प्रकरण तिसरे
काही वेळाने ती पुन्हा त्या खोलीत आली आणि समोरच्याच खुर्चीत येऊन बसली. मग त्यांच्या गप्पाटप्पा सुरु झाल्या. तेव्हा रामला स्पष्ट जाणीव झाली कि तिच्या गंभीर मुद्रेच्या मागे मनात एक खोलवर लपलेले ठुसठुसणारे दु:ख आहे.
“तुम्ही लेखिका आहात का? कि साहित्यिक?” राम
“तुम्हाला हा प्रश्न का पडला?” शची
“तुमचं बोलणं आणि भाषा ऐकून मला तसं वाटलं” राम “ इतक्या सुंदर आणि ओघवत्या भाषा शैलीचा वापर आणखी कोण करू शकते बरं?” राम
“हम्म..!” असं म्हणून ती बराच वेळ गप्प राहिली. तिच्या मनात आलेले अनेक शब्द तिने जणू तोंडातून बाहेर येण्याआधीच गिळून टाकले असावेत.
पुढे ती बोलू लागली. तिने संस्कृत भाषेत एम.ए. केलं. कविता वगैरे करायची पण घरकामातून फुर्सत मिळत नसे. वडील संस्कृत आणि कन्नड भाषेचे पंडित होते. त्यामुळे इतकं शिक्षण करू शकली होती. परंतु पुढे घरच्यांनी लवकर लग्न लावून दिलं. तिला डॉक्टरेट मिळवायची होती संस्कृत साहित्याची. पण राहूनच गेलं. आता पाक्षिके, नियतकालिके, मासिके यात कविता प्रकाशित होत असतात असं तिने रामला सांगितलं.
तिने त्याची इत्थ्यम्बूत माहिती जाणून घेतली. तो कोण आहे? घरी कोण कोण आहे? इकडे तो का आला आहे. आणि त्याने सांगितली देखील. सोबत हे सुद्धा सांगितले कि राम केम्ब्रिज विद्यापीठातून योग आणि तंत्र या विषयी रिसर्च देखील करत आहे.
“तसा विषय बराच कठीण आहे पण मला विश्वास आहे कधी कधी यश नक्की मिळेल” राम
“होय नक्की मिळेल जरी हि शास्त्रे रहस्यमय आणि गूढ असली तरी प्रयत्न सुरु ठेवा” शची म्हणाली “खर सांगायचं तर भारतीय संस्कृतीचा महिमा याच शास्त्रांमध्ये दडलेला आहे.”
“होय चालूच आहेत प्रयत्न त्यासाठीच उल्लाल या गावी जातोय” राम
“उल्लाल? कशाला?” शचीने चटकन विचारलं.
“ का काय झालं? असं आश्चर्यचकित का झालात?” राम
“ काही नाही. उल्लाल माझं माहेर आहे म्हणून विचारलं”
“ होका? मग तुम्ही व्यंकटअप्पय्या चूडामणी हेब्बार याचं नाव नक्कीच ऐकलं असेल? ते तिथले जमीनदार.........” राम
“...होय! ते तिकडचे खूप मोठे जमीनदार आणि सावकार होते त्यांचं ब्रिटीश सरकार दरबारी भरपूर वजन होतं म्हणे. पण आता काय? जमीनदारी संपली आणि चूडामणी हेब्बार यांच्या वंशाचा दिवा कोणीच शिल्लक नाही. पूर्वीचा त्यांचा आलिशान वाडा आता उजाड झाला आहे. एकेकाळी त्या वाड्याचा परिसर कर्णमधुर संगीताच्या आवाजाने भारलेला असे. परंतु आज तिथे केवळ स्मशान शांतता असते. मन, प्राण, शरीर यांना शुन्य करून टाकणारे भयंकर औदासिन्य तिकडे पसरलेले असते.”
राम कान देऊन ऐकत होता.
“ऐकलं आहे कि त्यांच्या सर्वात धाकट्या सुनेने दिलेल्या भयंकर शापामुळेच त्या उदार आणि आदर्श अशा हेब्बार जमीनदारांच्या घराण्याचा सर्वनाश झाला आहे. पण या सगळ्या गोष्टींशी तुमचा काय संबंध?” तिने विचारले
“संबंध कसा नाही? संबंध असल्याशिवाय इतक्या दूरवरून इथे आलोय का मी?” राम हसत हसत म्हणाला.
“ मी विचारू शकते का नक्की काय संबंध आहे?” तिने उत्सुकतेने विचारले
“ तुमचा स्वप्नांवर विश्वास आहे का?”
“हो आहे”
“मला पण एक स्वप्न नेहमी पडत असतं ज्याचा संबंध उल्लालच्या हेब्बार घराण्याशी आहे. माझं हे स्वप्न नक्की कितपत खरं आहे याचाच सुगावा लागावा म्हणून मी उल्लाल येथे जायला निघालोय.”
“ तुम्हाला खरंच तुमच्या स्वप्नावर इतकं विश्वास आहे?”
“ होय १०० टक्के. कदाचित इतर कोणाचा विश्वास बसेल नाही बसेल पण माझा माझ्या स्मरणशक्तीवर पूर्ण विश्वास आहे. पुन:पुन्हा तेच स्वप्न पडत असल्यामुळे मी बराच अस्वस्थ असतो. त्या स्वप्नाची नक्की पार्श्वभूमी काय आहे हे तर मला समजायलाच हवं.”
हे रामचे शब्द ऐकत असताना ती त्याला एकटक बघत होती. तिने अचानक विचारले.
“स्वप्नात नक्की काय दिसतं ते तुम्ही मला सांगाल का?”
राम क्षणभर चपापला. त्याने टेबलावर समोर ठेवलेल्या सिगारेटच्या पाकिटातून एक सिगारेट बाहेर काढली, पेटवली आणि झुरका घेत त्याने विचारले,
“आज तिथी काय आहे? बहुतेक अष्टमी असावी कृष्णपक्षातील. ज्या विधवा जमीनदारांच्या सुनेच्या शापा बद्दल तुम्ही आता बोलत होतात तिचा आत्मा मला गेल्या वर्षीपासून दर अमावस्येला स्वप्नात येते.”
“तुम्हाला हे कसं समजलं कि तो आत्मा त्याच जमीनदारांच्या सुनेचा आहे.” शची
“तिने स्वत: सांगितलं तसं कि ती उल्लालच्या हेब्बार जमीनदार घराण्याची सून वैजयंती आहे.”
क्रमश: