पाला खाणारी माणसे 3
“गोड आहेत वाटते ? बघू.”
त्या कंदाचा एक तुकडा मोडून मी तोंडात टाकला. तो क़डूकडू लागला.
“हे कडू कंद तुम्ही खाता ? रताळी, बटाटे का नाही आणीत ?”
“गरिबांची, दादा, थट्टा नये करु. बटाटी, रताळी तुम्हाला; डाळतांदूळ, गहू तुम्हाला. ती तुमची खाणी, आम्हाला कुठली ? आणि आम्हाला ती सोसतील तरी का जंगलच्या लोकांना जंगलचा पाला, जंगलचे कंद.”
“तुम्हाला हे कडू नाही लागत ?”
“हे कंद रात्रभर उकड़ून तसेच मडक्यात ठेवतो. त्यांचा राप सकाळला कमी होतो. कडूपणा कमी होतो. मग ते आम्ही खातो. एकदा सवय झाली म्हणजे सारे चालते.”
मी त्या श्रमजीवी लोकांना प्रणाम करुन निघालो. ही आदिवासी जनता. हे मूळचे मालक. त्यांच्या जमिनी त्यांना केव्हा मिळतील ? केव्हा नीट राहतील, धष्टपुट होतील ? केव्हा त्यांची मुलेबाळे गुबगुबीत होतील ? घरदार, ज्ञानविज्ञान, कला, आनंद, विश्रांती सारे त्यांना कधी बरे मिळेल ? पिढ्या न् पिढ्या ही माणसे अर्धपोटी जगत आहेत. उपाशी लोकांना सद्गुणांची संथा नका देत बसू. आधी जमिनी द्या; मग दारू पिऊ नका सांगा. नुसत्या नैतिक गोष्टी निरुपयोगी आहेत. भगवान् बुद्ध म्हणत, उपाशी माणसाला अन्न देणे म्हणजे त्याला धर्म शिकवणे. उपाशी माणसाची धर्मज्ञानाची भाषा अन्न ही असते. आमच्या हे कधी लक्षात येणार ? ही लक्षावधी जीवने कधी हसणार, फुलणार ?
“आपण परत जाऊ. ही दोन दृश्ये मला जन्मभर पुरतील. स्वराज्यात काय करायचे त्याचे ज्ञान येथे येऊन झाले. चला. आपण परत जाऊ.” मी म्हटले.
आणि विचार करीत आम्ही दोघे माघारी गेलो.