प्रकरण तेविसावे अखेरचे
वैजयंतीला गोळी लागली आहे हे ऐकताच बलिदानासाठी वापरण्यात येणारी कट्यार डामरनाथाच्या हातातून गळून पडली. वेगवान पावलांनी तो कलिकेच्या मागे गेला. खरच राणी वैजयंती पंचवटीच्या व्यासपिठावर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. श्वासाची गती हळूहळू कमी होत होती.
डामरनाथाला समोर आलेला पाहून तिने अखेरची इच्छा व्यक्त केली.“डामरनाथ या जन्मात आपण एक नाही होऊ शकलो. पण मी पुढील जन्मी तुमची वाट पाहीन. तुम्ही आणि कलिका जीव वाचवून पळून जा.”
डामरनाथाला त्याच्या वागण्याचा पश्चात्ताप झाला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
“ हे दुष्कृत्य कोणी केले आहे कलिका?” असे म्हणून तो पुढे सरकरणार इतक्यात दुनाली बंदुकीचा दुसरा बार हवेत उडवला गेला.
व्यंकटअप्पय्या समोर त्यांची बंदूक रोखून उभे होते.
“संन्यासी तुम्ही इथून त्वरित निघून जा. मला तुमच्या हत्येचे पातक माझ्या माथी नको आहे.” मोठे सरकार
“मोठे सरकार तुम्ही हे ठीक केले नाही. मला मृत्यूचे भय नाही. या जन्मात नाही तर पुढील जन्मात मी वैजयंतीची इच्छा नक्की पूर्ण करेन.”
डामरनाथाचे हे बोलणे ऐकून मोठ्या सरकारांची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी बंदुकीचा चाप ओढला मात्र आणि डामरनाथाच्या कानाला गोळी हलकेच चाटून गेली. डामरनाथाच्या कानातून रक्ताची धार सुरु झाली. नंतर काही न बोलता सरकार वाड्यामध्ये निघून गेले.
डामरनाथ तडक चामुंडा देवीच्या गर्भगृहात गेला आणि त्याने कट्यार उचलली आणि स्वत:च्या मानेत खुपसून घेतली.
“डामरनाथ कापालिक आणि वैजयंती यांच्या मृत्यूमुळे उल्लालच्या पंचक्रोशीतील सर्वजण हळहळले.” बाबा नेमीनाथ यांचे डोळे पाणावले होते.
डामरनाथ आणि वैजयंती यांची करूण कहाणी ऐकून राम प्रचंड खिन्न झाला. त्याला डामरनाथाची मनस्वी चीड येत होती. राम काही न बोलता तेथून बाहेर पडला. तो चालत चालत पुन्हा शचीदेवीच्या घरी परतला. त्याचा संपूर्ण रात्र डोळ्याला डोळा लागला नाही. वैजयंतीचा विषादपूर्ण आणि करूण चेहरा एकसारखा त्याच्या डोळ्यासमोर येत होता.
अगदी पहाटेच्या सुमारास पूर्वेकडील आकाशांत तांबडे फुटू लागले. राम उठला आणि वाड्याकडे निघाला सगळीकडे नीरव शांतता पसरली होती. गावाच्या बाहेर थोडे अंतर गेल्यावर हरिद्रा नदी जिथून अर्ध चंद्रकोर आकारात वळली होती तिथून चामुंडा देवीचे मंदिर दिसत होते.
तिथे पोचल्यावर पुन्हा एकदा राम थक्क झाला. समाधीच्या अवस्थेत त्याने जे जे काही अनेकदा पाहिले होते, ते ते सर्व त्याच्या समोर होते, मंदिराच्या मागे बेल, आवळा, उंबर, कडुलिंब, कदंब असे वृक्ष होते. मंदिराच्या चारही बाजूना जांभ्या दगडाने पक्की भिंत बांधलेली होती. त्या भिंतीची एक बाजू फोडून एका वटवृक्षाची मुळे एखाद्या मनुष्याच्या पाठीवर कुबड आल्याप्रमाणे बाहेर आली होती. मोडक्या भिंतींच्या दोन्ही बाजूना काळ्या पाषाणात कोरलेल्या दोन स्त्रियांच्या मूर्ती होत्या.त्यांना पाहून असे वाटत होते कि कोण्या माथेफिरू मूर्ती भंजकाने धारदार तलवारीने प्रहार करून त्यांना विद्रूप करून टाकले होते. मात्र चामुंडा देवीची मूर्ती अजूनही मंदिरात होती.
काळ्या पाषाणापासून बनवलेली ती अक्राळविक्राळ मूर्ती, सुमारे पाच फूट उंचीची, खूपच जिवंत वाटत होती. पंचमुंडी आसनावर आहुती दिल्यानंतर स्थापित केलेल्या त्या देवीच्या दगडी मूर्तीत ते तेज आजही होते. पण दुदैव, आईच्या पायावर धुळीचा जाड थर साचला होता रामने हाताने देवीचे पाय स्वच्छ केले आणि धूळ कपाळाला लावली तेव्हा त्याचे डोळे भरून आले.
मग तो जवळच्या कुंडातून पाणी घेऊन आला आणि त्याने मूर्तीला जलाभिषेक केला. सोबत आणलेल्या साहित्याने देवीची मनोभावे पूजा केली. दगडी दिव्यात तिळाचे तेल ओतून दीप प्रज्वलित केला. देवीच्या पायाशी फुले वाहिली. देवीच्या पायाशी बसून संपूर्ण सप्तशतीचे पारायण केले. त्यानंतर त्याने सोबत आणलेला सुगंधी धूप प्रज्वलित केला आणि देवीची तो आरती करू लागला. आरती करत असताना त्याचे डोळे भरून आले होते तो गदगदून गेला होता. देवीच्या रुपाकडे पाहताना त्याला अनेक गोष्टींचा साक्षात्कार झाला.
त्याला त्या देवीच्या मूर्तीमध्ये देवी ऐवजी शचीदेवीचे दर्शन झाले. एका मागोमाग एक त्याला अनेक दृश्ये डोळ्यासमोर येत होती आणि त्याला लक्षात आले कि वैजयंती आणि शचीदेवी यांची चेहरेपट्टी अगदीच एकसारखी आहे. त्याला सारे काही समजले. अगदी लहानपणापासून त्याच्या डाव्या कानाचा आकार उजव्या कानापेक्षा थोडा वेगळा का आहे याचे रहस्य उलगडले. ती मोठ्या सरकारांनी झाडलेल्या आणि कानाला चाटून गेलेल्या गोळीची जखम आहे. जी या जन्मी जन्मखुण स्वरुपात शरीरावर आली आहे.
त्याने देवीला साष्टांग नमस्कार घातला आणि तो घाई घाईने जायला निघाला बाहेर येऊन पाहतो तर काय शचीदेवी पंचमुंडी आसनावर पद्मासनात बसली होती ती अगदी वैजयंती सारखीच दिसत होती.
“ मी केव्हापासून या दिवसाची वाट पाहत होते.” शचीदेवीचे डोळे आनंद अश्रूनी भरले होते. राम धावत गेला आणि आसनाजवळ खाली बसला. शचीदेवी आसनावरून खाली उतरली तिने रामला आसनावर बसवले.
“तुमची जागा माझ्या पायाशी नाही. मागील जन्मात देखील तुम्ही श्रेष्ठ साधक होतात आणि या जन्मात देखील तुम्ही श्रेष्ठ साधक आहात. माझे प्रेम तुम्हाला समजले यातच मी भरून पावले.”
शचीदेवी बोलत होती आणि आकाश अचानकपणे भरून आले. वीज चमकू लागली आणि पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरु झाला.
“मागील जन्मी तुंम्ही डामरनाथ होता आणि मी वैजयंती होते. आपल्या मरणोत्तर दोघांचे नश्वर देह मोठ्या सरकारांनी हरिद्रेच्या पात्रात फेकून दिले होते आणि आपल्या उत्तरक्रिया श्राद्धविधी केले नव्हते त्यामुळे त्यांच्या घराण्यात दोष येऊन पुढे त्यांच्या निर्वंश झाला. माझी आजी कालिका जी वैजयंतीची दासी आणि जिवलग मैत्रीण होती नेहमी मला उल्लालच्या सरकारांची हि कथा मला सांगत असे. मी जन्माला आले तेव्हा माझ्या पाठीवरील बंदुकीच्या गोळीच्या जखमेच्या जागी जन्मखुण पाहताक्षणीच तिने ओळखले होते कि मी पूर्वाश्रमीची वैजयंती आहे कारण वैजयंतीने प्राण त्यागताना आजीला वचन दिले होते कि पुढील जन्मी मी तुझ्या घरात जन्म घेईन. मी दासी कुळात जन्माला आल्यामुळे माझ्या नशिबात या जन्मात आले तसे राजघराण्याचे भोग उपभोग येणार नाहीत.”
इतका पाऊस सुरु होता त्यात दोघे चिंब भिजले होते आणि राम सर्व काही लक्ष देऊन ऐकत होता. सर्व काही ऐकल्यावर त्याने शची देवीला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला
“मला माफ कर, वैजयंती. मी तुझ्यावर खूप अन्याय केला?”
“मी तुमच्यासाठी अनेक वर्षे झुरत होते. पण या जन्मात मी विवाहित आहे. माझे पती कसेही असले तरी ते माझी पूर्ण काळजी घेतात. त्यामुळे या जन्मात देखील आपण एकत्र येणे शक्य नाही. मला क्षमा करा मागील जन्मी मी विनापाश होते त्यामुळे मी तुम्हाला समजून घेऊ शकले नाही. आशा करते कि तुम्ही मला समजून घ्याल.”
राम निरुत्तर झाला. दोघे पुन्हा शची देवीच्या माहेरच्या घराकडे निघाले. घरी पोहचेपर्यंत राम आणि शची एकमेकांशी काहीच बोलले नाहीत.
जसा त्यांनी घराच्या अंगणात प्रवेश केला शचीदेवीची आई समोर आली आणि शचीचे सांत्वन करू लागली. नुकतीच तार आली होती.
"उल्लाल स्टेशनवर ड्युटी करत असताना सिद्धरामय्या यांना हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने देवाज्ञा झाली होती."
समाप्त
वाचकांसाठी सूचना
सदर कथा हि संपूर्णपणे काल्पनिक असून हिचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. या गोष्टीतील पात्रांची, ठिकाणांची नावे यांच्यात काही साधर्म्य असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. कोणत्याही व्यक्तीच्या किंवा समुदायाच्या वैय्यक्तिक किंवा धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
हा या कथेचा समारोपाचा भाग आहे, कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.
बुक्सट्रकच्या सर्व वाचकांचे मनापासून आभार, आमची तुम्हाला विनंती आहे कि तुमच्या अधिकाधिक वाचक मित्रांपर्यंत या कथा पोहचवण्यासाठी आम्हाला मदत करा. ह्या कथा तुमच्या वाचक मित्रांना शेअर करा.
धन्यवाद!