Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण २०

मृत्यूची वाट पाहत अभिजीत आणि त्याचे साथीदार बेडवर पडून असतात. आपल्या कुटूंबीयांचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्याने ते दु:खात पूर्णतः बुडालेले असतात. स्टिफन तर काहीच बोलत नव्हता. जहाजाचे कप्तान थॉमस त्यांची प्रकृती बघायला वरचेवर येतच होते. सर्वांची प्रकृती ठीक झाल्यानंतर ते अभिजीतला आपल्या कक्षामध्ये बोलावतात.

 

‘‘अभिजीत, तू सध्या कोणत्या मनःस्थितीत आहेत याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे...महिनाभरापूर्वी जेव्हा तू अंटार्क्टिकाच्या मोहीमेवर जात होतास त्याच्या काही दिवसांनी चीन आणि भारत या देशांनी त्याच दिशेने अणुर्जेने भरलेली विमानं पाठविली होती...परंतु अंटार्क्टिकामधून इतकं मोठं वादळ आलं की, त्यामध्ये सर्व विमानं पाण्यात कोसळली आणि वाहून गेली...ते वादळ आमच्यापर्यंत यायला जास्त वेळ लागला नाही...तू आणि जॉर्डन सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही गरजेच्या वस्तू आणि नागरिकांना घेऊन जहाजावर आलो होतो म्हणूनच आम्ही वाचू शकलो. त्याचप्रमाणे अमेरिका, कॅनडा, अलास्का, मेक्सिको, कोलंबिया आणि विशेष म्हणजे युरोप खंडातील काही देशातील लष्करांनी त्यांच्या देशातील गरजेच्या वस्तू आणि शक्य असेल तितक्या नगरिकांना जहाजामध्ये सुखरुप ठेवलं... याचा अर्थ आपल्याशिवाय देखील आणखी काही माणसं या पृथ्वीतलावर जिवंत आहेत...’’

 

‘‘आपली इच्छा काय आहे?’’

 

‘‘माझी इच्छा आहे की, सर्वांनी एकत्र येऊन जमिनीचा शोध घ्यावा... जेणेकरुन वाचलेल्या नागरिकांना आपण त्या ठिकाणी सुरक्षित ठेवू शकू... महिनाभरात तरी अंटार्क्टिकावरुन कोणत्याही प्रकारची धोक्याची लाट आलेली आपल्या सैनिकांना दिसलेली नाहीये...’’

 

‘‘माफ करा सर, पण मी आता हे नाही करु शकत... मी माझी पत्नी गमावली आहे...’’

 

अभिजीतकडून कप्तान थॉमस यांना या शब्दांची अपेक्षा नव्हती. ते अभिजीतकडे पाहतच राहिले. खरंतर त्यांना राग आला होता. ते लगेचच उठून उभे राहिले आणि अभिजीतकडे एकटक पाहत राहिले.

 

‘‘अभिजीत? मला खरंच माझ्या कानांवर विश्वास बसत नाहीये... तुझ्या तोंडून हे शब्द निघतील असं मला वाटलं देखील नव्हतं...’’

 

‘‘कॅप्टन, मी माझी पत्नीच नाही तर माझे आईवडील...’’ कप्तान थॉमस अभिजीतला मध्येच थांबवतात.

 

‘‘एक मिनीट, या जहाजामध्ये मी माझं कुटूंब भरुन ठेवलं नाहीये... ही सगळी ब्राझिलची माणसं आहेत ज्यांना असं वाटतंय की, तू आणि मी, आपण त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढू... जगावर आलेल्या आपत्तीमध्ये मी माझं संपूर्ण कुटूंब गमावलंय... माझी आई, माझी पत्नी, माझा मुलगा, सून आणि माझी नातवंड सगळी पाण्यात वाहून गेलीत... त्या सर्वांची व्यवस्था या जहाजामध्ये करणं मला शक्य होतं, पण मी त्यांच्याप्रमाणेच इतर लोकांचा देखील विचार करत होतो... जहाजापासून ते सर्वजण खूप दूर होते म्हणून मी त्यांना वाचवू शकलो नाही... दुःखी झालो होतो तरी ते व्यक्त करणार तरी कुणाकडे? जितके लोक वाचले होते त्यांची जबाबदारी माझ्यावरच होती. आज मी देखील तुझ्याप्रमाणे विचार केला असता तर हे जहाज आज पाण्यावर सुस्थितीमध्ये नसतं... मेजर रॉजर्ड यांच्या मुली पाण्यातच असत्या, काही दिवसांत मांसाहारी पक्षांनी नाहीतर माशांनी त्यांना संपवलंच असतं... माणसांचा शोध घेत तुम्ही आणखी काही दिवस काढले असते आणि नंतर तुम्हा सर्वांची सुध्दा जलसमाधी झाली असती... इथे असलेल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी ही तुझी आणि माझी आहे... मी माझी जबाबदारी पार पाडतोय... मी तुला आग्रह करु शकत नाही, तू नसताना देखील आम्ही भूमीचा शोध घेत होतो आणि आता असूनही काम करणार नसशील तरी आम्ही आमचं काम करु...’’

 

कप्तान थॉमस यांचे डोळे एकदम लाल झाले होते. त्यांचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. राग त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता. त्यांच्या तोंडून निघालेल्या शब्दांमधून तो जास्तच जाणवला. आता अभिजीतकडे बोलायला शब्द नव्हते. त्याला आपल्या कर्तव्याची जाणीव झाली. जहाजामध्ये असलेल्या सर्वांच्या अपेक्षा आपणच पूर्ण करायला हव्यात असं त्याला प्रकर्षाने जाणवू लागतं. अल्बर्ट, त्सेन्ग, बार्बरा, मेजर रॉजर्ड आणि जॉर्डन सर जोपर्यंत जिवंत होते, तोपर्यंत ते आपलं कर्तव्यच पार पाडत होते. माझा जीव वाचावा यासाठी अल्बर्टने आपला जीव धोक्यात घातला, त्सेन्ग सुध्दा आपलं कामच करत होता म्हणून तो सर्किटजवळ होता. त्याने त्याच्या कर्तव्याकडे लक्ष दिलं नसतं तर आज तो वाचला असता. पण आज तो या जगात नाही आहे. बार्बराला देखील काय गरज होती पाणबुडीमधील पेपर्स आपल्याबरोबर घेऊन यायची? तरीही तिने आपलं कामच केलं. जेव्हा ती पाण्यात पडली तेव्हा मेजर रॉजर्ड यांनी तिला वाचवणं हेच आपलं कर्तव्य समजलं आणि म्हणूनच त्यांनी पाण्यात उडी मारली. पोटच्या मुली समोर असताना मृत्यूच्या जबड्या जाण्याची त्यांना काय गरज होती? तरीही ते गेलेत ना! मग मला काय धाड भरलीये? असा विचार करुन अभिजीत लगेच उभा राहतो आणि कप्तान थॉमस यांना म्हणतो,

 

‘‘आपल्या जहाजामधल्या सॅटेलाईट ऑपरेटर, हार्डवेअर इंजिनियर, मरिन इंजिनियर, रडार ऑपरेटर, कम्प्युटर प्रोग्रामर यांना लेक्चर रुममध्ये बोलवा... जहाजामध्ये घोषणा करा, एखादा कम्प्युटर हॅकर असेल तर त्याला देखील लेक्चर रुममध्ये घेऊन तुम्ही सुध्दा या...’’

 

कप्तान थॉमस यांच्या चेहरा लगेच उजळतो. अभिजीतच्या डोक्यात एखादी कल्पना असल्याचं ते लगेच ओळखतात. ते अभिजीतला आपल्या एका शिपायाबरोबर लेक्चर रुममध्ये पाठवतात. जहाजाचा नकाशा आणि हवामानाच्या अंदाजाचे काही कागदपत्रे ते अभिजीतकडे देऊन ठेवतात. जहाजामध्ये असलेल्या स्पिकरने कम्प्युटर हॅकरला बोलावण्यात येतं. 82 तरुण पुढे येतात आणि आपण कम्प्युटर, वेबसाईट हॅक केल्या आहेत असं ते सांगतात. दुसरीकडे जहाजामधले सॅटेलाईट ऑपरेटर, हार्डवेअर इंजिनियर, मरिन इंजिनियर, रडार ऑपरेटर, कम्प्युटर प्रोग्रामर लेक्चर रुममध्ये बसलेले असतात. एकदम 82 माणसांना तिथे बसवता येणार नाही, म्हणून अभिजीत त्या सर्वांना एका मोठ्या जागेवर घेऊन जातो. सोबत अभिजीतच्या टीममधील ब्रुस, जेन आणि मोहम्मद देखील येतात. जागा म्हणजे जहाजावरील लष्करी विमानांचा उड्डाणपूल होता. सगळे अभिजीतला हवं असलेलं मनुष्यबळ एकत्र जमल्यावर अभिजीत त्यांना त्याची कल्पना सांगू लागतो.

 

‘‘जेव्हा आम्ही अंटार्क्टिकाच्या मोहीमेवर होतो तेव्हा आम्हाला कधीही न आलेले अनुभव आलेत... पृथ्वीच्या या युगाचा नाश होणार आहे याचा अंदाज आम्हाला तेव्हाच आला होता... आम्ही लगेचच संपूर्ण जगामध्ये दक्षतेची सुचना केली होती, खरं तर या गोष्टी करायला उशीर झाला होता... अंटार्क्टिकामधून पाण्याचा जोरदार प्रवाह अत्यंत वेगाने जगाच्या दिशेने येत होता... तिथला बर्फ वितळत असल्याने त्या भागात असलेले मासे घाबरले आणि आपल्या दिशेने आले... आपल्याकडे असलेली जहाजं त्यांच्या दिशेने येत आहेत हे पाहून त्यांनी जहाजांवर हल्ले करणं सुरु केलं म्हणून महासागराच्या संकटाकडे दुर्लक्ष करुन सर्वांनी त्या माशांना मारण्याचा प्रयत्न केला...’’

 

अभिजीला मध्येच थांबवत कप्तान थॉमस म्हणतात, ‘‘पण आता आपण काय करायला हवं?’’

 

‘‘संपूर्ण जग पाण्याखाली आल्याने गुगल, फेसबूक यांसारखे सव्हर्स देखील नष्ट झालेत... मोठ्या प्रमाणात वीज उत्पन्न करण्याची देखील सोय आता आपल्याकडे नाही आहे... आपण जास्त दिवस एका जहाजावर राहू शकत नाही... आपल्याला लवकरात लवकर जमिनीचा शोध घ्यायला हवा, पण नक्की किती जग पाण्याखाली आलं आहे हे आपल्याला माहीत नाही, एव्हाना किती माणसं जिवंत आहेत याचा देखील आपल्याला काही अंदाज नाही... जर भूमीचा शोध घ्यायचा असेल तर आपण पुन्हा नव्याने सुरुवात करायला हवी... सुरुवात नकाशापासून व्हायला हवी...’’

 

ब्रुस, ‘‘आपल्याला पुन्हा नव्याने नकाशे बनवावे लागतील... जमिनीचा किती भाग पाण्याखाली गेला आहे, यापेक्षा नक्की किती भाग आता पाण्याच्या वर आहे हे आपण पहायला हवं...’’

 

कप्तान थॉमस, ‘‘पण आपण या गोष्टी करणार तरी कशा?’’

 

जेन, ‘‘नकाशे बनवणं साधं काम नाही, आपल्याकडे एकच जहाज आहे... आणि त्यातून जगाचा किती भाग पाण्याखाली गेला आहे व किती पाण्यावर आहे हे पाहण्यासाठी एक जहाज म्हणजे काहीच नाही...’’

 

अभिजीत, ‘‘हे सर्व माहितीये मला.. म्हणूनच तर आपल्याकडे ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांचा वापर करुनच आपल्या नव्या जगाची सुरुवात करायची आहे... फक्त मी सांगतो तसं सर्वांनी करा...’’

 

अभिजीतच्या बोलण्यातून सर्वांना आत्मविश्वास जाणवत होता. जणू काही त्याने सर्व ठरवूनच ठेवलं होतं. त्याच्या प्रत्येक शब्दातून, चेह-याच्या हावभावावरुन तिथे असलेल्या प्रत्येकाला, आपणही काहीतरी करायला हवं असं वाटत होतं अभिजीत देखील त्या सर्वांचा पुरेपूर वापर करुन घेत होता.

 

अभिजीत, ‘‘कप्तान थॉमस, आपल्या जहाजामध्ये सध्या जास्तीचे किती कम्प्युटर आहेत?’’

 

कप्तान थॉमस, ‘‘तुम्हाला किती हवे आहेत?’’

 

अभिजीत, ‘‘100’’

 

कप्तान थॉमस, ‘‘ठिक आहे... मी व्यवस्था करतो... आणखी काही?’’

 

अभिजीत, ‘‘आपल्या जहाजामध्ये सोलर पॅनेल आहेत का?’’

 

कप्तान थॉमस, ‘‘हो... म्हणजे तुम्ही तशी सुचनाच केली होती... संपूर्ण जहाज झाकलं जाईल इतक्या प्रमाणात आपल्याकडे सोलर पॅनेल आहेत...’’

 

अभिजीत, ‘‘हे बरं केलंत आपण... संपूर्ण जहाज झाकलं गेलं तरी चालेल, सगळी सोलर पॅनेल सक्रिय करा आणि विद्युत पुरवठा सुरु करा... जहाज चालवणा-या मुख्य नाविकाला सुचना करा की, जहाज एकाच ठिकाणी थांबवून ठेव... हार्डवेअर इंजिनियरने सर्व कम्प्युटर्स एकमेकांना लॅनमध्ये जोडून देण्याचं काम लगेचच सुरु करावं... प्रोग्रॅमरने माझ्याबरोबर यावं आणि सर्व हॅकर्सना प्रत्येकी एक कम्प्युटर देण्यात यावा... प्रोग्रॅमर सोबत चर्चा करुन झाल्यावर मी सर्वांना पूढची कामं सांगेन...’’