ऐसे असावे संसारी
काही दिवसापूर्वी संत तुकारामांची गाथा वाचणे सुरु केले. तुकाराम महाराजांचे स्त्री विषयक विचार पाहून ” हे असे का?” हा प्रश्न मनात नक्कीच उभा राहिला. गाथे मधे एका अभंगात हे असे लिहिलेले आहे:-
गुज बोलावे संतासी, पत्नी राखावी जैसी दासी,
लाड देता तियेसी, वाटा पावे कर्माचा,
शुद्ध कसूनी पहावे, वरी रंगा ना भुलावे
तुका म्हणे घ्यावे जया नये तुटी तें.
तुकाराम महाराज वारकरी संप्रदायातले. स्त्री, पुरुष, जात, पात अजिबात न मानण्याचा वारकरी संप्रदायाचा शिरस्ता असतांनाही जेंव्हा तुकाराम महाराज जेंव्हा हा अभंग लिहितात, तेंव्हा त्यांना खरंच काय अभिप्रेत असावे हा प्रशन पडतो. चूल आणि मूल हेच स्त्रीचे कार्यक्षेत्र आहे, या पूर्वापार चालत आलेल्या विचारांचा पगडा तुकाराम महाराजांवर पण होता का?
हा अजून एक अभंग पहा:-
स्त्रियांचा तो संग नको नारायणा, काष्ट वा पाषाण मृत्तिकेच्या,
नाठवए हा देव न घडे भजन, लालचावले मन आवरेना.दृष्टी सुखे मरण, इंद्रियांच्या द्वारे लावण्य ते खरे दुःख मूळ
तुका म्हणे जरी अग्नि झाला साधु, तरी पडे बाधू संघष्टपणे.
स्त्रियांच्या संपर्कात पुरुष आला, की पुरुषाचे मन लालची होते, आणि मनात वासना निर्माण होतात. स्त्रिया या अग्नी सारख्या असतात, कितीही सौ़म्य असल्या तरीही त्यांचा स्पर्श हा भाजून टाकणारा – दाहकच असतो ,आणि तो बाधल्या शिवाय रहात नाही. पुराणात लिहिलेल्या विश्वामित्र मेनका,रामायण, महाभारत या ग्रंथांमधल्या घटनांचा विचार त्यांच्या मनात आला असेल म्हणून हे असे अभंग लिहिले असावे का?
बाईल तरी ऐसी व्हावी, नरकी गोळी अनिवार
घडॊ नेदी तीर्थ यात्रा, केला कुत्रा हात सोका.
आपुलीच करवी पूजा, पूजवी देवासारखे,
तुका म्हणे गाढव पशू, केला नाश आयुष्याचा.
हा अभंग पण स्त्री विषयक विचार जास्त स्पष्ट करतात. तुकाराम महाराजांच्या मते स्त्रिया या जात्याच चतूर असतात, लाडीगोडीने , गळे पडू पणा करून बरोबर आपल्या नवऱ्याला कह्यात घेतात. स्वतःच्या तारुण्याच्या आणि सौंदर्याच्या जोरावर त्याला कुत्र्यासारखा लाचार बनवतात. शेवटी काय, तर बायकोच्या आहारी गेलेल्या पुरुषाला गाढवा इतकी पण किंमत रहात नाही.
स्त्री च्या प्रेमात गुंतलेल्या प्रुरुषाला मग परमार्थाबद्दल ओढ कशी काय वाटू शकेल? सगळा वेळ जर बायकोचे सौंदर्य रसपान करण्यात जात असेल तर आध्यात्मिक उन्नती कडे दुर्लक्ष हे होणारच. पुरुषाच्या कॉन्सन्ट्रेशन क करता येण्याच्या दोषासाठी पण स्त्री लाच दोषी मानलेले का असावे? अशा पुरुषांबद्दल तुकाराम महाराजांनी लिहिलेला हा अभंग पहा.
बाईल अधीन होय़ ज्याचे जिणे, तयाच्या अवलोकने पडिजे द्वाड,
कासया ते जंत जिताती संसारी, माकडाच्या परी गारुड्याच्या.
बाईलाचा मना येईल ते खरे, अभागी ते पुरे बाइलीचे,
तुका म्हणे मेंग्या गाढवाचे जिणे, कुत्र्याचे खाणे लगबग..
स्त्रियांच्या तोंडात तीळ देखील भिजत नाही, त्या मुळे कुठलीही गुप्त गोष्ट ही स्त्री पासून लपवून ठेवा असे या खाली दिलेल्या अभंगात म्हंटले आहे. त्यांच्या मनात कुठलीच गुप्त गोष्ट रहात नाही, त्या मुळे ती कधी बाहेर पडेल ते सांगता येणार नाही आणि त्याचे परिणाम अर्थातच पुरुषालाच आणि संपूर्ण कुटूंबीयांनाच भोगावे लागतात. कदाचित पूर्वीच्या काळच्या एकत्र कुटुंब पद्धती चा विचार हा अभंग लिहितांना केला गेला असेल का?
“गुज बोलावे संतासी, पत्नी राखावी जैसी दासी,
लाड देता तियेसी, वाटा पावे कर्माचा”
हा अभंग लिहिताना त्या काळचा विचार केला तर लक्षात येईल की त्या काळी अस्तित्वात असलेल्या एकत्र कुटुंब पद्धती मधे स्त्री ने घरातले बघायचे आणि बाहेरचे काम , पैसा कमावणे वगैरे पुरुषाने करायचे अशी सरळ सरळ श्रम विभागणी केलेली असायची. होती. घरटी ५-६ भाऊ, त्यांच्या बायका , मुलं असा ४०-५० माणसांचा मोठा कुटुंब कबीला असायचा. त्या मधे इतक्या लोकांचा स्वयंपाक, जेवणाचे पहाणे, दुध काढणे, लोणी घुसळणे,चुलीची लाकडं वगैरे असंख्य कामे स्त्रियांच्या वाट्याला असायचे. ही कामं करणं तर आवश्यक होतंच. मग दासी प्रमाणे काम करणे आलेच. खरंच काय अभिप्रेत असावे त्यांना हा प्रश्न पडतोच.
असो.. माझा काही या विषयावर फार अभ्यास नाही तरीही लिहीतोय..
ज्या प्रमाणे ज्ञानेश्वरी गुढार्थ दिपिका आहे, त्याच प्रमाणे गाथेवर एखादा ग्रंथ कोणाला माहिती असल्यास कृपया इथे कॉमेंट्स मधे लिहा. कारण वर वर दिसणारा अर्थ आणि खरा अभिप्रेत असलेला अर्थ यात फरक असणे नक्कीच संभव आहे.