मांजर व वटवाघूळ
एका मांजराने आपल्या मालकाचा आवडता पोपट मारून खाल्ला. तेव्हा मालकाने, 'ते मांजर दिसले तर मारून टाकीन' असे रागाने म्हटले. ते ऐकताच मांजर इतके घाबरले की ह्या प्रसंगातून देवाने आपल्याला वाचविले तर पुढे आपण कोणताही पक्षी कधीही मारून खाणार नाही अशी प्रतिज्ञा केली. थोड्या वेळाने दिवाणखाण्याच्या खिडकीतून एक वटवाघूळ अचानक आत आले ते पाहून असल्या मोह उत्पन्न करणार्या प्रसंगी कोणत्या प्रकारचे वर्तन करावे हा प्रश्न मांजराला पडला. एकीकडे भूक व दुसरीकडे प्रतिज्ञाभंग होण्याची भिती अशा पेचात ते सापडले असता काही वेळाने आपली भूक भागविण्याची एक युक्ती त्याला आढळून आली. वटवाघूळाकडे पाहून ते आपल्याशीच म्हणाले, 'हा पक्षी आहे असं जर मानलं तर केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे याला हात लावण्याचा अधिकार मला नाही, पण याच्या तोंडाचं उंदराच्या तोंडाशी इतकं साम्य आहे की, याला मारून खाण्याचा अधिकार मला आहे.' इतके बोलून तिने त्या वटवाघूळाला खाऊन टाकले.
तात्पर्य
- स्वार्थ साधण्याची वेळ आली असता लबाड लोक आपली प्रतिज्ञा युक्तीने गुंडाळून ठेवतात.