जयंता 3
“परीक्षा जवळ आली आहे. रात्री अभ्यास करतो. म्हणून तुम्हांला मी असा दिसतो. शरीर थकले तरी मनाला खूप उत्साह आहे. परिक्षा संपली, की तीन महिने मग अभ्यास नाही. प्रकृती सुधारेल. आई, काळजी नको करु.”
“तो तिकडे तुरुंगात ; तुझी ही अशी दशा.”
“आई, सा-या देशातच अशी दशा आहे. त्यातल्या त्यात आपण सुखी नाही का !”
“तू शहाणा आहेस, बाळ.”
आईच्या डोळ्यांत पाणी आले. जयंता पुस्तक घेऊन निघून गेला. परीक्षा जवळ आली होती. गंगू, जयंता दोघे त्या दिवशी फिरायला गेली होती.
“गंगू, तुला आता बरे वाटते ?”
“मला तुझी काळजी वाटते.”
“वेडी आहेस तू ! मला अलीकडे खूप आनंद वाटत असतो. कॉलेजात जातो, त्यामुळे वर्ष फुकट नाही जाणार. नोकरी करतो म्हणून घरीही मदत होते. त्या दिवशी मी आईला लुंगडे आणले, तिली किती आनंद झाला ! बाबांनाही बरे वाटले असेल. लहान वयाची मुले खेड्यापाड्यांतून आईबापास मदत करतात. सात-आठ वर्षांचा मुलगा गुराखी होतो, घरी मदत आणतो. पांढरपेशींची मुले घराला भार असतात. आम्हीही खपले पाहिजे. वर्तमानपत्रे विकावी, दुसरे काही करावे. पांढरपेशा कुटुंबात एक मिळवणारा नि दहा खाणारी ! ही बदलली पाहिजे परिस्थिती.”
“जयंता, तू मला एक हातमशीन घेऊन दे. मी घरी शिवणकाम करीत जाईन.”
“आधी बरी हो. तुझ्या येत्या वाढदिवसाला मी ती भेट देईन.”
दोघे घरी आली. आणि जयंताची परीक्षा आली. त्याने चार दिवसांची रजा घेतली. पेपर चांगले जात होते. आज शेवटचा पेपर, घरी बहीण वाट बघत होती. का बरे नाही अजून जयंता आला ?