श्रमणारी लक्ष्मी 7
ती गेली. रात्री आम्ही वहिनीजवळ बसलो होतो. सकाळ झाली आणि वहिनीचे डोळे तेजस्वी दिसले.
“किती छान उजाडले आहे, किती छान !” ती म्हणाली.
आम्हाला वाटले वहिनीस बरे वाटत असावे. परंतु तिला अनंत जीवन दिसत होते. ज्या जगात सारे सुंदर, ते तिला दिसत होते. “किती छान !” हेच तिचे शेवटचे शब्द ! वहिनी गेली.
दुःखशोक गिळून आम्ही होतो. आम्ही सारी तेथून निघून जाणार होतो. लक्ष्मी आली. तिची मुले आली. वहिनीची लुगडी लक्ष्मीला दिली. मुलांना खाऊला पैसे दिले.
“तुम्ही सारी जाणार. आम्हाला कोण ? पोरे दोन दिवस उपाशी आहेत. हे तुम्ही दिलेले पैसे चार दिवस होतील. तुमचा आधार होता. सुधाच्या आईचा, दादांचा आधार होता. कधी लागले तर मागावे, दादांनी नाही म्हटले नाही. तुम्ही येथून जाणार. आम्ही कोठे जाऊ ? ही पोरे घेऊन कोठे जाऊ ? हरीही गेला. त्याचा कांगद नाही. दादा, अण्णा, तुम्ही आम्हाला विसरु नका. आम्ही दिवसभऱ राबतो. परंतु उपाशी राहण्याची पाळी येते. शेत यंदा तरी राहिले. पुढच्या सालचे देवाला माहीत !” लक्ष्मी रडू लागली.
“नको रडू, लक्ष्मी. हरी तिकडे मिळवता होईल. तुझी मुले मोठी होतील. जातील हे दिवस. तुझी आठवण आम्हाला राहील.” मी म्हटले.
आणि आम्ही निघून गेलो. तिकडे लक्ष्मी धडपडत होती.
एके दिवशी तिच्या नव-याने गंमत केली. त्यांच्या घराजवळ एक दगड होता. त्या दगडाला मध्ये जरा शंकराच्या पिंडीसारखा उंचवटा होता. रामजीच्या मनात आले, ‘स्वयंभू देव सापडला अशी मारवी बात.’ आणि त्याने तसे केले. त्याने त्या दगडावर फुले आणून वाहिली आणि लोकांची गर्दी जमू लागली. कोणी दिडकी ठेवी, कोणी नारळ, परंतु लक्ष्मीला ते आवडले नाही.
“तुम्ही लोकांना फसवता. पोरे त्या दगडावर सारी घाण करीत त्याचा तुम्ही देव केलात! काय म्हणेल तो देव ! तुम्हाला काम करायला नको. बसल्याबसल्या का सुतारकाम नाही करता येणार ? हे हरामचे पैसे कशाला ? मी उद्या त्या दगडावर थाबडे घालते. म्हणे स्वयंभू देव आला !” असे लक्ष्मी रात्री नव-याला म्हणाली.
रामजी हसला. तो काही बोलला नाही आणि लक्ष्मी पहाटे उठली. तिने तेथील पूजाअर्चा दूर केली आणि दगडावर शेणाची रास आणून ओतली.