Get it on Google Play
Download on the App Store

कौतुक

महेन्द्र, mahendraस्वभाव कधी बदलतो का? कठीण प्रश्न आहे. पण विचार करा आणि स्वतःला प्रामाणिक पणे उत्तर द्यायचे म्हटले तर लक्षात येईल की मूळ स्वभाव कधीच बदलत नाही. वेळ प्रसंगी आपण त्याला मुरड घालून आपला स्वभाव बदलला आहे अशी स्वतःची समजूत घालून घेतो.
प्रत्येकाचा स्वभाव जरी वेगवेगळा असला तरी एक गोष्ट मात्र प्रत्येकाच्या स्वभावात अगदी सारखी असते ती म्हणजे आपल्याला आपले कौतूक केलेले खूप आवडते. दोन वर्षाच्या चिंगी पासून तर ८० वर्षांच्या आजोबांपर्यंत. चिंगी, “तुझे बुटू किती छान आहेत गं ” , किंवा “तू किती सुंदर आहेस गं”.. म्हटले की चिंगी खूष होते,तसेच एखाद्या ८०वर्षाच्या आजोबांना तुमची तब्येत खूप छान आहे हो असे म्हंटले की ते खूश होतात.. थोडक्यात काय तर प्रत्येकालाच आपले कौतूक केलेले आवडते.

आपले जे वागतो ते पण बरेचदा केवळ इतरांनी आपले कौतूक करावे , आपल्याला चांगले म्हणावे म्हणूनच असते . बायकोने स्वयंपाक केल्यावर ” छान झाली आहे भाजी” असे म्ह्टले की तिला भरून पावते, त्या पेक्षा जास्त तिची अपेक्षा पण नसते. ऑफिस मधे एखादे काम केल्यावर बॉस ने दिलेली कौतुकाची थाप नक्कीच सुखावून जाते .जर कोणी कौतुक करणारे नसेल तर काय फायदा हो कामं करण्याचा?

कौतूक बरेचदा आपल्याला इतरांकडून हवे असते. आपल्या लोकांकडून नाही. नाही पटत?? उदाहरणार्थ घरात कळकट गाऊन घालून दिवसभर बसणाऱ्या बायका तयार होतात ते केवळ बाहेर निघतांना, कौतुकाची नजर हवी असते ती बाहेरच्या लोकांकडून नवऱ्याकडून नाही, आता काही स्त्रिया म्हणतील, की नवऱ्याच्या कौतुकाच्या नजरेत स्वार्थ दिसतो :) असो.. विषयांतर होतंय.

मी हे लिहितोय म्हणजे मी पण काही वेगळा नाही. मला पण कौतूक खूप आवडते. मग ते अरे बारीक झालास रे थोडा. असे जरी कोणी म्ह्टले तरी मला आनंद होतो. ब्लॉग वर पण काही तरी लिहिल्यावर कौतूक व्हावे असे वाटत असतेच, किंबहूना मी लिहितो ते पण केवळ माझे कोणी तरी कौतूक करावे म्हणूनच! केवळ याच कारणासाठी आपण काही लिहिले की ब्लॉग ची लिंक मी चार – दोन गृप मधे आणि स्वतःच्या भिंतीवर लटकवत, सोबतच ही जाहिरात नाही हे बिरुद चिकटवायला पण कमी करत नाही

जर एखाद्या व्यक्तिने आपल्या लेखाचे अपेक्षे प्रमाणे कौतूक केले नाही की मग थोडी चाहूल घेतो, की ह्याने लेख वाचला की नाही आपला? नाही असे वाटले तर लिंक मेल करतो. नंतर तरीही त्याची रिऍक्शन आली नाही तर फोन करून विचारतो , ” की काय रे लेख वाचला की नाही?” बरेचदा तर मित्रांच्या पोस्ट वर आपल्या लेखाची लिंक पोस्ट करून इतरांच्या फेसबुक भिंती रंगवण्याचे कामही मी कधी कधी करत असतो.

आपण लिहिलेला एखादा जुना लेख आपल्यालाच खूप आवडलेला असतो, पण त्या लेखाचे फारसे कौतूक झालेले नसते, किंवा कोणी “लेख जमलाय बरं का” असेही फारसे म्हटले नसते, तोच लेख पुन्हा पुन्हा फेसबुक मधे मित्रांच्या भिंतीवर चिकटवून खरंच लेख जमलाय की नाही याची चाहूल घेण्यासाठी नाही तर कौतूक करून घेण्यासाठी पोस्ट करतो मी बरेचदा. म्हणजे काय, कौतूक व्हावे म्हणून लिहितो मी.

आत्म समाधान किंवा मला वाटतं म्हणून मी “काय वाटेल ते “लिहिले असते, तर कौतुकाची अपेक्षा केली असती का? एखादा लेख कोणी वाचला नसेल तर ” अरे माझा तो लेख वाचलास की नाही?” असे विचारून त्याने वाचे पर्यंत पाठपुरावा म्हणजे माझा लेख वाच आणि माझे कौतूक कर, छान झालाय म्हण” ही आंतरिक इच्छा लपवून …………….! किती दांभिक पणा नाही का ?

हे आयुष्य आहे ते आपण जगतोय ते केवळ पाठीवरच्या कौतुकाच्या थापे साठी! लहान मुल जेंव्हा स्वतःच्या पायावर पहिल्यांदा उभे रहाते, तेंव्हा आई नजरेतले कौतुक त्याला नक्कीच समजते. शाळेत सरांनी केलेले सुंदर हस्ताक्षरा बद्दलचे कौतूक , एखाद्या मैत्रिणीने अरे वा.. मस्त आफ्टर शेव्ह आहे रे म्हणून केलेले कौतूक, नवीन बाईक घेतल्यावर नाक्यावर बाईक घेऊन गेल्यावर मित्रांनी केलेले बाईकचे कौतूक, लग्न झाल्यावर बायको सोबत बाहेर निघाल्यावर नातेवाईकांनी/ मित्रांनी बायकोचे केलेले कौतूक, मुलीचे इंजिनिअरींग पुर्ण झाल्यावर जसे काही आपणच काही तरी मिळवले आहे असे समजून स्वतःचे करून घेतलेले कौतूक…. असे अनंत प्रकार आहे. शेवटी काय तर ह्या आयुष्याचा सगळा पायाच ह्या कौतुकावर अवलंबून आहे.

लेख लिहिलाय बरेच दिवसापूर्वी पण पण पोस्ट करायची इच्छा होत नव्हती. आज सहज ड्राफ्ट चेक केले तर हा लेख दिसला आणि पोस्ट करतोय आज..

काय वाटेल ते……..

महेंद्र कुलकर्णी
Chapters
वात्रट मुलाची कथा.. मुली कशा पटवाव्या… ऐसे असावे संसारी बंदी घातलेली पुस्तकं.. चावट -वात्रट आणि आवाज. आकाश कंदील.. पुन्हा एकदा.. ’भैय्या’च्या लग्नाची गोष्ट….. लोकं लग्न का करतात? मी आकाश कंदिल बनवतो, त्याची गोष्टं.. एक कथा- १ एक कथा- २ कथा ३ द्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद छोटीसी कहानी.. भाग ३ (शेवटचा) रोमॅंटीक आयडीयाज.. खरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत? तिच्या मनातलं… नरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल… प्रेम.. भविष्य.. चवीने खाणार हैद्राबादला… कौतुक डायटींग करताय ??? तुका म्हणे.. हर एक दोस्त जरूरी होता है… दुःख… तुम्ही मुंबईकर आहात जर… पुणेरी पगडी… पुण्याचं रानमळा गमतीशीर म्हणी.. अब्रू ची किंमत किती आहे हो?? फॉर द पिपल, ऑफ द पिपल, ऍंड बाय द पिपल नॅशनल शेम! झपाटलेले… फुलपाखरु तिच्या मनातलं…