पाला खाणारी माणसे 1
काही वर्षांपूर्वीचा तो अनुभव. चार-पाच वर्षे त्या गोष्टीला झाली. मी बोर्डीला गेलो होतो. तेथील सुंदर समुद्रशोभा रोज बघत होतो.
“तुम्हा जवळची आदिवासींची गावे बघायला याल ? चला, नाही म्हणू नका.” एक मित्र म्हणाले.
“जाऊ” मी म्हटले.
आणि आम्ही दोघे गेलो. पावसाळा नुकताच संपला होता. आजूबाजूला हिरवीपिवळी शेते. मधूनमधून नाले होते. बांधाबांधाने जात होतो. एका बाजूला गवताळ भाग दिसला.
“हे का कुरण आहे ?” मी विचारले.
“ही खरे म्हणजे शेतीची जमीन आहे. परंतु गवताला भाव आहे म्हणून मालक गवतच करीत आहे. पुन्हा गवताला खर्च नाही. एक राखोळी ठेवला म्हणजे झाले.” मित्र म्हणाला.
“तिकडे अधिक धान्य पिकवा मोहिम आहे आणि इकडे गवत वाढवले जात आहे. हे कसे काय ?”
“अधिका-यांची मूठ भरली म्हणजे सारे चालते.”
“ही जमीन आदिवासींना का देत नाही ?”
“आदिवासींना का शेती करायला येईल ? उद्या स्वराज्यात त्यांना मिलिटरीत पाठवावे.”
“आदिवासी का माणसे नाहीत ? तुमच्या शेतांतून तेच राबतात. तुमच्या वाड्या तेच करतात. त्यांना सारे येईल. मिलीटरीत वेळ आली तर सर्वांनी जायला हवे. देशाच्या रक्षणासाठी उभे राहायला हवे. आदिवासींनीच का जावे ? पारश्यांनी का नये जाऊ ? तुम्ही आम्ही का नये जाऊ ?”