वाघ आणि चिचुंद्री
अरण्यातील एका मोठ्या झाडाच्या दाट सावलीत एक वाघ आपल्या भक्ष्याची वाट पाहात बसला होता. जवळच एका बिळातून आपले अर्धे अंग बाहेर काढून एक चिचुंद्री त्याच्याकडे पाहात होती. ती दिसताच वाघ तिला म्हणाला, 'अरे गरीब प्राण्या, मला तुझी फार दया येते. जो सूर्यप्रकाश जगातील इतर प्राण्यांना अत्यंत सुखकारक असतो, तो तुला सहन होऊ नये अशी योजना करण्यात देवाने मोठा निर्दयपणा दाखविला आहे असं मला वाटतं. तुझ्यासारखे प्राणी म्हणजे अर्धवट मेलेलेच प्राणी होत. तुम्हाला मारून टाकून या दुःखदायक स्थितीतून जर सुटका केली तर त्याचे तुमच्यावर उपकारच होतील.' त्यावर चिचुंद्रीने उत्तर दिले, 'अरे वाघोबा, माझ्या स्थितीसंबंधाने तू इतकी कळकळ दाखविलीस याबद्दल मी तुझे आभार मानते. पण खरंच सांगायचं तर माझ्या या परिस्थितीतही मला सर्व सुख मिळतं. ईश्वराच्या निर्दयपणाचे तू जे उद्गार काढले त्यासंबंधी मला इतकंच सांगायचं आहे की, ईश्वराने मला जे गुण दिले त्यावर मी अगदी समाधानी आहे. कोणत्या गुणांची वाटणी कशी करावी हे समजून घेण्याच्या कामी ईश्वराला साहाय्य करण्याची आवश्यकता नाही. आतां हे खरं की, तुझ्यासारखी तीक्ष्ण दृष्टी मला नाही. परंतु दृष्टीचं सगळं काम करण्यासाठी माझे हे लहानसे कान पूर्णपणे समर्थ आहेत आणि या गोष्टीचा अनुभव तुला मी आताच दाखविते. ऐक, तुझ्या मागल्या बाजूने येत असलेला कसला तरी भयंकर आवाज मला या वेळी अगदी स्पष्ट ऐकू येतो आहे.' इतके बोलून चिचुंद्री आपल्या बिळात गेली व एका शिकार्याने सोडलेल्या बंदुकीची गोळी छातीत शिरून तो वाघ तेथेच ठार झाला.
तात्पर्य
- दुसर्याचे नसते दोष दाखवून त्याची काळजी करीत बसण्यापेक्षा, स्वतःच्या दोषामुळे प्राप्त होणार्या संकटांविषयी सावधानता ठेवणे शहाणपणाचे होय.