अध्याय १३
अनंतब्रह्माण्डरचना
(गीति)
श्री विद्यि-हरि-हर स्तविती, तो परमात्मा गजानन प्रभु जो ।
तूं केवळ आहेसी, जगताचें कारणासि साधक जो ॥१॥
आहेस परब्रह्मा, तूं तर आहे निधान विद्यांचें ।
वरिचेवरि तें प्रार्थुनि, चिंतन करिती पदोपदीं साचें ॥२॥
(इंद्रवज्रा)
हे श्रीगणाधीशा विधीच होसी । तूं विश्व हें निर्मित कारणासी ।
आधार आहेस रजोगुणासी । स्तवीतसें हा चरणांबुजासी ॥३॥
हे श्रीगणाधीश हरीच होसी । नानावतारां प्रभु तूं धरीसी ।
हे विश्व रक्षी गुणसत्त्वराशी । सेवितसों ह्या चरणांबुजासी ॥४॥
हे श्रीगणाधीश श्मशानवासी । होसी जगासी लयकारणासी ।
आधार घेऊन तमोगुणासी । स्तवीतसों ह्या चरणांबुजासी ॥५॥
हे श्रीगणाधीश जगन्निवासी । वेदान्ततत्त्वांस निवास होसी ।
इंद्रार्कवायू शशि तूंच होसी । स्तवीतसों ह्या चरणांबुजासी ॥६॥
या पंचभूतां जनिताहि तूंची । पदारविंदां भजकांस साची ।
विघ्नें नि बाधा करिती कधींही । अशा तुलाही भजतों तिघेची ॥७॥
आम्ही तिघेही तव पादसेवा । व्हावी म्हणूनी फिरलोंही देवा ।
आतां तुझी बा करुणाच झाली । यालागिं देवा तव भेट झाली ॥८॥
(दिंडी)
मृग कथिती कीं सोमकांतकांता ।
ऐकि वृत्तातें श्रवण करा आतां ॥
स्तवा ऐकुनियां एकदंत मोदें ।
ऐक वरदानें ऐक नृपा जीं दे ॥९॥
तुम्हीं मजलागीं बहुत कष्ट केले ।
स्तुतिस्तवनांनीं बहुत तोषवीलें ॥
नित्यनियमानें पठन करी जो हीं ।
सकल सौख्यातें मिळवि नित्य तोही ॥१०॥
मम स्तवनानें संपदा मिळे साच ।
गृहीं नांदे संतती सुखानेंच ॥
मोक्षशांतीचें अगर असे बापा ।
असा मानव पावतो सुखें भूषा ॥११॥
(उपेंद्रवज्रा)
अशा प्रकारें वरदान वाणी । गणेश बोले हरचक्रपाणी ।
वदे विधी हे बहु मोदवाणी । सदा असावी मुखिं नामवाणी ॥१२॥
विचार आम्हांपुढती स्व-कार्या । कसें करावें सुचवी सुकार्या ।
गणेश बोले तुमची सु-भक्ति । जडेल माझेवर हेच उक्ती ॥१३॥
तुम्हांस सांगे पुढलेंच काजा । विधी रची बा जगतासि ओजा ।
हरी करी पालन त्यासि कोडें । शिवें करावा लय कार्य जोडें ॥१४॥
(गीति)
यापरि गणेशकार्ये, सांगुन विधि हरिहरास त्या समयीं ।
वेदांदिक बोधुनियां, त्यांसि दिलें कीं स्वकार्य बल विषयीं ॥१५॥
(इंद्रवज्रा)
ब्रह्मा वदे लीनपणें प्रभूला । देवा मला ज्ञापित बालकाला ।
सृष्टी कशी स्थापन मीं करावी । जाणीव बापा मज दाखवावी ॥१६॥
(गीति)
यावर गणेश सांगे, माझे देहीं अनेक विश्वें हीं ।
वास करुनियां असती पाहसि तव तीं कळेल जाणिव ही ॥१७॥
ऐसें कथून विधितें, अपुल्या देहांत त्यास नेऊन ।
दाखवि अनेक विश्वें, उंबरफलसम तनूंत व्यापून ॥१८॥
ऐसें दृष्टिस पडतां, कमलोद्भव मानसीं बहू चकित ।
तेव्हां गणेश अंडा, भेदुन दावी विधीस तो उचित ॥१९॥
अंडयामाजी तेव्हां, सृष्टि दिसे तींत सर्वही दुसरें ।
विधि-हरि-हर हे तीघे, असुर तसे पाहिले हि एकसरें ॥२०॥
मुनिवर किन्नर आणिक, यक्ष तसे मानवादि गायक हे ।
भूजल-वनादि आणिक, भूचर जलचर तसेच खेचर हे ॥२१॥
वीसाधिक एक असे, पाहे स्वर्गास तेधवां विधितो ।
पांचाधिक दोन अशीं, पाहे पाताळ त्यांत आणिक तो ॥२२॥
एणेपरि दुसर्याही, अंडामाजी विलोकिलें जगत ।
ऐशीं अनेक अंडें, पाहुन तो भ्रांत-चित्तसा होत ॥२३॥
(ओवी)
ही ब्रह्मांडरचना पाहतां । आपण बसावें येथें आतां ।
बाहेर न जावें तत्त्वतां । निश्चय कांहीं नोहेच ॥२४॥
गजाननहृदयीं असतां । तयाचें स्तवन करी मागुता ।
ब्रह्मदेव म्हणे गणनाथा । मोहोनियां गेलों मी ॥२५॥
खगोलींच्या तारकांचे । कीं गणित नोहे सिकताकणांचे ।
तयापरी तव उदरीचें । ब्रह्मांडासी न गणवे ॥२६॥
देवा तुमचें येणें परी । ज्ञान झालें मज अंतरीं ।
तुच्छ वाटे मोक्ष तरी । ब्रह्माण्डरचना पाहूनियां ॥२७॥
मती भुलली तव अंतरीं राहावें कीं यावं बाहेरी ।
हें तव असे इच्छेवरी । करावें देवा यथार्थ ॥२८॥
(दिंडी)
ब्रह्मदेवाची जाहली स्थिती ऐशी ।
असें जाणुनियां काढिलें बाह्यदेशीं ॥
पुढें नेलें हो तनुंत कर्णमार्गी ।
गणाधीशें राहिल्या उभयवर्गी ॥२९॥
विश्वरुपा पाहून विश्वनाथ ।
तसे विष्णूही पाहती विश्व तेथ ॥
मुदित होउनियां शयन तीहिं केलें ।
भृगू कथिती तें कथन मींहि केलें ॥३०॥