नरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…
या इलेक्शनचे निकाल आलेले आहेत. जनतेने भाजपाला पूर्ण बहुमताने निवडून दिलेले आहे. ज्या मुद्यावर ही निवडणूक लढली गेली तो मुद्दा म्हणजे विकासाचा. गुजरात मॉडेल हा शब्द पण बराच वापरला गेलाय या निवडणुकीत. तर हे गुजरात मॉडेल म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला असतो. गुजरात म्हंटलं की सुंदर रस्ते हा एकच मुद्दा लोकं चर्चेला घेतात, पण इतर गोष्टींचे काय? मला आकलन झालेले गुजरात मॉडेल इथे एक्सप्लेन करतोय.
लोकांना शासनाकडून काय हवं असतं? आता या प्रश्नाचे उत्तर व्यक्ती परत्वे बदलणारे असले तरीही, संपूर्ण भारतात अगदी कुठल्याही भागात रहाणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीला सरकारकडून फार कमी अपेक्षा असतात. जर हा प्रश्न विचारलाच, तर १) चांगले रस्ते२) पाणी ३) विज ह्या तीन गोष्टी आणि औद्योगिक विकास ही चौथी गोष्ट! ह्या गोष्टीं व्यतिरिक्त जनतेची अजिबात काहीच अपेक्षा नसते. ही गोष्ट नरेंद्र मोदींच्या अगदी बरोबर लक्षात आली आहे, आणि म्हणूनच गुजरातचा आर्थिक, सामाजिक विकास होऊ शकला.
पहिल्या तीन गोष्टी एकदा केल्या की मग चौथ्या गोष्टींसाठी म्हणजे इंडस्ट्रिअल ग्रोथ साठी काही खास मेहेनत करावी लागत नाही. फक्त नवीन उद्योग आपल्या राज्यात येतील ह्याची काळजी घेतली की झाले. मग त्या साठी नवीन एसईझेड सुरु करणे, नवीन उद्योजकांशी जवळीक वाढवून त्यांना ठरावीक काळासाठी खास सवलती देणे असे उपाय केले जातात.
सहज आठवलं म्हणून लिहितोय, नितीन गडकरी जेंव्हा बांधकाम मंत्री होते तेंव्हा त्यांनी मुंबईचे रस्ते , फायओव्हर्स चे जे काम केले, त्यामुळेच त्यांची एक कार्य कुशल मंत्री म्हणून ओळख निर्माण झाली. एखादी व्यक्ती राज्यामध्ये जर इतके काम करू शकते तर तिला राष्ट्रीय पातळीवर नेल्यास अजून जास्त काम करू शकेल असे पक्ष श्रेष्ठींना वाटले होते.
महाराष्ट्रात आज कॉंग्रेसच्या राज्यात एका जिल्ह्यात पाच मंत्री ( त्या पैकी एक गृह मंत्री ) असतांना पण रस्त्यांची अवस्था अगदी दयनीय आहे. पेट नाक्या पासून सांगली पर्यंत किंवा सांगली ते कोल्हापूर रस्ता अजूनही अतिशय वाईट अवस्थे मधे आहे. जेंव्हा हे असे नेते, जर आपल्याच शहरातले रस्ते तयार करून घेऊ शकत नसतील, तर त्यांच्याकडून अजून तरी काय अपेक्षा ठेवायच्या असा प्रश्न नक्कीच जनतेला पडलेला असेल, आणि त्यांनी आपला राग मतदानाद्वारे दाखवून दिलाय.अशीच अवस्था जवळपास सगळ्याच जिल्ह्यात दिसून येते. त्यातल्या त्यात स्टेट हायवेज जरा बरे म्हणायचे बस्स!. रस्ते बनवल्यावर त्याचे मेंटेनन्स पण करायचे असते ही गोष्ट सरकार विसरलंय.
मध्यप्रदेश मधे पण दिग्गी मुख्यमंत्री असतांना रस्त्यांची परिस्थिती अतिशय खराब होती, आणि शेवटी मग लोकांनी एमपी मधून पण कॉंग्रेसचे राज्य उखडून टाकले होते. हा इतिहासही बरेच लोकं आज विसरले असतील, पण खास एमपी मधे त्या काळी ज्या लोकांनी प्रवास केला असेल त्यांना नक्कीच आठवेल. एमपी मधे रस्त्याने प्रवास करणे जवळपास अशक्य झाले होते.
गुजरात मध्ये असलेले उत्कृष्ट रस्ते, केवडीया कॉलनी पासून कच्छ पर्यंत पाणीपुरवठ्याच्या साठी बनवलेले गेलेले कॅनल्स आणि अविरत विद्युत पुरवठा ह्या गोष्टींच्या मुळे गुजरातचे नंदनवन झाले. विज, रस्ते आणि पाणी ह्या कुठल्याही व्यक्तीसाठी किंवा उद्योगा साठी मुलभूत गरजा असतात. या बेसिक गोष्टी असल्यामुळे तिकडे महाराष्ट्रातले बरेच प्रकल्प स्थानांतरीत झाले. टाटा , एलऍंड्टी, सुझलॉन, ही काही उदाहरणादाखल दिलेली नावे.
स्पेशल एकॉनॉमिक झोन गुजरात मधे ५५ आहेत- आणि सगळे ऍक्टीव्ह. जो भाग शेतीच्या दृष्टीने पूर्णपणे बंजर आहे, त्या भागाचा पण डेव्हलपमेंट साठी करून घेतलेला उपयोग म्हणजे या एसईझेड. इतर इंडस्ट्रीज ला पण येण्यासाठी खास आमंत्रण देण्यात नमो कधी मागे नव्हते. एकदा एस ई झेड निर्माण झाले , किंवा एखादी इंडस्टी आली की मग त्या भागात रोजगार निर्मिती सोबतच रिअल इस्टेट, दुकाने, बाजार, शाळा कॉलेजेस आणि इतर डेव्हलपमेंट पण आपोआपच होतात. थोडक्यात काय तर इंडस्ट्रीयल ग्रोथ झाली, की सगळया राज्याचा सर्वांगीण विकास होतो.
आता असे बघा, एक नॅनो चा प्लांट आल्याबरोबर त्या सोबतच त्याला लागणारे पार्ट् सप्लाय करण्यासाठी शेकडो मिडीयम आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आपोआपच डेव्हलप झाल्या. या स्मॉल स्केल इंडस्ट्री मध्ये रोजगाराच्या संधी पण मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या. म्हणजे एक मोठी इंडस्ट्री असे अनेक फुटकळ उद्योग सुरु होण्यास मदत करते. अगदी हीच गोष्ट रिलायन्स, एल ऍंड टी आणि इतर कंपन्यांच्या बाबतीत म्हणता येईल.
विज , पाणी, आणि रस्ते….. बस्स! इतकं जरी केलं तरी पुरेसं आहे . शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उरतो तो म्हणजे शेतकऱ्यांचा. शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी/विज दिले की झाले.
मला समजलेले गुजरात मॉडेल हे असे आहे, हे असेच मॉडेल जर सगळ्या देशात राबवले तर नक्कीच देशाचा विकास होण्यास काही अडचण येणार नाही. मी काही एकॉनॉमिस्ट नाही, मला काय वाटेल ते इथे लिहिलंय, जर काही लिहण्यात चूक झालेली असेल तर कॉमेंट्स देऊन अवश्य दुरुस्त करा.