डायटींग करताय ???
हा शब्द ऐकला की पूर्वी मला डाय + ईटींग म्हणजे “खाऊन खाऊन मरा”…डायटींग असे वाटायचे :) एखादा माणूस डायटींग करतोय हे ऐकले की मला फुड व्हर्सेस मॅन चा एपिसोड नजरेसमोर यायचा.माझं वजन हे नेहेमीच यो-यो प्रमाणे खाली वर होत असते. प्रत्येक गोष्टी मधे मी आरंभशूर असल्याने नियमित पणे व्यायाम आणि डायटींग चा आरंभ करायचो.पण नंतर लवकरच सगळं बंद व्हायचं. काही दिवस – हवं तर महिने म्हणा , रोज सकाळी फिरणे, वगैरे न चुकता व्हायचे, इतके नियमीत की पावसाळ्यात पण छत्री घेऊन फिरायला जायचो मी :)कोणीही पहा उठसुठ डायट या विषयावर बोलत असतो. कधी तरी एखादी पॅंट कंबरेवर घट़्ट व्हायला लागली की मग आपलं वजन वाढलंय आणि आता डायट सुरु करण्याची वेळ आलेली आहे असे समजून स्वतःच काही तरी डायट प्लॅन करायचा , आणि काही गोष्टी खाणं बंद करायचे, अशी टूम आलेली आहे.
तुम्ही एकदा डिक्लिअर केलं की मी डायट करणार! की तुमचे सगळे हितशत्रू आणि मित्र एकत्र येऊन तुम्ही काय खावे आणि काय खाऊ नये याची यादी देतील. एखादा खास मित्र नक्कीच तुम्हाला जनरल मोटर्स च्या डायट प्लानची कॉपी देईल :) हा डायट प्लान काय आहे ते नेट वर शोधा- सापडेल !
समजा तुम्ही डायटींग करत नाही, आणि तुमचे हे डायटींग सुरु केलेल मित्र तुम्हाला हमखास एखादी खूप जूनी वगैरे पॅंट घातलेले दिसतील, आणि मग तुम्ही दिसलात, की अरे माझी ही पॅंट पाच वर्ष जूनी आहे बघ, आता होते आहे मला ( म्हणजे मी डाय्टींग सुरु करून वजन कमी केलेले आहे , तेंव्हा तू पण मला म्हण” की तुम्हे वजन कमी झालेले आहे रे म्हणून” ) पण , मी मात्र अगदी मख्ख चेहेरा करून अस्सं होय! असे म्हणून गप्प बसतो :)
आमच्या लहानपणी एखादा छान गुबगुबीत शरीर यष्टीचा मुलगा दिसला, की छान तब्येत आहे असे म्हटले जायचे, आणि एखादा पाप्याचा पित्तर दिसला की ” काय रे ? असा सुदामा का झालाय तुझा? आई बाप खाऊ घालत नाहीत का?” अशी वाक्य हमखास कानी पडायची. आता आठवलं की बरं वाटतं , की मी पण तेंव्हा अगदीच बारीक होतो- पाप्याचं पित्तर म्हणावं हवं तर! बारीक शरीर यष्टीची मला खूप लाज वाटायची.मी शक्यतो फक्त फुल स्लिव्ह्ज शर्ट्स वापरायचो. टी शर्ट तर कधीच नाही. काय दिवस होते नाही? आता मी पोट दिसतं म्हणून टी शर्ट टाळतो .
हल्ली वजन वाढले म्हणजे आता हार्ट अटॅक येऊन आपण मरणार असे विचार तुमच्या मनात भरवण्याचे काम सफोला, ओट्स, केलॉग्ज , वगैरे च्या जाहिराती नियमीत पणे करत असतात. ह्या जाहिराती केवळ तुम्हीच नाही, तर तुमची बायको पण पहात असते, त्यामुळे आपल्या नवऱ्याचे वजन वाढलेले दिसले की तिचा स्वतःचा डायट प्लान तुमच्या साठी सुरु करते. एक दिवस सकाळी ओट्स किंवा ब्राउन ब्रेड विथ लो कॅल बटर आली की सम्जावे की आपले येते काही दिवस तरी धडगत नाही! मटकी , मुग, शेपू, पालेभाज्या, वगैरे सगळ्या तुमच्या पानात पडणे सुरु होणार याची कल्पना येते.असो “माझे डायटींग” हा ह्या लेखाचा विषय नसल्याने या बाबत फार काही लिहीत नाही.
डायटींग करणाऱ्यांच्या मते, गोड यांचा शत्रू नंबर एक. एखाद्या दिवशी तुम्ही टपरीवर चहा मारायला गेला, आणि तिथे डायटींग सुरु केलेला तुमचा मित्र सोबत असेल तर तो तुम्हाला शहाणपणा नक्कीच शिकवणार. दिवस भरात १० कप चहा म्हणजे २० चमचे साखर , की जवळपास पाव किलो भरते म्हणून बिना साखरेचा चहा घे वगरे वगैरे. साखर चहा मधे घेतली नाही, म्हणून मग आता एखादा वाटी श्रीखंड, किंवा दोन गुलाबजाम किंवा दोन तिन रसगुल्ले खायला कशी हरकत नाही असे हे लॉजिक पण पटवून देण्याचा प्रयत्न करतो. आवरा म्हणायची इच्छा असते पण म्हणता येत नाही मित्र आहे म्हणून . :)
डायट वाल्यांचा दुसरा शत्रू म्हणजे तेल ! भाजी मधे तेल दिसले की ह्यांच्या कपाळावर आठ्या! च्यायला कसला देशी कुक आहे यांचा म्हणून त्या हॉटेलचा उद्धार! आता तुम्ही समजा सावजी किंवा पंजाबी ( ऑथेंटीक म्हणतोय मी, शेट़्टी कडले पंजाबी नाही ) मागवले तर त्या डिश मधे पदार्थ हा तेलात बुडलेलाच असणार ना? . किंबहूना सावजी पाया करी/चिकन करी वर जर तेलाचा तवंग नसेल तर ती तुम्ही खाऊ शकाल का? बरे दुसरी गोश्ट म्हणजे तळलेले चकली समोसा वगैरे हातात घेऊन , आपली कोरडी बोटं दाखऊन अरे त्यात तेल अजिबात नाही असे म्हणून बिनधास्त खाणारे अशी पण एक डायटींग वाल्यांची जमात आहे.
जेवायला गेल्यावर तुम्ही ओल्ड मंक घेणार, तर तुमचे हे मित्र डायट बिअर घेणार. तुम्ही क्रिस्पि व्हेज, मटन कबाब वगैरे घेणार तर घे मात्र तुमच्या डिशकडे आशाळभूत पणॆ पहात आपले समोरचे सॅलड आणि चना बॉइल्ड खात बसणार. डायटींग करणॆ म्हणजे स्वताडन करणे हे यांचे प्रिन्सिपल असते. अहो एखादा पिस चिकनचा घेतला, किंवा एखाद दोन पिस क्रिस्पी व्हेज चे घेतले तर काय हरकत नाही?? पण नाही, जेवणातली सगळी मजा घालवायची हा चंगच यांनी बांधलेला असतो.अरे स्वतः नसेल खायचं नको खाऊ, पण आम्हाला का छळतोस रे बाबा?
काय चालते आणि काय नाही याचे काही डायटींग करणाऱ्यांचे एक खास तंत्र असते. मी जेंव्हा डायटींग करायचो तेंव्हा माझे डायटींग रुलस होते.. जसे जेंव्हा तुम्ही स्वयंपाक घरात जाऊन डबे उघडता आणि तुम्हाला खाताना कोणी पहात नाही, तेंव्हा त्या वस्तू मधे अजिबात कॅलरी नसतात.
किचन ओट्या जवळ बायको भजी वगैरे तळत असतांना त्यातली चार दोन भजी खाल्ली तरी पण त्या मधे कॅलरी नसतात, कारण बायकोच्या कॉमेंट्स मूळे त्या पदार्थातील कॅलरीज अंगी लागत नाहीत- आणि त्याने वजनही वाढत नाही..
तुम्ही जेंव्हा दुसऱ्या माणसासोबत खायला बसता, तेंव्हा जर त्याने तुमच्या पेक्षा जास्त खाल्ले तर , तुमच्या कॅलरी काउंट होत नाहीत.
औषध म्हणून घेतलेल्या गोष्टींमधली कॅलरी अजिबात काउंट होत नाही, जसे वाईन, ब्रॅंडी, किंवा खोकला झाला म्हणून घेतलेले दोन पेग :) .
सिनेमा पहायला गेल्यावर चिझ पॉपकॉर्न एक टब घेऊन शेजारी बसलेल्या बायकोच्या पुढ्यात ठेऊन त्यातले आपण खाल्ले तरी पण त्यातल्या कॅलरी काउंट होत नाहीत. :)
मुलांच्या ब्रेडला बटर लावण्यासाठी मुद्दाम चमचा ( सुरी न वापरता , कारण ब्रेडला लावल्यावर सुरीला काहीच चिकटून रहात नाही ना ..) वापरल्याने त्याला चिकटलेले बटर /जाम /लोणचे/सॉस वगैरे गोष्टींमधे अजिबात काही कॅलरी नसतात.
असो.. माझ्या डायटींग वर हा लेख नाही :) माझ्या ओळखी मधले मागच्या वर्षात एक मित्र मरण पावले. वयाच्या ५२ व्या अर्षी स्ट्रोक ने तो गेला. हा अगदी बरोबर वजन असणारा, तेल तूप वगैरे न खाणारा, असा प्राणी होता. मला नेहेमी तू नक्की उलथणार आहेस लेका, हे असेच खात रहाशील तर म्हणून समज देणारा स्वतःच गेला . :( इतकं सगळं पाळलं तरी पण जर त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो तर……!! हे पाहिले आणि मी डायटींगचा नाद सोडलाय.
पण जर तुम्ही डायटींग करणार असाल, तर एकच नियम पाळा, कोणालाच सांगू नका डायटींग करतोय म्हणून……. कारण डायटींग हे तुम्ही स्वतः साठी करता असता..