Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण ९

प्रत्येक महासागर व तेथील जीवशास्त्रीय परिस्थिती तसेच विविध जीवांच्या भौगोलिक वाटणीची कारणे यांचा आभ्यास करणे, हा या मोहिमेचा उद्देश होता... हा अभ्यास करण्यासाठी पाण्याचे नमुने घेणे, पाण्याचे पृष्ठालगतचे व तळालगचे तापमान मोजणे, सागरी  प्रवाहांचे व हवेच्या दाबाचे मापन करणे, सागराच्या तळावरील गाळाचे नमुने घेऊन त्यांचे विश्लेषण करणे जीवांच्या नव्या जातींचा शोध घेणे वगैरे कामे करण्यात आली

 

नान्सेन हा १८९३ मध्येफ्रामया जहाजातून जास्तीत जास्त उत्तरेस गेला होता...१९२५ ते 19२७ या काळातमिटिअरया जर्मन जहाजाने दक्षिण अटलांटिकचे भौतिकीय व रासायनिक दृष्टींनी अध्ययन केले व तेथील गाळाचा अभ्यास केला...डिस्कव्हरी-१डिस्कव्हरी-२या इंग्लंडच्या जहाजांतून पहिल्या महायुद्धांनंतर करण्यात आलेल्या मोहिमेतून विशेषतः दक्षिण गोलार्धातील महासागराची, बरीच माहिती उपलब्ध झाली...१९२७-२९ या काळातकार्नेगीहे अमेरिकन जहाज, दुस-या महायुद्धात आणि नंतरच्या काळात नाविक दलाची जहाजे तसेच आंतरराष्ट्रीय भूभौतिकीय वर्षात अनेक वैज्ञानिक जहाजे यांतून महासागराची महत्त्वपूर्ण निरीक्षणे करण्यात आली...३ गस्ट १९५८ रोजी अमेरिकेच्या अणुऊर्जेवर चालणा-या पाणबुडीने भौगोलिक उत्तर धृवाच्या बर्फाखालून प्रवास केला...’’

 

अभिजीत, ‘‘ठिक आहे, सध्या इतकी माहिती ठिक आहे...’’

 

जेन, ‘‘पण अॅडव्हान्स माहिती तर मी आता सांगणारच होते...’’

 

अभिजीत इशा-याने तिला ब्रुसकडे बघायला सांगतो. त्यामुळे थोडा वेळ शांतता असते. मेजर रॉजर्ड यांना ब्रुस झोपी गेला ही गोष्ट माहित नसते म्हणून ते बोलू लागतात,

 

‘‘जेनने दिलेली माहिती ऐकल्यानंतर तुमची टीम प्रत्येक गोष्टीचा चांगला अभ्यास करुन जाणीवपूर्वक मोहिमेची आखणी करते... खरंच, माझ्या मनात तुमच्या जॉर्डन सरांविषयी सन्मानाची भावना आता आणखीच वाढली आहे.’’ जेन अभिजीतला डोळा मारते आणि ब्रुसशेजारी आपल्या जागेवर जाऊन बसते. नंतर कोपरखळी मारुन ती त्याला उठवते.

 

अभिजीत पुन्हा प्रोजेक्टरजवळ जातो आणि बोलू लागतो, ‘‘हे सर्व फक्त आपल्या माहितीसाठी सांगण्यात आलं, आतापर्यंत झालेल्या मोठमोठ्या मोहिमांचा हा एक छोटासा आढावा होता. मात्र आपली मोहिम ही या सर्व मोहिमांपेक्षा वेगळी असणार आहे. त्याआधी तुम्हा सर्वांना एक महत्तवाची गोष्ट सांगतो. काल जॉर्डन सरांबरांबर माझं बोलणं झालं तेव्हा एक दुर्दैवी गोष्ट मला कळाली. ती म्हणजे, अंटार्क्टिका खंडावर होणा-या हालचालींमुळे जगभरातील जवळजवळ 65 टक्के महासागर वैज्ञानिक आणि संशोधक बेपत्ता झाले किंवा मरण पावले. या हालचाली नक्की का होत आहे किंवा अशी कोणती गोष्ट त्या ठिकाणी होत आहे, ज्यामुळे तिथल्या जलचरांना आपल्याकडे स्थलांतर करावं लागतंय, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या मोहिमेद्वारे मिळवायची आहे.’’

 

बार्बरा, ‘‘आपण आता नक्की काय करायला हवं सर?’’

 

अभिजीत, ‘‘सर्वप्रथम मोहम्मद आणि त्सेन्ग, तुम्ही दोघांनी अंटाक्टिका खंडाजवळ जाणा-या मार्गाचा नकाशा तयार करा... ब्रुस, तू रॉजर्ड सरांबरोबर जाऊन पाणबुडीची योग्य ती माहिती घे... अल्बर्ट आणि स्टिफन, मला वातावरणाची माहिती द्या, पुढील चार आठवडे तिथल्या लाटा, वारे, वादळे आणि एकूणच सर्व प्रकारच्या हवामानाची माहिती मला हवी आहे... रॉजर्ड सर, पाणबुडीच्या क्षमतेची तपशीलवार माहिती मला आपल्याकडून हवी आहे... हवामान आणि इतर परिस्थिती योग्य असेल तर आपल्याला दोन दिवसांनंतर तिथे मार्गक्रम करावे लागेल, तर आपण सर्वांनी आत्ताच कामाला लागलेलं बरं...’’

 

अमेरिकी नौसेनेचे अधिकारी मेजर रॉजर्ड हे वयाने आणि अधिकाराने सर्वांपेक्षा मोठे असले तरी अभिजीतने दिलेल्या सुचनांचं पालन ते करत होते. जॉर्डन सरांनी त्यांना अभिजीतच्या टीमबद्दल योग्य ती सर्व प्रकारची माहिती दिली होती. नौसेनेतील मोठे अधिकारी असले तरी ते अमेरिकी नौसेनेमध्ये, इथे मी एका मोहिमेवर आलो आहे आणि अभिजीत या मोहिमेचा प्रमुख असल्याने ते अभिजीतच्या सर्व सर्व सुचनांचं तंतोतंत पालन करतात. ब्रुसला ते एका छोट्या जहाजाने पाणबुडीपर्यंत घेऊन जातात. प्रयोगशाळेजवळच्या समुद्रकिना-यापासून ती पाणबुडी दोन तासांच्या अंतरावर असते. तिथे अमेरिकी नौसेनेतील सैनिक तिची देखभाल करत असतात. अभिजीत संशोधन करत असलेल्या पाणबुडीपेक्षा ही पाणबुडी खूपच वेगळी होती. पाणबुडीच्या आत शिरल्यानंतर मेजर रॉजर्ड ब्रुसला माहिती देऊ लागतात.

 

‘‘ही आमची अमेरिकी नौसेनेची पाणबुडी आहे... आपण युध्दाला न जाता एका मोहिमेसाठी जात आहोत म्हणून आम्ही ही हत्यारं नसलेली पाणबुडी आपल्या मोहिमेसाठी निवडली...’’ ब्रुस त्यांचं बोलणं ऐकत पाणबुडीचं निरिक्षण करत असतो. मेजर रॉजर्ड पुढे एका यंत्राकडे बोट दाखवत सांगतात,

 

‘‘हे आपल्या पाणबुडीमधली महत्त्वाचे उपकरण आहे... सोनार... पाण्यातून प्रवास करीत असताना मार्गात येणारे अडथळे व इतर पाणबुड्या यांचा सुगावा या यंत्रणेने लागतो... त्याच्या बाजूला जो आराखडा आहे तो आहे जलनिरोधी विभागाचा, हे विभागक पाच ठिकाणी बसविलेले असतात... त्यामुळे पाणबुडीच्या अंतर्भागात सहा कक्ष तयार होतात... त्यांतील दरवाजे जलनिरोधी असतात... त्यामुळे एखाद्या कक्षात पाणी आल्यास तो कक्ष इतरांपासून अलग करता येतो व इतर कक्षांत पाणी येत नाही... या विभागकामुळे आपल्या पाणबुडीच्या प्राकृतिक जलविरोधी नौकायेचे बल वाढते... इथून आतमध्ये भोजन कक्ष आहे... यातच आपले खाद्यपदार्थांचे भांडार समाविष्ट असेल...’’

 

थोड्या पुढे गेल्यानंतर ते एका स्विच फलकाजवळ येऊन थांबतात आणि ब्रुसला त्या स्विच फलकाबाबत माहिती देतात.

 

‘‘आपल्या मोहिमेसाठी ही पाणबुडी खरोखरंच योग्य आहे का?’’ ब्रुसच्या मनात शंका उपस्थित होते.

 

‘‘म्हणजे? मला समजलं नाही...’’ मेजर रॉजर्ड जरा दचकतात.

 

‘‘आपल्या मोहिमेसाठी आपल्याला यापेक्षा जास्त शक्तीशाली पाणबुडी लागणार आहे... कदाचित आपल्याला त्सुनामीचा देखील सामना करावा लागेल, आपण सांगितलेल्या क्षमतेनुसार ही पाणबुडी पाण्यात टिकाव धरेल असं मला तरी वाटत नाही’’ ब्रुस आपली शंका स्पष्ट करतो.

 

‘‘अच्छा, असं म्हणतोस... व्हेरी गुड... या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर पुढे जाऊन त्याचे परिणाम भोगावे लागतात... इथून आतमध्ये ये...’’

 

मेजर रॉजर्ड ब्रुसला एका कक्षामध्ये घेऊन जातात. तिथे एक वेगळीच यंत्रणा बसवलेली असते. ब्रुसने अशी यंत्रणा कधीही पाहिली नव्हती.

 

ब्रुस, ‘‘हे काय आहे? आतापर्यंत मी अनेक प्रकारच्या पाणबुड्यांमधून प्रवास केला आहे... अशी यंत्रणा मी पहिल्यांदाच पाहतोय...’’

 

मेजर रॉजर्ड, ‘‘हं... ही यंत्रणा कोणत्याही लष्कराकडे नाही, एव्हाना या यंत्रणेबाबत बाहेर कुणालाही माहिती नाही.आमच्या संशोधकांनी पाणबुडीवर वेगवेगळे प्रयोग केले होते, तेव्हा इंधन वाचवण्यावर त्यांनी एक छान युक्ती शोधून काढली... या विभागामध्ये एक वेगळा जनरेटर बसवला आहे... पाणबुडी जेव्हा पाण्याच्या आतमधून जात असते तेव्हा प्रवाहाच्या विरुध्द याचे पाते फिरतात... पाणबुडी जितक्या जास्त वेगाने पुढे जात राहिल तितक्या जास्त वेगाने हे जनरेटर चार्ज होत राहील... आपण या यंत्रणेच्या सहाय्याने संपूर्ण जगाला प्रदक्षिणा घालू शकतो, तेही इंधनाचा वापर न करता...’’

 

ब्रुस बघतच राहतो, जगाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही पाणबुडीची नोंद नाही. मेजर रॉजर्ड पुढे बोलतात, ‘‘समजा आपण पाण्याच्या बाहेर आलो आणि आपल्याला र्जा हवी असेल तर आपल्या पाणबुडीच्या वरच्या बाजूला सोलर पॅनल बसवलेले आहेत, त्यामुळेदेखील आपल्याला भरपूर ऊर्जा मिळू शकेल...’’

 

‘‘मेजर रॉजर्ड, हा एक क्रांतीकारी शोध आहे...आपण याची माहिती जाहीर करायला हवी होती...’’ ब्रुस जरा आक्रमक होतो.

 

‘‘नाही, हा आमच्या संशोधकांनी केलेला प्रयोग आहे... आम्ही याची माहिती बाहेर कुणालाही देऊ शकत नाही...’’

 

‘‘पण हे चुकीचं आहे, आज कितीतरी मोहिमा इंधनाकडे बघून रद्द केल्या जातात... आज अंटार्क्टिकामध्ये जे संशोधक अडकले आहेत त्यांना देखील इंधनाची आवश्यकता आहे, आपली ही यंत्रणा आज बाहेर माहीत असती तर अनेक संशोधकांचा जीव आपल्याला वाचवता आला असता...’’

 

‘‘ब्रुस, माझ्या बाळा, मी तुझ्या मनातला क्रोध समजू शकतो... पण हे सर्व माझ्या हातात नसतं... माझ्यादेखील वर काही अधिकारी असतात... त्यांच्या आज्ञेपुढे आम्हाला काही करता येत नाही...’’

 

‘‘तुमच्या ताफ्यामध्ये अशा किती पाणबुड्या आहेत?’’

 

‘‘सध्या तरी ही एकच आहे...’’

 

ब्रुस काहीच बोलत नाही. दोघे पुढच्या कक्षात जातात. मेजर रॉजर्ड पुढे बोलू लागतात, ‘‘या कक्षामध्ये तोफा व विमानविरोधी तोफ यांना लागणारा दारूगोळा या ठिकाणी साठविला जातो... त्याच्या पुढे भांडार आहे...या भांडारमध्ये सर्वसाधारणपणे लागणारे अभियांत्रिकी सामान व हत्यारे असतात... त्याच्या पुढे सुकाणू कक्ष... याबाबत तुला माहिती असणारच,पाणबुडीची दिशा नियंत्रित करणा-या सुकाणूचे संचालन या कक्षातून होते आणि त्यामुळे पाणबुडी इच्छित मार्गावर चालविता येते...’’

 

ब्रुसच्या मनात त्या क्रांतीकारी यंत्रणेबद्दल विचार सुरु असतात. मेजर रॉजर्ड यंच्या बोलण्याकडे त्याचं लक्ष नसतं.

 

‘‘हे परिदर्शक आहे, आम्ही यामध्ये थोडा बदल केला आहे... आपली पाणबुडी साधारण 20 मीटर खोल पाण्यात असतानासुध्दा आपण समुद्राच्या पृष्ठभागावर पाहू शकतो. 10 मीटर खोल पाण्यात पाणबुडीच्या वरून सर्वसाधारणपणे इतर पृष्ठ भागावरील जहाजे जाऊ शकतात व त्या ठिकाणी बाहेरील पाण्यात शांतता असते...त्याच्या बाजूला दिशाशोधक आहे... सागराच्या पृष्ठभागावर असताना पाणबुडीचे भौगोलिक स्थान ठरविण्याकरिता किना-यावरील विशिष्ट केंद्रांशी रेडिओ संदेशाद्वारा संपर्क साधण्याच्या या यंत्रणेच्या साहाय्याने स्थिती मिळविता येते... रडार तर तुला माहीतच आहे... ज्या वेळी शक्य असेल तेव्हा विशेषतः रात्रीच्या वेळी रडारचा उपयोग करून आपल्याला पृष्ठभागावर टेहळणी करता येते... रडारचा उपयोग करत असताना त्याचा आधारस्तंभ पाण्याबाहेर काढावा लागतो, पण आपल्या रडारला हा नियम लागू होत नाही...’’

 

ते दोघे पुन्हा प्रयोगशाळेच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु करतात. वाटेत ब्रुसचं विचारचक्र सुरु होतं, ‘जर माणसाकडे चांगल्या क्षमता आहे, निसर्गाचं संवर्धन करण्याचे मार्ग सापडले आहेत तर त्या क्षमता, ते मार्ग तो इतरांना का सांगत नाही? ज्याप्रमाणे अमेरिकी नौसेनेच्या अधिका-यांनी सौर ऊर्जा आणि समुद्रांतर्गत प्रवाहाच्या सहाय्याने निर्माण होणारी ऊर्जा वापरुन कार्यक्षम होणारी क्रांतीकारी पाणबुडी इतर देशांपासून गुप्त ठेवली, त्याप्रमाणे इतर देशांनी देखील असे काही शोध फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवले. जर संशोधकांनी आपले शोध असेच गुप्त ठेवले असते तर आज ज्या गोष्टी घडत आहेत, माणसाचं जीवन ज्याप्रमाणे सुरळीत झालं आहे, ते तितकं सुरळीत झालं नसतं. नक्की दोष द्यायचा तरी कुणाला? माणूस स्वतःचंच बघत बसला आणि आता त्याच माणसाने संपूर्ण पृथ्वीलाच मृत्यूच्या जबड्यात आणलं...

 

प्रयोगशाळेजवळ पोहोचल्यावर मोहम्मद त्यांना मोहिमेची माहिती देतो, ‘‘पुढील दोन दिवस वातावरण खराब असल्यामुळे आपल्याला परवा पहाटे अंटार्क्टिकाच्या दिशेने प्रवास करावा लागणार आहे... संशोधनासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या आम्ही प्रयोगशाळेमध्ये ठेवल्या आहेत...अभिजीत सर म्हणाले, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मोहिमेच्या सर्व गोष्टी पाणबुडीमध्ये ठेवा... वातावरण स्थिर झालं तर कदाचित आपल्याला या दोन दिवसांतच मोहिमेला जावं लागेल...’’

 

पुढील दोन दिवस अभिजीत संशोधनाचे आराखडे बनवतो आणि शिल्लक असलेला वेळ प्रत्येक जण आपल्या कुटूंबाच्या सहवासात असतो.

 

श्रेया, ‘‘चला, बरं आहे. तुला लग्नानंतर बायकोची कटकट सहन करावी लागत नाहीये...’’

 

अभिजीत, ‘‘डियर, थोडं थांब... तिथून परत आलो की होईल सगळं व्यवस्थित...’’

 

श्रेया, ‘‘आय होप सो...’’