श्रमणारी लक्ष्मी 8
कोणी लोक बघायाल आले तो देव दिसेना. ‘कोठे आहे स्वयंभू पिंडी ?’ लोकांनी विचारले.
“ती आली तशी गेली !” लक्ष्मी म्हणाली. लोक माघारी गेले. रामजीचे दोन दिवसांचे वैभव गेले. परंतु तो बायकोला बोलला नाही. तेथे बसे, चिलीम ओढी, मिळे तुकडा तो खाई.
आणि काही वर्षे गेली. काँग्रेसच्या निवडणुकीसाठी मीही दौ-यावर होतो आणि या लक्ष्मीच्या गावी तीन वाजता सभा होती. मला फार वेळ नव्हता. एका गावची सभा आटपून या गावी आलो होतो. ही संपवून दुस-या गावी जायचे होते. सभेला सर्व प्रकारचे लोक होते, हरिजन होते. आश्चर्य म्हणजे काही शेतकरी आय़ाबायाही होत्या.
“उद्या स्वराज्यात तुम्हाला शेती मिळेल. प्रत्येकाला थोडी तरी स्वतःची जमीन होईल. एकेकाजवळ वाटेल तेवढी जमीन राहणार नाही. अधिक असेल त्याची काढून ज्याला नाही त्याला देऊ. ते खरे स्वराज्य. ती बघा लक्ष्मी तिकडे बसली आहे. तिची दशा मला आठवते. तिची मुले उपाशी असत. ती कष्ट करणारी. जरा मक्ता थकताच मालक शेत काढून घेऊ म्हणत. कोठे जाईल ती ? स्वराज्यात तिला मालकीचे शेत मिळेल. कष्ट करील, स्वाभिमानी जगेल.” असे मी पुष्कळ बोललो. सभा संपली.
मी मोटरजवळ गेलो. तो दूर लक्ष्मी उभी होती. मी तिच्याकडे गेलो. तिला प्रमाण केला.
“मग बेश आहे ना ? दादा, वसंता दोघे देवाकडे गेले.”
“अण्णा, तुम्ही बेश आहांत ना ?” ती म्हणाली. त्या श्रमणा-या लक्ष्मीने चौकशी केला! माझे डोळे भरुन आले. मी खिशातून काही काढून तिला देऊन म्हटले, “मुलांना खाऊला घे. हरी कोठे आहे ?”
“त्याचा कागद नाही. कुठेही खुशाल असो. अण्णा, तुमचे स्वराज्य लौकर आणा. मला मालकीचे शेत द्या. लहानसे पुरे. हक्काने तेथे राहू, तेथे राबू. कधी येईल हे स्वराज ?”
“येईल, लक्ष्मी, येईल. तुम्ही सुखी व्हाल.” आमची मोटर गेली. पुन्हा दुस-या गावी सभा आणि पुढे निवडणुका झाल्या. लढा न होता स्वातंत्र्यही आले. परंतु गरिबांचे आले का ? सरकार म्हणते, ज्यांच्याजवळ अधिक जमीन आहे ती काढून ज्यांना नाही त्यांना देऊ. परंतु त्यांनी विकत घ्यावी. परंतु ही लक्ष्मी कधी शिल्लक टाकील हजार, दोन हजार रुपये आणि कधी मिळवील मालकीची शेती ? लक्ष्मी डोळ्यांसमोर येते आणि मी बैचेन होतो. समाजवादाशिवाय सारे फोल आहे.