रॉजर्ड लगेच कामाला लागतात. अल्बर्ट हा शिकाऊ असल्याने अभिजीत त्याला स्वतःसोबत रहायला सांगतो. परिस्थिती कितीही गंभीर असली तरी हा अल्बर्ट म्हणजे पूर्णतः पुस्तकी किडा आहे. त्याला कोणतीही गोष्ट विचारली की तो आपलं पुस्तकी ज्ञान सुरु करायचा. सर्वांपुढे तो नवखा असला तरी त्याने दिलेल्या पुस्तकी ज्ञानातून इतरांना समाधान मिळालं नाही तरी त्याला स्वतःला तरी समाधान मिळायचं. म्हणून अभिजीत गंमतीने त्याला एखादी गोष्ट विचारायचा आणि अल्बर्ट आपलं बोलणं तोपर्यंत सुरु ठेवायचा, जोपर्यंत कुणी त्याला थांबवत नाही. कधीतरी कंटाळा आला की मुद्दाम अभिजीत त्याला एखादा प्रश्न विचारत असे. इथे सुध्दा थोडा विरंगुळा म्हणून अभिजीत त्याला विचारतो,
‘‘आपण आता कुठे आहोत?’’
‘‘सर, आता आपण अटलांटिक महासागरामध्ये आहोत.’’
‘‘मला पुर्ण माहिती दे...’’
‘‘सर, आपण ज्या महासागरामध्ये आता आहोत त्याच्या पश्चिमेस उत्तर व दक्षिण अमेरिका, पूर्वेस यूरोप व आफ्रिका आणि दक्षिणेस अंटार्क्टिका ही खंडे आहेत... उत्तरेचा आर्क्टिक महासागर हा काहींच्या मते अटलांटिकचाच एक उपसमुद्र आहे, तर उत्तरधृववृत्त व दक्षिणधृववृत्त या काहींच्या मते अटलांटिकच्या उत्तर व दक्षिण सीमा होत... यांच्या दरम्यान अटलांटिकची लांबी सुमारे 14,450 किमी. आहे, तर अंटार्क्टिकापर्यंत ती सुमारे 16,000 किमी. आहे... सामान्यतः विषुववृत्ताच्या उत्तरेचा तो उत्तर अटलांटिक व दक्षिणेचा तो दक्षिण अटलांटिक असे असले तरी वारे, प्रवाह व तपमान यांच्या दृष्टीने दोहोंमधील सीमा 5 अंश उत्तर अक्षवृत्त ही मानणे अधिक योग्य होय... दक्षिण अटलांटिकच्या मानाने उत्तर अटलांटिकमध्ये बेटे, उपसमुद्र आणि किनारे यांची विविधता अधिक आहे... कॅरिबियन समुद्र, मेक्सिकोचे आखात, सेंट लॉरेन्सचे आखात, हडसनचा उपसागर, बॅफिनचा उपसागर, भूमध्य समुद्र, काळा समुद्र, बाल्टिक समुद्र, बॅरेंट्स समुद्र, नॉर्वेजियन समुद्र हे अटलांटिकचे भाग होत... आर्क्टिक महासागरातून खुल्या अटलांटिकमध्ये बाहेर पडण्याच्या वाटा या पहायला गेलं तर अरूंद आहेत... अटलांटिकमध्ये पाणी वाहून आणणा-या प्रदेशाचे क्षेत्रफळ सुमारे 43 कोटी 23 लक्ष चौ.किमी., पॅसिफिकच्या किंवा हिंदी महासागराच्या अशा क्षेत्राच्या चौपट आहे... जगातील ब-याच मोठमोठ्या नद्या याच महासागराला मिळतात... याचा पूर्व किनारा सुमारे 51,500 किमी. व पश्चिम किनारा सुमारे 88,500 किमी. आहे...’’
‘‘ते नाही, हा महासागराचा संबंध कोणकोणत्या देशांसोबत जोडला जात आहे ते सांग...’’ अभिजीत आराखड्यामध्ये बघतच त्याला विचारतो. इतर सगळे आपलं हसू आवरण्याचा प्रयत्न करतात. ब्रुस तर अल्बर्टच्या या गोष्टीला कंटाळला होता. अल्बर्टने बोलायला सुरुवात केली की तो कानात कापसाचे बोळे भरुन ठेवत असे. हातात असलेला नकाशा समोर घेऊन अल्बर्ट पुढे बोलू लागतो.
‘‘सर, अटलांटिक महासागर खूप मोठा आहे म्हणून त्याचे दोन भाग आहेत, उत्तर आणि दक्षिण विभाग. उत्तर अटलांटिकपेक्षा दक्षिण अटलांटिक मोठा असून त्यात उपसमुद्र नाहीत... बेटे थोडी आहेत... सेंट पॉल रॉक्स, फर्नँदो नरोन्या, असेन्शन, सेंट हेलीना, त्रिनिदाद, मार्टिन व्हास, ट्रिस्टन द कुना, गॉफ् व बूव्हे ही सागरी बेटे आणि फरनँदो पो, साऊं टोमे, प्रिन्सिपे, आन्नबाँ, फॉकलंड, साउथ जॉर्जिया, साउथ सँडविच व साउथ ऑक्रनी ही खंडांशी संबद्ध आहेत... उत्तर अटलांटिकचे किनारे अधिक दंतुर व जटिल रचनेचे असून त्यांतील बेटे मोठी व पुष्कळ आहेत... फ्रान्झ जोझेफ, स्पिट्स्बर्गेन, बेअर आयलंड, यान मायेन, आइसलँड, फेअरो, अझोर्स, मादीरा, कानेरी, केप व्हर्द, न्यू फाउंडलंड, ब्रिटिश बेटे, वेस्ट इंडीज व बहामा ही त्यांतील काही बेटे आहेत...बर्मुडा भाग देखील याच महासागरामध्ये येतो... ग्रीनलंड हा या संदर्भात उत्तर अमेरिकेचा भाग समजला जातो... अंटार्क्टिकाच्या भोवतीचे तिन्ही महासागरांचे पाणी सारख्याच वैशिष्ट्यांचे असल्यामुळे 40 अंश दक्षिणच्या दक्षिणेचा अटलांटिकचा भाग दक्षिण महासागरात धरतात.’’ अल्बर्ट थांबतो.
‘‘ओके या वरुन तुला काय समजलं?’’
‘‘सर, यावरुन एक गोष्ट समजते. समजा, अटलांटिक महासागरामध्ये एखादी प्रसरण पावणारी घटना घडत असेल तर कालांतराने ती एक एक करुन अर्ध्या जगामध्ये पसरत जाईल... महासागराला सीमा आपण ठरवल्या आहेत, तरीही प्रसरण पावणारी गोष्ट इतर महासागरांमध्ये देखील परसेल...’’
‘‘अगदी बरोबर... म्हणजे मूळ मुद्दा तुला कळला आहे...’’
‘‘हो सर...’’
‘‘आता एक काम कर, मोहम्मदच्या रडारवर ज्या गोष्टी आपल्याला दिसताहेत त्या तू नोट करुन ठेव... गंभीर असं काही दिसलं तर मला लगेच कळव... मी पाणबुडीच्या खालच्या कक्षामध्ये आहे...’’