आकाश कंदील.. पुन्हा एकदा..
आकाशकंदील बनवणे म्हणजे माझा आवडता उद्योग. अशी एकही दिवाळी गेली नाही की ज्या मधे मी किल्ला आणि आकाशकंदील बनवला नाही . मध्यंतरी बराच काळ म्हणजे जवळपास २० -२५ वर्ष तरी आकाशकंदील बनवणे बंद झाले होते, ते मागल्या वर्षीपासून पुन्हा सुरु केले. मुंबईसारख्या ठिकाणी आकाशकंदील बनवण्यासाठी रॉ मटेरीअल ( म्हणजे बांबूच्या काड्या वगैरे) कसे मिळवले ते मागच्याच वर्षीच्या पोस्ट मधे लिहिले आहे. ” मी आकाशकंदील बनवतो त्याची पोस्ट ” इथे आहे.
तर या वर्षी पण आकाशकंदील बनवायचा ठरवले. एका रविवारी धाकट्या मुलीने आठवण करून दिली की दिवाळी जवळ आली आहे, आणि माझ्या पण लक्षात आलं, की आता पासून सुरुवात केली तरच आकाशकंदील वेळेपर्यंत पुर्ण होईल. माळ्यावर टाकलेला मागच्या वर्षी बनवलेला आकाशकंदील आठवला आणि तो बाहेर काढला . त्याचा लावलेला कागद खूप खराब झाला होता, म्हणून मग सगळा कागद काढून टाकल्यावर त्यावर नवीन कागद बसवावा का? की हा आकार मोडून दुसरा एखादा आकार बनवावा? असा विचार केला. वेळ पण भरपूर होता, आणि काड्या पण होत्याच .. मग आहे त्याच काड्या वापरून दुसरा आकार बनवण्याचे ठरवले.
नविन आकाशदिव्याची फ्रेम
लहानपणी तीन आकाराचे आकाशकंदील बनवता यायचे मला. त्यापैकी एक चांदणी तर बनवून झाली होतीच.. आता शिल्लक होते ते विमान किंवा षटकोनी डायमंड. या षटकोनी डायमंड ( चार बाजुला चार कोन , एक वर आणि एक खाली असे सहा कोन )मधे बनवतांना आत मधे बल्ब आणि होल्डर लावावे लागते, आणि एकदा बनवला, की आतला बल्ब बदलता येत नाही. म्हणून त्याचा खालचा कोन न बनवता पंचकोनी बनवायचे ठरवले.
आकाशकंदील बनवणे= घरभर कचरा करणे
जुन्या आकाश कंदीलाच्या सगळ्या काड्या सुट्या केल्या आणि सम आकाराचे तुकडे कापून एक बेसीक स्ट्रक्चर तयार केले. या वेळेस काड्या जरा लहान पडल्याने आकारात सफाई आली नाही. पण स्वतः करण्याचा आनंद हा विकतचा आकाशकंदील लावण्यापेक्षा खूप जास्त असतो, म्हणून आहे त्यात समाधान मानून आणि कॉम्प्रोमाइझ करून एक स्ट्रक्चर बनवले. वर कागद कुठला लावायचा हा प्रश्न होताच. शेवटी जिलेटीन चे लाल रंगाचे आणि भगव्या रंगाचे फ्लुरोसंट कागद आणले आणि त्रिकोणी आकाराचे तुकडे कापून चिकटवण्याचे चिकट ( की किचकट?) काम संपवायला जवळपास तीन तास लागले. आणि शेवटी एकदाचा आकाशकंदील तयार झाला.
शुभ दिपावली....बऱ्याच लहानपणीच्या गोष्टी आपण पुन्हा जेंव्हा करतो, तेंव्हा एक निराळाच आनंद देऊन जातात त्या गोष्टी, आणि सणाचा आनंद द्विगुणित करतात. तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन हे पोस्ट संपवतो.