Android app on Google Play

 

प्रकरण १६

 

पाण्याचा प्रवाह वाढला होता. त्यामुळे पाणबुडीला ज्या मार्गाने जायचं होतं त्या मार्गाने जाता येत नव्हतं. रडार, दिशादर्शक काही काम करत नव्हतं. समुद्राच्या लाटा जास्तच उसळल्या होत्या. अभिजीतला काचेतून देखील बाहेरचं काही दिसत नव्हतं. विश्वास बसणार नाहीत अशा 30 मीटरपर्यंत उंचीच्या समुद्राच्या लाटा होत्या. प्रत्येक 1000 मीटरवर लाटांचा हा थर वाढतच होता. पाणबुडीमध्ये मोजकंच इंधन शिल्लक राहिल्याने बार्बरा जनरेटर चालू करते. पाणबुडीबरोबर असलेले अमेरिकी सैन्यदलाची लढाऊ विमानं दिसेनाशी झाली होती. काहीच कळायला मार्ग नव्हता. पाणबुडी चुकीच्या दिशेने जात आहे याचा ब्रुस आणि मेजर रॉजर्ड यांना अंदाज आला होता. पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की, पाणबुडी एका कागदाच्या होडीसारखी वाहून जात होती. त्सेन्ग दुर्बिनमधून बाहेरील परिस्थितीचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा पाणबुडी एका मोठ्या खडकावर आदळणार आहे हे त्याला स्पष्ट दिसतं. ही गोष्ट तो इतरांना सांगू शकला नाही, उशीर झाला होता. त्या खडकावर पाणबुडी जोरात आदळते. तो धक्का इतका मोठा असतो की, आतमध्ये मार लागून सर्वजण बेशुध्द होतात.

 

मेजर रॉजर्ड शुध्दीवर येतात. इकतेतिकडे पाहिल्यावर त्यांना सगळे बेशुध्द असलेले दिसतात. इंजिनकडे पाहिल्यावर त्यांना सर्किट जळालेले दिसते. जवळ पडलेली पाण्याची बाटली घेऊन ते पाणी अभिजीतच्या तोंडावर शिंपडतात. अभिजीत शुध्दीवर आल्यानंतर जेन, ब्रुस, स्टिफन, मोहम्मद आणि बार्बरा यांना ते उठवतात. अभिजीत त्सेन्ग चु च्या जवळ जातो तेव्हा त्सेन्गच्या छातीमध्ये सर्किट घुसल्याचं त्याला कळतं. त्याच्या हाताची नाडी तपासून पाहिल्यावर त्सेन्गचा मृत्यू झाल्याचं त्याला समजतं. अल्बर्टनंतर आपला आणखी एक साथीदार गमावल्याने सगळे हळहळतात. पण शोक व्यक्त करुन काही होणार नाही, आता जे वाचले आहेत त्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी असं ते ठरवतात. मोहम्मद आणि स्टिफन त्सेन्गचं प्रेत खालच्या कक्षात नेतात.

 

खालच्या कक्षामध्ये वरचा भाग सोडला तर इतर सर्व बाजुंनी काच असल्याने पाण्याखालचं अगदी स्पष्ट दिसायचं. त्सेन्गचं प्रेत तिथे टाकल्यानंतर स्टिफनला पाण्याखाली काहीतरी दिसतं. थोडं अंधूकच, मग तो त्या कक्षामध्ये उडी मरतो आणि आणखी बारकाईने बघण्याचा प्रयत्न करतो. पाणबुडी त्याच दिशेने जात असल्याने ते चित्र हळूहळू स्पष्ट होत जातं. डोळ्यााच्या भुवया उंचावून स्टिफनचेडोळे मोठे होतात आणि तो एकाएकी ओरडतो.ताबडतोब सर्वांना इथे खालच्या कक्षात घेऊन येअसा निरोप तो मोहम्मदकडे पाठवतो. मेजर रॉजर्डपासून अभिजीतपर्यंत सर्वच खालच्या कक्षामध्ये येतात. कुणालाही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवता येत नव्हता. बार्बरा तर अभिजीतच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागते. अमेरिकेची ओळख असलेला स्वातंत्रदेवतेचा पुतळा पाण्याखाली पडलेला असतो. अवशेषांवरुन हाच तो पुतळा असल्याचं त्यांच्या लक्षात येतं. पुतळा आडवा झाला होता आणि हातातली मशाल तेवढी स्पष्ट दिसत होती. इकडेतिकडे पाहिल्यावर त्यांना अमेरिकेतील उंच इमारती पाण्याखाली असल्याचं दिसतं. बसेस, ट्रक, दुकानांचे फलक आणि आतमध्ये अडकलेल्या माणसांचे तरंगणारे अवशेष पाहणं त्यांना सहन होत नाही. आपल्या भावना आवरुन अभिजीत पाणबुडी वर घ्यायला सांगतो. सगळे पाणबुडीच्या मधल्या कक्षात जातात. स्टिफन मात्र खालीच असतो. अमेरिकेची अवस्था त्याला पाहवत नाही. आपल्या पत्नीचं काय झालं असेल या विचारानेच त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावतात. असंच पाण्यात पाहत असताना एका मृत माणसाचा तुटलेला हात त्याच्याजवळून पाण्याच्या वर जाताना त्याला दिसतो आणि स्टिफन लगेचच वरच्या कक्षामध्ये जातो.

 

‘‘पाणबुडीमध्ये ऊर्जा आणि ऑक्सिजन खूप कमी आहे. आपल्याला पाणबुडी वर घ्यावी लागेल.’’ ब्रुस म्हणतो.

 

‘‘ठिक आहे. बार्बरा, इंजिन चालू कर आणि (मेजर रॉजर्ड यांच्याकडे पाहत) पाणबुडी पाण्याच्या वर घ्या.’’ अभिजीत म्हणतो.

 

पाणबुडीचं बंद झालेलं इंजिन चालू करण्यात येतं. मात्र ऑक्सिजनचा साठा संपल्याने पाणबुडी वर नेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पाणबुडी हळूहळू वर जाऊ लागते. स्टिफन रडार यंत्रणा सुरु करतो. सर्किट जळाल्याने रडार सुरु होत नाही. दिशादर्शक देखील बंद झालेलं असतं.

 

पाणबुडी पाण्याच्या वर येते. मेजर रॉजर्ड आणि अभिजीत पाणबुडीचं झाकण उघडतात. अंधारातून एकदम बाहेर उजेडात आल्यावर त्यांचे डोळे चुरचूरु लागतात. कित्येक दिवसांपासून सुर्याची किरणंदेखील त्यांच्यापर्यंत पोहोचली नव्हती, सुर्य तर दूरची गोष्ट होता. एक - एक करुन सगळे पाणबुडीच्या वर येतात. डोळे चूरचूरायचे थांबल्यानंतर हळूहळू त्यांना स्पष्ट दिसू लागतं. अभिजीत इकडेतिकडे पाहतो. दूरपर्यंत त्याला फक्त पाणीच दिसतं. जमिनीचा तुकडादेखील कुठे नसतो. वर आकाश आणि खाली चहूबाजूंनी समुद्रच समुद्र, समुद्राच्या त्या भयाण लाटा, त्यावर तरंगत असलेले थर्माकॉल, प्लास्टिक, कचरा, मानव आणि जनावरांची प्रेतं. संपूर्ण समुद्र घाण झाला होता. मेलेल्या प्रेतांचा कुजलेला वास येत होता. घार, गरुड, कावळे असे मांसाहारी पक्षी त्या मृत शरीरांवर बसून मस्तपैकी लचके तोडत होते. कुठेतरी देवमासा पाण्याच्या वर येऊन पुन्हा पाण्यात उडी मारत होता. भयाण शांतता आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त समुद्राच्याच लाटांचा आवाज येत होता. अशा त्या भया शांततेत पाण्याच्या मधोमध त्यांची पाणबुडी, प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी येत होतं. न रहावून ब्रुस पाण्यात उडी मारतो. पाण्याखाली गेल्यानंतर त्याला माणसांचे मृतदेह, कचरा, पडलेल्या इमारती दिसतात. नजर जरा इकडेतिकडे वळवल्यावर त्याला काही शार्क मासे त्याच्या दिशेने येताना दिसतात. जीव वाचवण्यासाठी तो लगेचच वर जाण्याचा प्रयत्न करतो. पाणबुडीच्या वर सगळे ब्रुसची चिंता करत असतात. ब्रुस बाहेर आल्यानंतर मेजर रॉजर्ड आणि मोहम्मद लगेचच त्याला पाण्याबाहेर काढतात. कोणीही त्याला काही बोलत नाही. बोलणार तरी काय? इथे प्रत्येकालाच खोलवर धक्का बसला होता.

 

जेन आणि बार्बरा एकमेकींना घट्ट पकडून रडत असतात.

 

डोळ्यातलं अश्रु सावरत अभिजीत म्हणतो, ‘‘माझ्या लग्नाला एक महिनादेखील झाला नव्हता... लहानपणापासून आम्ही दोघं सोबत होतो. पण, मला लग्नानंतर तिची जास्त गरज वाटू लागली. तिच्यासाठीच मी इतका शिकलो, आता तिला कसलीही कमी पडू द्यायची नाही असं ठरवलं होतं... साधा एक दिवस सुध्दा तिच्यासाठी देता नाही आला मला... आयुष्यभर तिने आमच्या लग्नाची वाट पाहिली, आणि लग्नानंतर एक दिवस सुध्दा एकमेकांसोबत राहता नाही आलं... मला पुढचं पूर्ण आयुष्य तिच्यासोबत जगायचं होतं...’’

 

मेजर रॉजर्ड, ‘‘माझ्या दोन मुली... अजूनही लहानच होत्या... नुकत्याच शाळेत जाऊ लागल्या होत्या... त्यांच्या जन्मानंतर दोन-तीन वर्ष मला त्यांना बघता आलं नाही, सतत जहाजावरच असायचो... तरीही माझ्या पत्नीने त्यांना माझी कसलीही कमतरता भासू दिली नव्हती... दोन दिवसांची सुट्टी मिळली की ते दोन्ही दिवस मी त्या दोघींबरोबरच असायचो... खूप कमी वेळ देता आला मला त्या दोघींना... पण त्यांनी माझ्याकडे कधीही तक्रार केली नाही... जितका वेळ मी त्या दोघींबरोबर असायचो, तितका वेळ त्या माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करायच्या... तेव्हाच ठरवलं होतं, इथून निवृत्ती स्विकारल्यानंतर आपल्या लेकींकडे लक्ष द्यायचं, त्यांना आपल्या आयुष्यातला पुर्ण वेळ द्यायचा...’’

 

स्टिफन, ‘‘रोडा आणि माझा संसार 10 वर्षांचा, इतकी वर्ष आम्हाला एकही मुल नाही... ती दुःखी असायची, पण तिने तिचं दुःख आतल्या आतच दाबून ठेवलं होतं... पण मला ते सगळं कळत होतं... आम्ही खूप प्रयत्न केले होते आणि आम्ही चार महिन्यांपूर्वी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आलं होतं... ती खूप खूश होती... मला सांगायची, तू तुझ्या कामाकडे दुर्लक्ष करु नकोस, इतकी वर्ष मी या दिवसाची वाट पाहिली आहे, आता मी काळजी घेईन स्वतःची...’’

 

मोहम्मद, ‘‘कामाच्या व्यापामूळे मला माझ्या अम्मीला साधं भेटताही आलं नव्हतं... आपली ही मोहीम संपल्यावर मी तिला हज यात्रेला घेऊन जाणार होतो... तशी तिची शेवटची इच्छाच....’’ आणि मोहम्मद हुंदके देत रडू लागतो.

 

ब्रुस, ‘‘आता दुःख व्यक्त करुन काही होणार नाही... ही सगळी आपल्याच कर्माची फळं आहेत... जगावर आपला हक्क आहे असं समजून आपण निसर्गाचा नाशच करत आलो... निसर्गाचं संपूर्ण चक्र आपण विस्कळीत केलं... मग भूकंप, त्सुनामी, पूर, अंटार्क्टिकामधील बर्फ वितळू लागले अशा गोष्टींनी निसर्ग आपल्याला धोक्याचा इशारा आधीपासूनच देत आला होता... आपणच त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो... माझं तर या जगात कोणीही नव्हतं, पण हे जग तर माझं होतं ना... सगळंच उध्दवस्त झालंय...’’

 

नंतर कोणी काहीही बोलत नाही, जो तो आपापल्या विचारांत हरवलेला असतो. संशोधक, वैज्ञानिक, सैनिक असले तरी ते सर्व माणूसही होते. ज्यांच्यासोबत त्यांना आपलं पूढचं आयुष्य जगायचं होतं, तेच सोबत नाहीत तर या जगण्याचा तरी काय उपयोग? त्यापेक्षा नकोच हे जगणं, असा विचार प्रत्येकाच्या मनात येतो.

 

ब्रुसला त्याची अगोदरची पृथ्वी आठवते. ब्रुसचं निसर्गावर खूप प्रेम होतं. पृथ्वीवरच्या जुन्या आठवणींमध्ये तो हरवूनच जातो. तो कुठेतरी चालत जात असतो, ‘जरा कुठे पाऊस थांबला आणि शरीरातून घामाच्या धारा वाहायला लागल्या...हे वाक्य त्याच्या कानी पडतं... पावसाळ्यातला गारवा कमी होऊन वातावरणात पुन्हा उष्णता वाढू लागल्याचं त्याला जाणवतं. गेल्या चार महिन्यांपासून आपल्याला गारठ्याची सवय होऊन अचानक उन्हं पडू लागली की, त्रास जाणवू लागतो, तसं त्याचं होतं. बंद वातानुकूलित जागेतून उघडयावर आल्यासारखं वाटतं. अचानक अंधार होतो, रात्र असते. तो आकाशात बघतो तर चंद्रही पृथ्वीच्या जवळ येताना त्याला दिसतो. काजवे त्याच्या अवतीभोवती येतात. रातकिड्यांचा आवाज येऊ लागतो. वटवाघळं, घुबडं उडत असल्याची त्याला दिसतात. कुठेतरी नदीच्या पाण्याचा खळखळ आवाज येतो. पुढे गेल्यावर त्याला नदीच्या काठी वाघ, सिंह, हरीण, गेंडा, लांडगा, हत्ती पाणी पीत असताना दिसतात. प्राणी शक्यतो रात्रीच नदीच्या काठी जातात हे त्याला माहीत होतं. त्याच्या पायाखालून साप जातो, मग ब्रुसला तो साप पकडावासा वाटतो, त्या सापाचा पाठलाग करत ब्रुस नदीपासून लांब येतो आणि झाडांच्या पलीकडे गेल्यावर त्याला शरदात पृथ्वीचं सौंदर्य दिसतं. अधेमधे पाऊस पडत असल्यामुळे सभोवताली हिरवळ पसरलेली असते. नदी, तळी, तलावांत ब-यापैकी पाणी असतं. शेतात सभोवताली झेंडू, शेवंतीची फुलं उमलतात. कांचनार (आपटा) लाल-पिवळ्या फुलांनी फुललेला असतो. सप्तपर्ण बारीक फुलांच्या गुच्छांनी बहरून जातो. विजयसार, कुरण्डक यासारखे वृक्षही हिरवेगार होतात. ब्रुसला सगळीकडे हिरवळ दिसते, पुन्हा सुर्य उगवतो, पक्षी आकाशात संचार करतात, कुठूनतरी कोकीळेचा आवाज येतो. आभाळ पुन्हा भरुन येतं, तो मंद गार गार वारा, सर्व पृथ्वी जणू संपन्न आणि प्रसन्न असते.

 

‘‘ब्रुस...!’’

 

ब्रुस एकदम भानावर येतो. समुद्राच्या पाण्याने संपूर्ण पृथ्वीला वेढलेलं असतं आणि त्याच्या मधोमध असलेल्या पाणबुडीच्या वर ब्रुस मांडी घालून बसलेला असतो. मोहम्मदने आवाज दिल्यावर ब्रुस त्याच्याकडे बघतो.

 

‘‘हं... काय झालं...?’’

 

‘‘इथे ऊन खूप आहे... अभिजीत सरांनी सगळ्यांना पाणबुडीच्या आत यायला सांगितलंय...’’

 

दोघेही पाणबुडीच्या आतमध्ये जातात आणि पाणबुडीचं झाक बंद करतात.