प्रकरण सातवे
त्या दिवशी देखील श्रावण भाद्रपदातील काळ्या-करड्या ढगांनी आसमंत व्यापला होता. ती काळीकुट्ट निबिड रात्र होती. फक्त पावसाचा नीरस आणि कंटाळवाणा आवाज ऐकू येत होता. वातावरणात गूढ नि:स्तब्धता परसली होती. इतक्यात अचानक दिगंतामध्ये वीज कडाडली. आकाश थरथर कापू लागले. अचानक रामच्या खोलीचा बंद दरवाजा जोरात उघडला आणि ओल्या पावसाळी हवेची एक जोरदार झुळूक आली आणि थंड हवा आत पसरली. त्याच वेळी, एक विशेष प्रकारचा अवर्णनीय, अनिर्वचनीय असा सुगंध खोलीत पसरला.
राम पलंगावर आडवा पडून पुस्तक वाचत होता. खोलीत पसरलेला तो सुगंध इतका तीव्र होता कि त्याचे वाचनात लक्ष लागेनासे झाले. कोण जाणे तो कसला अद्भुत सुगंध होता! त्याने दरवाजाकडे पाहिले दारात एक तरुणी उभी होती. खोलीतील साध्या बल्बच्या प्रकाशातदेखील ती अत्यंत तेजस्वी आणि सुंदर दिसत होती. रामची शुद्ध हरपून गेली होती आणि तो तिच्याकडे एकटक पाहत राहिला. हलका गव्हाळ परंतु नितळ वर्ण आणि प्रखर तारुण्याने ओतप्रोत तेजाळलेले मुखकमल, काळेभोर डोळे, डाळिंबाच्या दाण्यासारखे रसरशीत ओठ, हलके गोबरे गाल, उन्नत उभार आणि कमनीय बांधा. सहस्त्र मदिरेच्या कुप्यांनी जितकी नशा येत असावी त्यापेक्षा अधिक नशा आणणारे ते तिचे नेत्र ज्यामध्ये कोण जाणे कोणती संमोहन शक्ती होती जिच्यामुळे राम क्षणभर अवाक, स्तब्ध आणि पाषाणवत स्थिर झाला. काय म्हणावे ते अपरिमित सौंदर्य! काळोख्या पावसाळी एखाद्या एकाकी मंदिरात तेवत असलेला तिळाच्या तेलाचा नंदादीप आणि त्याचा प्रकाश जसा आपल्या मनाच्या प्रत्येक काळोख्या कोपऱ्याचा ठाव घेतो त्याप्रमाणे तिचे सौंदर्य रामला अंतर्बाह्य उजळून टाकत होते. इतक्यात आकाशात ढगांवर इंद्रदेवाने पुन्हा वज्राघात केला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. एखाद्या कृष्णविवराप्रमाणे खोल आणि गूढ वाटणारा तो रात्रीचा अंधार अधिकच भयंकर वाटू लागला.
मग पुन्हा एकदा अचानक वीज कडाडली दूरवर दिगंतात चमचमणारी रेखा आखल्यासारखी दिसली आणि त्या आवाजाने रामची तंद्री भंग पावली. इतक्या काळोख्या भयंकर रात्री ती कोण होती? रामचे हृद्य भय, विस्मय आणि संशय अशा मिश्र भावनांनी भरून गेले. त्या निबिड काळरात्री त्या सौंदर्यवतीचे त्याच्या खोलीत उपस्थित असणे विचित्रच होते.
“आपण कोण आहात?”
हा प्रश्न केवळ रामने विचारला आणि त्याच्या मस्तिष्कात कळ आल्यासारखं त्याला वाटलं आणि क्षणार्धात सर्व चित्र स्पष्ट झालं कि ती उल्लालच्या हेब्बार खोतांच्या घराण्यातील विधवा जमीनदारीण वैजयंती होती. जी काही क्षण स्थूलदेहाने प्रकट झाली होती. रामसाठी हि काही आश्चर्याची गोष्ट नव्हती. काही अतृप्त आत्मे खूपच ताकदवान असतात. त्यांच्या उर्जेने ते आत्म्यांच्या जगातून आपल्या जगात त्यांच्या पूर्वाश्रमीच्या शरीराचा आभास निर्माण करणारा देह धारण करून येतात आणि आपली अपूर्ण राहिलेली इच्छा दर्शनकर्त्यासमोर व्यक्त करतात.
राम सोबत अशा घटना अनेकदा घडल्या होत्या. युनिव्हर्सिटीत रिसर्चची प्रात्याक्षिके करतेवेळी तो अनेक इंग्रजी व्यक्तींच्या आत्म्यांशी अशाप्रकारे संपर्कात आला होता. त्या अनेक आत्म्यांच्या कथा आणि व्यथा त्याने ऐकल्या होत्या. अगदी त्यांच्याप्रमाणेच वैजयंतीने आपली मर्मस्पर्शी कहाणी त्याला सांगितली होती आणि आपल्या मुक्तीची याचना केली होती.
क्रमश: