श्रमणारी लक्ष्मी 2
असा तो गरिबांचा जीवनक्रम चालला होता. वहिनी आजारी होती म्हणून मी घरी गेलो होतो. वहिनीची मुलगी लहान. असेल चार-पाच वर्षांची. ही लक्ष्मी तिचे सारे करी. ती तिची वेणी घाली. तिचे नाव सुधा. आणि सुधाच्या आईचेही तीच सारे काम करी. ते करुन इतर ठिकाणी पुन्हा कामाला जाई. कोठे मोलमजुरीला जाई. कधी तिचे घरचे काम. लहानसे शेत ती व तिचा दीर हरी मिळून मक्त्याने करीत. त्या शेताच्याच बाजुला त्यांनी ते लहानसे झोपडे बांधले होते. मालकाला मक्ता घालीत आणि तेथे राहत.
“बय कांडायला येणार आहे.” काशी येऊन म्हणाली.
“काय गं काशी, तुझ्या भावाचा ताप कसा आहे ?” मी विचारले.
“ताप आहे.” असे म्हणून ती पोर पळाली. वहिनी क्षयरोगाने आजारी होती. बरी होणे कठीण. दादाही अशक्त व थकलेले. सुधा लहान जीव. हसे, खेळे, फुले आणी. आजारी आईला ती फुले आणून द्यायची. आईचा हात तिच्या केसांवरुन फिरे. मीच घरात स्वयंपाक वगैरे करीत असे. सुधासाठी सकाळी थोडा गुरगु-या भात मी करीत असे. वहिनीला आवडेल ती थोडी भाजी करावी असे चालले होते.
लक्ष्मी कांडायला आली. तिने भात काढून घेतले. मध्येच कांडण थांबवून तिने वहिनीच्या अंगाला तेल लावले. वहिनीला दुसरे लुगडे तिने नेसवले. नंतर सुधाची वेणी घातली आणि पुन्हा कांडू लागली.
दुपारची जेवणे झाली. मी मुद्दामच भात जास्त करीत असे. लक्ष्मीला द्यायला होई. तिने भांडी घासली.
“लक्ष्मी, हा भात आहे. खाऊन घेतेस ?” मी म्हटले.
“मी घरी घेऊन जाते. लवकरच परत येईन.” ती म्हणाली.
आजारी मुलासाठी ती तो भात घेऊन जात होती. मी लोणचे दिले. लक्ष्मी गेली.
रामजी, हरी, विठू, विशी भाकर खात होती. लक्ष्मीने सकाळी करुन ठेवली होती. तो ती गेली.
“बय, आलीस ? बाबू म्हणाला.”