Get it on Google Play
Download on the App Store

पुणेरी पगडी…

Mahadev_Govind_Ranadeजर मी तुम्हाला या शेजारच्या फोटॊ मधली व्यक्ती कोण आहे हे विचारले तर कमीत कमी ९९ टक्के लोकं लोकमान्य टिळक हे नाव अगदी खात्रीपुर्वक सांगतील. याचे कारण? अगदी सोपे आहे. आजही आपल्याला कुठल्याही नेत्याचा चेहेरा लक्षात नसतो, तर त्यांची व्यक्ती रेखा ही वेषभूषेवरून लक्षात ठेवण्याकडे आपला कल असतो.बरेचदा तर त्या व्यक्तीची वेषभूषा म्हणजेच त्या व्यक्तीची ओळख झालेली असते. या फोटो मधे त्यांनी घातलेल्या त्या पगडी मुळे आपले सुप्त मन ह्या व्यक्ती म्हणजे लोकमान्य टिळक आहेत असे निर्देश जागृत मनाला देते, आणि जागृत मन ते मान्य पण करते. वर दिलेला फोटो म्हणजे पुणेरी पगडी चा ज्यांनी समाजा मध्ये वापर रुळवला, त्यांचा म्हणजे न्यायमूर्ती माधवराव रानडे यांचे आहे, आणि आजचे पोस्ट आहे ते म्हणजे पुणेरी पगडी बद्दल.

आपली संस्कृती , म्हणजे इतिहास असतो का? नाही, मला तरी तसे वाटत नाही. पण बरेचदा आपल्या इतिहासाला आपण आपली संस्कृती समजून विचारांची गल्लत करतो. महाराष्ट्रात पूर्वी फेटा, टोपी , मुंडासे किंवा इतर वगैरे डोक्याला बांधल्याशिवाय घराबाहेर पडायचे नाही अशी पद्धत होती. त्यातल्या त्यात मग समाजातील स्थानानूरुप डोक्यावरचे शिरस्त्राण बदलले जायचे

आमच्या घरी सकाळी जो टीनाच्या डब्यात पाव बटर घेऊन विकायला यायचा, तो मुल्ला डोक्यावर काळी पर्शियन उंच गोंडा लावलेली टोपी घालून यायचा, तर कल्हईवाला हा डोक्यावर मुंडासे बांधलेला असायचा.दुधवाला ( भैय्या नाही) डोक्यावर पांढरी टॊपी घातलेली , बहुतेक वेळेस तर डोक्यावर काय आहे हे जाती धर्माप्रमाणे ठरलेले असायचे. नंतर काही वर्षातच हे सगळे बंद झाले, आणि लोकं डोक्यावर काही न घालता फिरणे सुरु झाले. एके काळी बोडख्याने फिरणे अशुभ समजले जायचे तीच गोष्ट सिनेमा मुळे फॅशन म्हणून गणली जायला लागली.

हल्ली लग्ना मधे डोक्यावर पगडी ( फेटा नव्हे) बांधण्याचा प्रकार सुरु झालेला आहे. महाराष्ट्रीयन लोकं पण लग्ना खास ऑर्डर देऊन येणाऱ्या प्रत्येक वऱ्हाड्याच्या डॊक्यावर राजस्थानी पद्धतीने पगडी बांधून घेतांना दिसतात- मला प्रश्न पडतो आपण मराठी मग ” लोकं फेटा का नाही बांधून घेत? ” शेवटी मराठी संस्कृतीचे , स्वराज्याचे प्रतीक आहे तो फेटा किंवा पगडी ! पण दुर्दैवाने आपण त्याला विसरलो आणि राजस्थानी पगडी जवळ केली आहे. कमीत कमी पुण्याला तरी सगळे मराठी लोकं लग्नात फेटा किंवा पुणेरी पगडी का वापरत नाहीत हा प्रश्न मनात येतोच.

हे सगळं झालं तरीही पुणेरी पगडीची स्वतःची ओळख अजूनही टीकुन आहे. दगडुशेठ हलवाई च्या गणपती ला पण हीच पगडी घातलेली आहे. पुणेरी पगडी नियमित वापरणारी शेवटची व्यक्ती म्हणजे सेतू माधवराव पगडी. त्यांच्या बरोबर पुणेरी पगडीचा वापर संपला आणि ही फक्त सरकारी समारंभात एखाद्याला मान देण्यासाठी वापरायची वस्तू झालेली आहे.नुकताच सिनेकलाकार जितेंद्रचा सत्कार करतांना त्याला पण हीच पुणेरी पगडी घातली गेली होती, आणि त्याचे फोटो पण बरेच ठिकाणी पेपर मधे झळकले, आणि तेंव्हा पासूनच या विषयावर काही तरी लिहायचा विचार करत होतो.

पुणेरी पगडी चा इतिहास खूप मनोरंजक आहे. पुणेरी पगडी ची माहिती शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण नेट वर अजिबात काहीही माहिती मिळाली नाही.

पुणेरी पगडी ही नियमित वापरात आणली, ती न्यायमूर्ती माधवराव रानडे यांनी. सुरुवात माधवरावांनी केली आणि जे एस करंदीकर, डॉ. डीडी साठ्ये, तात्यासाहेब केळकर कवडे शास्त्री, लोकमान्य टिळक, सेतू माधव पगडी वगैरे बरेच लोकं ही पगडी नियमित वापरू लागले. उच्चभ्रू रुची चे लक्षण म्हणजे पुणेरी पगडी हा समज रुढ झाला, आणि कदाचित त्या मुळेच शिक्षण क्षेत्रातले लोकं, उच्च विद्याविभूषित लोकं, न्यायदान क्षेत्रातील, सरकारी उच्च पदस्थ मराठी अधिकार्‍याचे शिरस्त्राण म्हणजे पुणेरी पगडी हे समीकरण रुढ झाले.

पगडीची  किंमत ठरायची ती त्यावर वापरलेल्या जडजवाहीर, किंवा सोन्याचा जरतारी कामामुळे.

पगडीची किंमत ठरायची ती त्यावर वापरलेल्या जडजवाहीर, किंवा सोन्याचा जरतारी कामामुळे.

पगडी बनवणे सोपे काम नव्हते. कोष्टी समाजाचे अती कुशल कारागीर लोकंच हे काम करू शकायचे. दर पंधरवड्यात एकदा घरी येऊन ९ इंच रुंदीचा आणि ६५ वार लांबीचा कपडा वापरून ही पगडी बनवली जायची. १७ व्या शतकापासून जी पारंपारिक पद्धत होती तीच पद्धत १९-२० व्या शतकातही वापरली जायची. प्लास्टर ऑफ पॅरीस, किंवा मातीचा चा डोक्याच्या आकाराचा डाय बनवला जायचा. त्यावर कांजी केलेले कापड वापरून आणि शिवून पगडी बांधायचे काम केले जायचे. एकदा पगडी बांधून घेतली की ती साधारण पंधरा दिवस तरी चालायची.

पगडीच्या प्रत्येक भागाला एक विशिष्ट नाव आहे. माथा म्हणजे, डोक्यावरचा भाग, कोका किंवा पोपट म्हणजे वर असलेला उंचवटा. ह्या भागावरच पगडीचे देखणे पण अवलंबून असते. जर हा भाग चुकला की मग पगडी ची शान शिल्लक रहात नाही. पगडी घातल्यावर हा भाग नेहेमी उजव्या डोळ्यावर यायला हवा असा

पुणेरी पगडी आणि त्या पगडीच्या निरनिराळ्या भागांची नावे.

पुणेरी पगडी आणि त्या पगडीच्या निरनिराळ्या भागांची नावे.

रिवाज होता. जरतार म्हणजे शोभेसाठी जरीचे काम केलेले असायचे . पूर्वी खरी सोन्याची तार काढून त्याचे कलाबतू आणि जर बनवून व वापरली जायची. घेरा म्हणजे घेरा, त्याबद्दल काही सांगता यायचं नाही. वर दिलेल्या फोटो मधे सगळे भाग दाखवले आहेत. पगडी च्या आतल्या भागात लवकर खराब होऊ नये आणि घालतांना सुखकर व्हावे म्हणून मुलायम कपडयाचे अस्तर लावले जायचे.

पगडी बनवण्यासाठी प्राजक्ताच्या फुलांच्या देठापासून किंवा तेरड्याच्या फुलांपासून तयार केलेला लाल रंग वापरला जायचा. लाल रंग वापरण्याचे कारण फक्त एवढेच की तो रंग लवकर खराब होत नाही, आणि चांगला दिसतो. आजही पगडी बनवली जाते, पण पद्धत एकदम बदललेली आहे . फॅक्टरी डाय कपडा एकत्र घड्या करून वापरला जातो. बरेचदा कागदी पल्प बनवून त्याचा बेस बनवून तो सेट झाल्यावर त्यावर कपडा शिवून पगडी बनवली जाते. आणि एक बाकी खरे की जुना आकार अजूनही मेंटेन केला जातो.

२००९ मधे पुणेरी पगडी संघ या दहा लोकांच्या गृप ने, या पगडी ला जॉग्रोफीकल इंडीकेशन मिळवून दिले ज्यामुळे पुणेरी पगडी ही पुण्याची प्रॉपर्टी किंवा प्रोप्रायटरी आयटम झालेली आहे . पुण्याच्या बाहेर ही पगडी किंवा अशा प्रकारची पगडी पुणेरी पगडी म्हणून विकली जाऊ शकत नाही. आजही पुणेरी पगडी म्हणजे पुण्याची शान आहे, आणि या पगडीचा वापर कमीत लग्न कार्यात वगैरे नियमित पणे होत रहावा असे वाटते , आणि ते आपल्याच हातात आहे, अहो सुट घालुन लग्नाला उभे रहाण्यापेक्षा पगडी घालून उभे राहिले तर किती छान दिसेल नाही का?? कारण आजही पुणेरी पगडी म्हणजे पुण्याची शान आहे.

काय वाटेल ते……..

महेंद्र कुलकर्णी
Chapters
वात्रट मुलाची कथा.. मुली कशा पटवाव्या… ऐसे असावे संसारी बंदी घातलेली पुस्तकं.. चावट -वात्रट आणि आवाज. आकाश कंदील.. पुन्हा एकदा.. ’भैय्या’च्या लग्नाची गोष्ट….. लोकं लग्न का करतात? मी आकाश कंदिल बनवतो, त्याची गोष्टं.. एक कथा- १ एक कथा- २ कथा ३ द्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद छोटीसी कहानी.. भाग ३ (शेवटचा) रोमॅंटीक आयडीयाज.. खरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत? तिच्या मनातलं… नरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल… प्रेम.. भविष्य.. चवीने खाणार हैद्राबादला… कौतुक डायटींग करताय ??? तुका म्हणे.. हर एक दोस्त जरूरी होता है… दुःख… तुम्ही मुंबईकर आहात जर… पुणेरी पगडी… पुण्याचं रानमळा गमतीशीर म्हणी.. अब्रू ची किंमत किती आहे हो?? फॉर द पिपल, ऑफ द पिपल, ऍंड बाय द पिपल नॅशनल शेम! झपाटलेले… फुलपाखरु तिच्या मनातलं…