Get it on Google Play
Download on the App Store

दुःख…

काही महिन्यापूर्वी सुख म्हणजे काय हा एक लेख लिहिला होता. आज दुःख म्हणजे काय – हा विषय घेतोय लिहायला. मला जिवंत लोकांपेक्षा मेलेल्या लोकांविषयी जास्त आदर वाटतो, किंवा जे जन्मले नाहीत त्यांचा तर हेवा वाटतो, कारण या जगात येऊन चालणारी दुष्कृत्य, विश्वासघात, प्रेम भंग, वगैरे पहायची वेळ येत नाही .

आपले संत महात्मे , अगदी कुठल्याही धर्मातले घ्या, सगळ्यांनी आयुष्यात खूप दुःख भोगलेले आहे. जिझस, कृष्ण, राम, गौतम बुद्ध, पैगम्बर सगळ्यांचे आयुष्य खूप कष्टात गेले. कदाचित हेच एक कारण असेल की आपण स्वतः कायम दुःखाला खूप प्राधान्य देत आलो आहोत. दुःखी रहाणे म्हणजे काही तरी चांगले असाही काही लोकांचा समज होत असतो . आपल्या देवाप्रमाणेच आपणही अशीच काही दुःख भोगावी म्हणून तशीच दुःख अनुभवणारी काही धर्म संस्था आहेत. Da vinci Code आठवतो का?

समजा तुमच्या आवडीच्या टी-सेट मधला एक कप फ़ुटला तर? कप फुटला म्हणून “वाईट वाटेल”, दुःख होणार नाही. दुःख होणं आणि वाईट वाटणं या मधे आपली नेहेमीच गल्लत होते. सायकल चालवणे शिकतांना पडणे, शाळेत कमी मार्क मिळणे , वगैरे लहानसहान गोष्टी या वाईट वाटण्यासाठी कारणीभूत ठरतात. पण मग दुःख होतं म्हणजे मग नेमकं काय होतं ?

एखाद्या घटनेमुळे जेंव्हा” वाईट “वाटते तेंव्हा त्या मुळे वाईट वाटते ते पण तेवढ्यापुरतेच असते.कदाचित काही तासात, किंवा एखाद्या दिवसात तुम्ही ती घटना विसरून पुन्हा आपलं आयुष्य नेहेमीप्रमाणे हसतमुखाने जगणे सुरु करता. पण दुःख म्हणजे ज्या गोष्टी मुळे आपल्याला खूप दिवस वाईट वाटत रहातं. इतकं की त्या शॉक मधून कित्येक दिवस बाहेर पडू शकत नाही ते दुःख. पटतं का? म्हणजे तुमच्या घरातल्या एखाद्या जेष्ठ व्यक्तीचा, आई- वडील, भाऊ वगैरे कोणाचा तरी मृत्यु. किंवा तुमच्या कारचा ऍक्सिडेंट होऊन तुमचे फ्रॅक्चर होऊन अंथरूणाला खिळून रहाणे , उदर उदरनिर्वाहाचे साधन नष्ट होणे वगैरे घटनांच्या नंतर जे वाईट वाटत रहाते त्याची तीव्रता आणि काळ खूप जास्त असतो, अशा घटनांमध्ये जे वाईट वाटत रहाणे असते, त्याला दुःख हा शब्द वापरणे योग्य ठरेल .

एखादी दुःखद घटना घडली की मग पहिले तर ती घटना नाकारण्या कडे आपला कल असतो. असं माझ्या बाबतीत होऊच शकत नाही . काहीतरी नक्कीच गफलत झालेली आहे, जे झालंय ते चुकीचे आहे, आणि लवकरच काही तरी होईल वगैरे विचार मनात येत रहातात. घडलेली घटना ही घडलेली नाहीच ही मनाची धारणा होऊन बसते. ह्या स्टेज मधून बाहेर यायला बरेच दिवस लागू शकतात.

पण काही दिवसानंतर मग मात्र घडलेली घटना मान्य केली जाते.एकदा ही वाईट घटना मान्य केली की मग एकटे रहाणे सुरु होते. कोणाशीच बोलायची इच्छा होत नाही. आपल्या दृष्टीने त्या घटनेशी संबंधित असलेल्या किंवा कारणीभूत असलेल्या सगळ्या लोकांबद्दल संताप होणे सुरु होते. ह्या राग येण्याची सुरुवात जरी इतरांचा राग येण्याने झाली तरीही शेवट स्वतःचाच राग येण्यात होतो.

ह्या रागाचा भर ओसरला की मग स्वतः आपण ” असं केलं असतं तर बरं झालं असतं” . जर कोणाचा मॄत्यु झाला असेल तर दुसऱ्या डॉक्टरचे ओपिनिअन घ्यायला हवे होते.नोकरी मधला प्रॉब्लेम असेल तर , बॉस ची थोडी चाटूगिरी करायला हवी होती, असे अनेक विचार मनात येतात. एकदा वेळ निघून गेल्यावर या विचारांचाही काही फायदा नसतो, पण बरेच स्वप्न रंजन करण्यात आपण वेळ घालवतो.जेंव्हा ह्याची जाणीव होते की आत ह्या सगळ्या विचारांचा काही फायदा नाही, तेंव्हा मात्र डिप्रेशन ची स्टेज सुरु होते.

डिप्रेशन होण्याचे मुख्य कारण म्हणजे ,आपण काहीच करू शकत नाही याची जाणीव होणे. या पिरियड मधे स्वतःबरोबर जास्त वेळ घालवण्याची प्रवृत्ती वाढते . मन खूप नाजूक होऊन जातं. एकटे बसून रहाण्याची इच्छा होते. अशा वेळेस मात्र देव आणि दैवाची साथ हवी हवीशी वाटू लागते. आयुष्यभर निरीश्वरवादी वादी असलेले लोकं पण देव आणि दैवाच्या मागे लागतात. नामस्मरण करण्याचा काळात तुमचे मन इतर विचारांपासून मुक्त होते, आणि ” बरं वाटणे” ही प्रक्रिया सुरु होते. अर्थात सगळ्यांच्याच बाबतीत केवळ देव – दैव साथ देते असे नाही, इतरही बऱ्याच गोष्टी जसे दुसऱ्या कुठल्यातरी कामात गुंतून जाणे, किंवा काही काळ निघून जाणे हे पण कारण असू शकते. हाच काळ वाईट सवयी लागण्याचा (दारू पिणे वगैरे ) असतो.

डिप्रेशन संपलं की मग जे काही झालेलं आहे, ते तुमचे मन मान्य करते, आणि एकदा एखादी गोष्ट मान्य केली की मग मात्र त्यातून दुःखावर मात करणे अगदी सहज शक्य असते. प्रत्येकाच्याच आयुष्यात कधी ना कधी तरी असे प्रसंग येतात, पण मला तरी नामस्मरण आणि देव आणि दैवाची जास्त मदत होते हे नक्की!

हे संपलं की खरी सिल्वर लाइनिंग दिसणे सुरु होते. आपण त्या दुःखा मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे सुरु करतो. सगळं विसरून नवीन काही तरी सुरु केल्याशिवाय काही गत्यंतर नाही हे लक्षात आल्यावर पुन्हा आपल्याच नेहेमीच्या आयुष्यात रिएंट्री करण्यासाठी प्रयत्न सुरु केले जातात. बऱ्याच आशा असतात, अपेक्षा असतात. अपेक्षांच्या हिंदोळ्यावर कुठे तरी ऍक्सेप्ट केलं जाईल ह्या आशेवर जीवन जगणं सुरु रहातं.. हे सगळं प्रत्येकालाच कधी ना कधी तरी अनुभवावे लागते, फरक इतकाच , की काही लोकं डिप्रेशन मधून लवकर बाहेर पडतात, तर काही लोकांना खूप वेळ लागतो. शेवटी आयुष्य आहे ते जगायचं असतंच ना प्रत्येकाला!

काय वाटेल ते……..

महेंद्र कुलकर्णी
Chapters
वात्रट मुलाची कथा.. मुली कशा पटवाव्या… ऐसे असावे संसारी बंदी घातलेली पुस्तकं.. चावट -वात्रट आणि आवाज. आकाश कंदील.. पुन्हा एकदा.. ’भैय्या’च्या लग्नाची गोष्ट….. लोकं लग्न का करतात? मी आकाश कंदिल बनवतो, त्याची गोष्टं.. एक कथा- १ एक कथा- २ कथा ३ द्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद छोटीसी कहानी.. भाग ३ (शेवटचा) रोमॅंटीक आयडीयाज.. खरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत? तिच्या मनातलं… नरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल… प्रेम.. भविष्य.. चवीने खाणार हैद्राबादला… कौतुक डायटींग करताय ??? तुका म्हणे.. हर एक दोस्त जरूरी होता है… दुःख… तुम्ही मुंबईकर आहात जर… पुणेरी पगडी… पुण्याचं रानमळा गमतीशीर म्हणी.. अब्रू ची किंमत किती आहे हो?? फॉर द पिपल, ऑफ द पिपल, ऍंड बाय द पिपल नॅशनल शेम! झपाटलेले… फुलपाखरु तिच्या मनातलं…