Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण २

बघता बघता चार दिवस निघून जातात. विवाहाचा दिवस उजाडतो. दल्या दिवशी अभिजीतच्या घरी हळदीचा कार्यक्रम उरकला जातो. त्याची आई व नात्यातील बायका त्याला सुगंधी तेलात भिजविलेली हळद लावतात, नंतर अभिजीतला समारंभपूर्वक आंघोळ घातली जाते. शिल्लक राहिलेली म्हणजे उष्टी हळद, साडी आणि पूजेच्या साहित्यासह श्रेयाच्या घरी नेली जाते. श्रेयाला हळद लावताना नारळ आणि पाच मूठभर तांदळाची तिची समारंभपूर्वक ओटी भरली जाते.

 

दुस-या दिवशी म्हणजे विवाहाच्या दिवशी अभिजीत, त्याचे आईवडील आणि नातलग जवळच्या देवळात जातात. तिथे पुजा करतात, श्रेयाचे आईवडील आणि नातलग त्यांचं स्वागत करण्यासाठी देवळात जातात. तिथे गणपती आणि वरुण देवतांचे प्रतीक असलेली सुपारी आणि कलश यांची पूजा केली जाते. विष्णूस्वरुप नवरदेवास आपली लक्ष्मीसारखी कन्या द्यावयाची असल्यामुळे श्रेयाचे आईवडील प्रथेप्रमाणे अभिजीतची पूजा करतात. त्यावेळी त्याला नवीन पोषाख अर्पण करतात. श्रेयाची आई अभिजीतच्या आईचे पाय धुते, मग अभिजीतची आई इतर आप्तेष्ट महिलांची ओटीभरण विधी करते. देवळातील विधी उरकल्यानंतर श्रेयाच्या घरी जाण्यासाठी अभिजीतची वरात निघते. वरात वाजतगाजत श्रेयाच्या घरी पोहोचल्यावर मंडपप्रवेशद्वारावर अभिजीतची पंचारती ओवाळून सुवासिनी त्याचे स्वागत करतात. त्याला मंडपात समारंभपूर्वक नेऊन चौरंगावर बसवतात, शुभ मुहूर्ताची योग्य वेळ कळण्यास्तव पुरोहित घटिकापात्राची योजना करतो. श्रेयाला बोलावण्यात येतं. दोघेही यज्ञासमोर एकमेकांशेजारी बसतात.

 

तसं पहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये मुख्यतः तीन प्रकारे विवाह सोहळे साजरे केले जातात. वेदमंत्रोच्चाराचा समावेश असलेली वैदिक पध्दती, वेदमंत्रविरहित पौराणिक पद्धती आणि लोणावळ्याच्या धर्मनिर्णय मंडळाने सुचविलेली पुनर्रचित वैदिक पद्वती. उच्चवर्णीय लोक पहिल्या पद्धतीचा अंगिकार करतात, ब्राम्हणेतर दुस-या  आणि कुठल्याही जातीचे लोक तिस-या पद्धतीनुसार विवाह करतात. अभिजीत आणि श्रेया वैदिक पद्वतीने विवाहबध्द होत होते.

 

लग्न लागण्याच्या सुरुवातीला पुरोहितच्या सांगण्यानुसार अभिजीत पुर्वाभिमुख उभा राहतो. त्याच्यासमोर स्वस्तिक चिन्ह रेखांकित केलेला अंतरपाट धरला जातो. त्याच्या पुढ्यात अंतरपाटाच्या दुस-या बाजूला श्रेया उभी असते. पुरोहित मंगलाष्टके पठन करतो. शुभ मुहूर्ताचा क्षण येताच मंगलाष्टक पठन बंद होते, पुरोहित अंतरपाटा उत्तरेकडे ओढून घेतो, वादक वाजंत्री वाजवतात आणि आमंत्रित पाहूणे अभिजीत आणि श्रेयावर अक्षता टाकतात. अगोदर श्रेया अभिजीतच्या गळ्यात वरमाला घालते. नंतर अभिजीत श्रेयाला पुष्पहार घालतो, नंतर पुन्हा यज्ञासमोर बसल्यावर विधीनुसार अभिजीत श्रेयाच्या गळ्यात मंगसूत्र बांधतो.

 

श्रेयाचे आईवडील कन्यादान करतात. आपल्या कन्येची धर्म, अर्थ आणि कर्माच्या बाबतीत कुठल्याही प्रतारणा करु नये असे श्रेयाचे वडील अभिजीतला प्रथेप्रमाणे सांगतात.नातिचरामिया शब्दांनी अभिजीत प्रतिसाद देतो. होमाग्नी प्रज्वलीत केला जातो. त्यानंतर होम विधी होतो. अभिजीत मंत्रोच्चार करीत असताना श्रेया होमाग्नीला भाताच्या लाह्या त्रिवार अर्पण करते. लाह्यांचे चौथे आणि अंतिम अर्ध्यदान ती अभिजीतचे मंत्रोच्चार थांबल्यावर स्तब्धपणे करते. नंतर ते जोडपे पवित्र होमाग्नी, भूमाता आणि देवाब्राम्हणांना साक्षी ठेवून अशी शपथ घेतात की, आयुष्याच्या अंतापर्यंत सर्व सुखदुःखांमध्ये ते एकमेकांचे साथीदार राहतील. त्यानंतर अग्निपरिणयन आणि अश्मारोहण विधी पार पडतात. यज्ञवेदीच्या सभोवती सात पाटांवर प्रत्येकी एक अशा तांदळाच्या लहान लहान सात राशी मांडलेल्या असतात. प्रत्येक राशीवर सुपारी ठेवलेली असते. होमाग्नी अध्र्यदानाने प्रज्वलीत केला जातो. पुरोहिताच्या सतत मंत्रोच्चार चालू असताना दोघेही यज्ञवेदीभोवती प्रदक्षिणा घालतात. तसे करताना प्रथेप्रमाणे अभिजीत श्रेयाचा हात धरुन पुढे चालतो. श्रेया तांदळाच्या प्रत्येक राशीवर प्रथम उजवे पाऊल ठेवते आणि त्याच प्रकारे सर्व राशींवर पाऊल ठेवून चालते. प्रत्येक पदाचा स्वतंत्र मंत्र उच्चारला जातो. त्यानंतर ते दोघे होमाग्नीस तूप आणि लाह्या अर्पण करतात. सप्तपदीनंतर दोघे अचल अशा ध्रुवता-याचे दर्शन घेऊन हात जोडून नमस्कार करतात. विवाहसंवधनाचे आजन्म चिरंतन पालन करण्याच्य प्रतिज्ञेचे ते प्रतिक असते.

 

विवाह संपन्न झाल्यानंतर अभिजीतच्या घरी श्रेयाचा गृहप्रवेश होतो. त्यानंतर गृहप्रवेश, लक्ष्मीपूजन, देवकोत्थापन आणि मंडापोद्वासन ह्या विधींनंतर त्यांचा विवाह ख-या अर्थाने संपन्न होतो. श्रेयाच्या आयुष्यातला तो खूप मोठा आणि खास दिवस असतो. दोन्ही घरातील मंडळी खूप खूश असते. काही दिवसांनी सर्व नातलग आपापल्या घरी जातात.

 

देवदर्शन करुन अभिजीत आणि श्रेया अर्जेंटिनाला जाण्याची तयारी करतात. अभिजीतची आई श्रेयाला अभिजीतची काळजी घ्यायला सांगते. तसेच श्रेया पहिल्यांदाच भारताबाहेर जात असल्याने त्या अभिजीतलादेखील श्रेयाची काळजी घ्यायला सांगतात. श्रेयाचे आणि अभिजीतचे आईवडील त्या दोघांना निरोप देण्यासाठी विमानतळावर जातात. डोळयासमोर असणारी आपली मुलगी आपल्यापासून सातासमुद्रापार जातेय, मावशीकडे जरी जायचं म्हटलं तरी रडणारी ती, भारताबाहेर तिला करमेल का? अभिजीत आणि ती, दोघांना व्यवस्थित संसार करता येईल का? जवळचं कोणीही तिथे नसताना ते दोघे कसे राहतील? आजारी पडल्यावर काय करतील? असे अनेक प्रश्न श्रेयाच्या आईच्या मनात येत असतात. मुलीच्या लग्नात त्या जितक्या रडल्या नाहीत तेवढ्या त्या तिला विमानतळावर सोडायला जाताना रडत असतात. श्रेया आणि अभिजीत त्यांना धीर देतात.

 

अभिजीत, ‘‘आई, तुम्ही अशा रडणार असाल तर आमची जायची इच्छा तरी होईल का?’’

 

श्रेया, ‘‘आई, काळजी नको गं करुस, अभीचे काही मित्र आहेत तिथे. काही अडचण असेल तर सांगू ना तसं आम्ही. तू रडणं बंद कर अगोदर, नाहीतर मला पण रडायला येईल.’’

 

श्रेयाचे वडील, ‘‘अगं, लेक तिच्या संसाराला चालली आहे. असं रडत पाठवणार आहेस का तू तिला?’’ इतक्यातआफ्रिका मार्गे अर्जेंटिनाला जाणा-या विमानाच्या प्रवाशांनी त्यांच्या तिकीट आणि सामानाच्या तपासणीसाठी खिडकी क्रमांक 12 वर यावे’’ अशी घोषणा होते.

 

तरीही श्रेयाची आई ऐकेना, ती त्या दोघांना लहानसहान गोष्टी समजावून सांगत होती. श्रेया सुध्दा तिच्या आईकडे टक लावून पाहत होती. ती भावनाविवश होऊन बोलत नव्हती. शांत, स्थिर आवाजात बोलत होती

 

श्रेयाला देखील काही कळेनासं झालं होतं. तिला वाटू लागलं होतं की, ती पुन्हा एकदा लहान झाली आहे आणि तिची आई गाणे गुणगुणतेय. तिचा स्वर असा लागला की तिला जोरात सांगावं,  ‘‘आई, मला कायम तुझ्याजवळच रहायचं आहे. तुझ्या कुशीमध्ये डोकं ठेवून शांत झोपायचं आहे. मी कुठेच नाही जात. तुझ्याबरोबर परत घरी येते.’’

 

आफ्रिका मार्गे अर्जेंटिनाला जाणा-या...घोषणा झाल्यावर श्रेया एकदम दचकते. आता त्या दोघांना खरंच निघायला हवं होतं. अभिजीत आणि श्रेया चौघांच्या पाया पडतात. दोघेही लगबगीने निघतात. श्रेया सिक्युरिटी चेकमधून आत जाताना शेवटपर्यंत हात हलवत होती. तिच्या डोळ्यांसमोर पाण्याचा एक पातळ पडदा तयार झाला. त्या पडद्यातून दिसणारी तिच्या आईची आकृती हळूहळू धूसर होत गेली.

 

विमानामध्ये बसल्यानंतर श्रेया जरा उदास असते. अभिजीतच्या ते लगेच लक्षात येतं.

 

‘‘काय गं? काय झालं?’’

 

‘‘माहित नाही रे... कसंतरीच वाटतंय... पहिल्यांदाच विमानाने प्रवास करतेय ना! आईचा चेहरा डोळ्यासमोर येतोय नुसता... तिला करमनार नाही माझ्याशिवाय... एक वेळ घरात बाबा नसले तरी काही वाटत नाही, पण मी नसले तर आई लगेच शोधाशोध सुरु करते... तेव्हा दोन मिनीटसुध्दा इकडे तिकडे झाली तरी जीव कसा खालवर व्हायचा तिचा, आणि आता तर कायमची तिच्यापासून लांब चाललेय...’’

 

‘‘शोना माझी, अगं वेडे, आपण एकविसाव्या शतकामध्ये आहोत. तुला तुझ्या आईला रोज पहायचंय का?’’

 

‘‘हो...’’

 

‘‘बरं, तिथे आपल्या घरी इंटरनेट असेल. जेव्हा तुला आईसोबत बोलावसं वाटलं तर स्काईप न कर, तू आईसोबत व्हिडीओ चॅट करुकशील आणि आईलासुध्दा इंटरनेट न करता येतोय.’’

 

‘‘हो रे...’’

 

‘‘असंही तुला माहितच आहे, अचानक काम निघालं तर मला लगेचच महासागरात जावं लागतं. संशोधन करायला कधी कधी दोन-चार महिनेसुध्दा लागतात.’’

 

‘‘(खोडकरपणे) ए हॅलो... हे सांगायला तू थोडा उशीर केलास... जर तू हे मला चार दिवस आधी सांगितलं असतंस तर कदाचित मी तुझ्याशी लग्नंच केलं नसतं... मी एकटी तिथे काय करणार? विमान चालू होतयं हा... आत्ताच काय ते सांग... नाहीतर लगेच उतरेन मी...’’ अभिजीतला हसू येतं.

 

‘‘डियर, मला पुढचं आयुष्य तुझ्यासोबतच जगायचंय. फक्त काही दिवस मला असं बाहेर काम करावं लागणार आहे. आमच्या संस्थेच्या मुख्य कार्यालयामधले जॉर्डन सर मला त्यांच्यासोबत डेन्मार्कलाच काम करायला सांगताहेत. फक्त अर्जेंटिनाचं काम होऊ दे... मग बघ, आपल्याला वेळच वेळ मिळेल... नंतर मी आपल्या आईबाबांना देखील डेन्मार्कलाच बोलावून घेईन...’’

 

‘‘ओके... ओके... ठिक आहे... आय हॅव नो ब्जेक्शन... सगळं खरं खरं सांगितलंस म्हणून वाचलास तू... नाहीतर तुझी विकेटच पडली असती आता...’’ श्रेया अभिजीतला कोपरा मारुन म्हणते.

 

थोड्या वेळात विमान उडू लागतं. श्रेया खिडकीमधून खाली जमिनीकडे पाहत असते. आफ्रिकेच्या दिशेने जात असताना विमान पाण्याच्या वरुन जात असतं, दुरपर्यंत तिला फक्त पाणीच पाणी दिसतं. कुठे जमीन नाही ना कोणता जहाज नाही, स्वच्छ आणि निळसर पाणीच तिला दिसत असतं. ती अभिजीतकडे बघते तेव्हा तो काही कागदपत्रे तपासत असतो.

 

‘‘एक विचारु.’’

 

‘‘हं... हो... विचार...’’ अभिजीत त्या कागदांमध्ये डोकं खूपसूनच अवघडत उत्तर देतो.

 

‘‘समुद्रामध्ये खूप शांत शांत वाटत असेल ना तुला?’’

 

‘‘हो.. हो..’’ अभिजीतचा पुन्हा तोच स्वर असतो.

 

‘‘मी बोलतेय ना तुझ्याशी! हे पेपर तू ऑफिसमध्ये गेल्यावरसुध्दा वाचू शकतोस ना?’’

 

आपल्या हातातील कागदपत्रे बाजूला ठेवत अभिजीत तिच्याकडे बघतो, ‘‘बोल, काय विचारतेस?’’

 

‘‘मला तुझे समुद्रातले अनुभव सांग ना! अर्जेंटिनाला जाईपर्यंत तेवढाच टाईमपास होईल.’’

 

‘‘टाईमपास? ठिक आहे, टाईमपास तर टाईमपास. ऐक... आपल्या पृथ्वीचा खूप मोठा भाग समुद्राने व्यापला आहे.’’

 

‘‘हॅलो... लहान नाहीये मी... माहित नसलेलं काही सांग...’’

 

‘‘बरं... मी नक्की काय काम करतो हे सांगतो. महासागरामध्ये पाणी आणि वायू यांच्यात उभी व आडवी हालचाल व एकमेकांसोबत मिश्रणक्रिया दूरपर्यंत होत असते. यामध्ये बहुतेक ठिकाणच्या पाण्यात संर्पक येत असतो. सांगायचं झालं तर, हिंदी महासागरात वादळाने निर्माण झालेली लाट पॅसिफिक ओलांडून कॅलिफोर्नियाच्या किना-यापर्यंत जाते, तर अंटार्क्टिचे थंड, जड पाणी विषुववृत्ताच्या ब-याच उत्तरेस आढळते. अशा प्रकारे पाण्याचा १ कण सुमारे ५,००० वर्षांमध्ये सर्व महासागरांतून  फिरून येत असतो, असे गणितीय अनुमान सांगतं. यामुळे संपूर्ण महासागर हा एकच जलाशय आहे असे समजून आम्हाला त्याचे संशोधन करावे लागते. काही अभ्यास प्रयोगशाळेत करता येऊ शकतात. संपूर्ण महासागराचा अभ्यास व संशोधन करण्यासाठी खास जहाजांतून आम्हाला प्रत्यक्ष महासागरात जावं लागतं आणि शक्य तेवढ्या खोलवर जाऊन प्रत्यक्ष निरीक्षणे करावी लागतात.’’

 

‘‘बाप रे... मग तू जहाजाने जातोस? लास्ट टाईम मला म्हणाला होतास पाणबुडीतून जातोस म्हणून...’’

 

‘‘आपण कुठे आणि काय संशोधन करतोय यावर हे सगळं अवलंबून असतं... समज मला पाण्याच्या वरच्या भागात काम करायचं असेल तर आम्ही जहाजाने जातो आणि पाण्याखाली जास्त खोलवर जायचं असेल तर पाणबुडीचा वापर करतो. मी हल्ली पाणबुडीने जाऊ लागलोय, अगोदर मी जहाजामधून जायचो. आमच्या जहाजांवर संशोधन कर अवघड व खर्चाचे असतं म्हणून आम्हाला मोहिमेची काळजीपूर्वक आखणी करावी लागते. जहाज, उपकरणे, साधनसामग्री व वेळ या गोष्टी योग्य प्रकारे निवडाव्या लागतात. त्यामुळे कमी वेळात जास्त काम होऊ शकतं. अशा जहाजांवर आम्हा संशोधकांना व तंत्रज्ञांना खवळलेल्या समुद्रात जास्त वेळपर्यंत काम करावं लागतं. त्यासाठी आम्हा सर्वांना खास प्रशिक्षण घ्यावं लागलं. पाण्याची खोली, विशिष्ट गुण, तापमान, चुंबकत्व इत्यादींचे मापन करणे, पाणी, जीव व गाळाचे नमुने घेणे  व त्यांचे विश्लेषण करणे, जीव ओळखणे व त्यांची चित्रे काढणे, यंत्र आणि उपकरणे दुरुस्त करणे नाहीतर वेळ पडल्यास नवीन बनविणे अशी असंख्य कामे आम्हाला करावी लागतात. त्यामुळे आम्हाला जीवविज्ञान, भौतिकी, रसायनशास्त्र, भूविज्ञान, इलेक्ट्रॉनीय व साधी उपकरणे, चित्रकला या सगळ्या विषयांची पुरेशी माहिती करुन घ्यावी लागते. सलगपणे माहिती नोंदणारी उपकरणे वापरून मिळणारी माहिती आकडे वा चिन्हांच्या रुपांत कागदावर नोंदवावे लागतात. अशा व इतर प्रकारे मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करावे लागते. मग तो अहवाल आम्ही जॉर्डन सरांकडे देतो...’’

 

‘‘बस्स... बस्स... बस्स... कसं जमतं तुला हे सगळं? नुसता विचार करुनच माझं डोकं दुखायला लागलंय...’’

 

‘‘थांब, मी तुला माझे जहाजावरचे आणि पाण्याखालचे फोटो दाखवतो.’’ असं म्हणत अभिजीत त्याचा लॅपटॉप उघडतो, फोटो असलेलं फोल्डर उघडून लॅपटॉ श्रेयाकडे देतो. मग कोणता फोटो कुठे काढला, कसा काढला, जहाजावरचे फोटो तो तिला दाखवतो. श्रेयादेखील आवडीने ते सर्व फोटो पाहते.