जयंता 1
“जयंता, तू पास होशीलच; पुढे काय करणार तू ? तुझा मोठा भाऊ तर चळवळीत गेला. तुझ्या मनात काय आहे ? वडिलांनी विचारले.”
“चळवळीचा भर ओसरला आहे. माझे तिकडे लक्ष नाही. मी लहान मुलगा. कोठे जाणार ? परंतु मला खूप शिकायची इच्छा आहे.”
“कॉलेजचा खर्च कसा भागवायचा, बाळ ?
“बाबा, मला नादारी मिळेल. मला मार्क्स चांगले मिळतील. कॉलेजमध्ये शिष्यवृत्तीही कदाचित मिळेल. कॉलेजच्या शिक्षणाचा तुमच्यावर भार पडणार नाही.”
“तुझ्या शिक्षणाचा खर्च मला करावा लागणार नाही असे धरले, तरी तुझ्याकडून घरसंसार चालवायला मदत थोडीच होणार आहे ? अरे, मी एकटा किती काम करु ? मी थकून जातो. सरकारी नोकरी, शिवाय सकाळी खाजगी नोकरी ; महिनाअखेर दोन्ही टोके मिळवायला तर हवीत ? घरात तुम्ही पाच-सहा भावंडे. तो मोठा गेला देशसेवेला. बी. ए. होईल, मदत करील, अशी आशा होती. परंतु घरी न सांगता गेला. जाऊ दे, देशासाठी कोणी तरी जायला हवेच. परंतु तुम्हास कसे पोसु ? जयंता, तू नोकरी धर, रेशनिंगमध्ये मिळेल ; मी बोलून ठेवले आहे,” वडील म्हणाले.
“मी पंधरा वर्षांचा ; मला कोण देईल नोकरी ?”
“तेथे वयाची अट नाही. मॅट्रिक पास असलास म्हणजे पुरे. अरे, कोवळ्य़ा मुलीही तेथे काम करतात.”
इतक्यात जयंत्याची बहीण तेथे आली. ती म्हणाली,
“बाबा, मी करु का नोकरी ? जयंताला शिकू दे. तो हुशार आहे. मला द्या ना कोठे मिळवून.”
“अगं, तू मॅट्रिक नापास ; शिवाय तुझी प्रकृती बरी नसते.”
“नोकरी करुन सुधारेल. आपला काही उपयोग होत आहे असे मनात येऊन समाधान वाटेल.”
“नको, गंगू, तू नको नोकरी करु. आम्हां भावांना तू एक बहीण. तू बरी हो. तुझे वजन वाढू दे. मी करीन नोकरी. सकाळी कॉलेजात जाईन. हजारो मुले असे करीत आहेत.”