रामकृष्णा 3
“दादा, बसा तुम्ही.” तो प्रेमाने म्हणाला.
मी त्याच्याजवळ बसलो. त्याचे डोळे भरुन आले होते.
“आज काही खाल्ले आहेस का ?” मी विचारले.
“होय. दादा. मला एका गिरणीत काम मिळाले आहे. रात्री जातो कामाला. हळूहळू तेथे शिकेन. सध्या थोडेफार मिळते. घरीही दहा रुपये पाठवले. ज्या दिवशी मनिऑर्डर पाठविली, त्या दिवशी मला किती आनंद झाला होता सांगू !”
“कुऽठे राहतो, कुऽठे झोपतोस ?”
“असाच कुठेतरी राहतो नि झोपतो. स्टेशन हेच घर. सकाळी एखाद्या सार्वजनिक नळावर अंघोळ करतो, कप़डे वाळवतो. स्टेशनात बाकावर येऊन पडतो. कधी राणीच्या बागेत बसतो. कारण स्टेशनात तरी कोण निजू देतो ? अशी मोठी माणसे येतात. हजारो येणार, त्यांना जागा हवी, या मुलाला रात्रपाळी असेल, झोपायला जागा नसेल, थकून भागून येथे झोपला असेल, असा विचार कोण करणार, दादा ?”
तो मुलगा कसे बोलत होता म्हणून सांगू ! साधे सरळ सत्यकथन ! ना जगावर राग ना रुसवा. स्टेशनात एक केळीविक्या बसला होता. मी पटकन गेलो नि दोन आण्यांची केळी घेऊन आलो.
“घे.” मी त्याला म्हटले.
“कशाला आणलीत ?”
“दुसरे काय देऊ ?”
“तुम्ही त्या दिवशी ते चार आणे दिलेत, तेच लाखांच्या ठिकाणी होते. त्या दिवशी मी गळून गेलो होतो. तुम्ही अन्नदाते भेटलात. तुम्ही सारे काही दिलेत. सहानुभूती दिलीत. खरे ना ? गरिबाबद्दल कुणाला आहे आस्था ? कोण करतो त्यांच्या सुखदुःखाचा विचार ? कधी संपतील हे गरिबांचे हाल ?”