लांडगा आणि बकरा
एका लांडग्याने एक बकरा डोंगराच्या उंच कड्यावर चरताना पाहिला. तेव्हा तेथे आपल्याला जाता येणार नाही हे लक्षात घेऊन तो बकर्याला म्हणाला, 'अरे तू अशा उंच आणि अवघड जागी सगळा दिवस चरतोस, हे बरं नाही. एखादे वेळी पाय घसरून खाली पडलास तर तुझा जीव गेल्याशिवाय राहणार नाही. त्यापेक्षा या मैदानात कोवळे गवत आणि गोड अशी झाडाची पानं आहेत ती खा, त्याने तुला जास्त समाधान मिळेल.' त्यावर बकरा म्हणाला, 'बाबा रे, तू म्हणतोस ते खरं, पण मला तू भुकेला दिसतो आहेस, म्हणून तू जिथे आहेस त्या ठिकाणी येऊन मी आपला जीव धोक्यात घालू इच्छित नाही.'
तात्पर्य
- जे लोक स्वार्थी असतात, त्यांनी आपल्या हिताच्या गोष्टी सांगितल्या तरी त्यांच्यावर विश्वास ठेवूं नये, कारण त्यात काहीतरी कपट असते.